Wednesday, October 8, 2014

पिकांना पाण्याअभावी झळ !

माना टाकण्यास सुरवात; हवे पाऊस, सिंचनाचे सलाईन

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून पावसाने मारलेली दडी, ऑक्‍टोबरचा वाढता उष्मा आणि जमीनीत खोल खोल चाललेली ओल यामुळे राज्याच्या बहुतेक भागात ऐन मोक्‍याच्या अवस्थेत असलेली खरिप पिके माना टाकू लागली आहेत. पुरक सिंचनाची सोय असलेल्या भागात वीज भारनियमाची समस्या गंभिर झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. पाटचाऱ्यांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठीही शेतकऱ्यांना ठिकठिकाणी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. रब्बी पिकांची पेरणीही माती कोरडी झाल्याने संकटात सापडली आहे.

राज्यात यंदा खरिपाच्या सुमारे एक कोटी 35 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. यापैकी बहुतांश क्षेत्रावरील पिकांना सध्या पाण्याअभावी झळ बसत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात राज्याच्या बहुतेक भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. ठिकठिकाणी पाऊस झाला असला तरी त्याची व्यापकता फारच कमी आहे. मॉन्सून माघारी फिरल्यानंतरही सर्वदूर पावसाची आशा पूर्ण होऊ शकलेली नाही. संपूर्ण मराठवाडा, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा, सांगलीचा काही भाग व कोकणातील पश्‍चिम घाटालगतच्या भागात पिकांच्या पाणी टंचाईची स्थिती अधिक गंभिर होऊ लागली आहे.

यातच भरीस भर म्हणून की काय गेल्या आठ दिवसात राज्यात सर्वत्र कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ते सरासरीहून पाच ते सहा अंशांनी उंचावले आहे. यामुळे जमीनीत मुळांच्या थरातील पाण्याबरोबरच पिकांमधील पाणीही वेगाने कमी होऊन पिके सुकत आहेत. बहुतेक पिकांमध्ये यामुळे फुलांची गळ, शेंगा बाल्यावस्थेतच वाळणे, शेंडा जळून जाणे अशी लक्षणे दिसत आहे. येत्या आठ दिवसात पावसाचे, पाटपाण्याचे किंवा पुरक सिंचनाचे सलाईन मिळाले नाही तर ही पिके हातची जाण्याचा किंवा उत्पादनात मोठी घट येण्याचा धोका आहे.

- निर्णायक स्थितीच बिकट
पोटरी ते फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेली ज्वारी, बाजरी, मका व तूर, फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले मुग, उडीद व सोयाबीन आणि फुलोरा ते बोंड धरण्याच्या अवस्थेत असलेला कापूस यांना पाण्याचा सर्वाधिक ताण बसत आहे. या पिकांची ही अवस्था उत्पादनात सर्वात महत्वाची मानली जाते आणि याच काळात त्यांना पाण्याची गरज जास्त असते. मात्र या स्थितीत ओल कमी पडल्याने पिके संकटात सापडली आहेत.

- खरिपाचे पिकनिहाय क्षेत्र हेक्‍टरमध्ये
कापूस 41,91,900; सोयाबीन 38,00,800; भात 14,95,000; तूर 10,36,800; मका 7,97,100; बाजरी 6,47,000; ज्वारी 4,53,300; मुग 3,18,600; उडीद 2,55,500; भुईमुग 1,93,700; नाचणी 92,600; तीळ 27,800; सुर्यफुल 26,600
------------------ 

No comments:

Post a Comment