Wednesday, October 1, 2014

निवृ्त्त संचालक डाॅ. नांदवटेंची सेवा तडकाफडकी समाप्त

एनएचएमचे संचालक डॉ. नांदवटेंची
सेवा तडकाफडकी समाप्तीचे आदेश

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी विभागाच्या सेवेतून कृषी संचालक पदावरुन निवृत्त झाल्यानंतर डॉ. ह. द. नांदवटे यांची कंत्राटी सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या संचालक पदी करण्यात आलेली नियुक्ती रद्द करुन त्यांना तडकाफडकी सेवेतून मुक्त करण्याचे आदेश कृषी सचिवालयाने दिले आहेत. याबाबत होणाऱ्या कार्यवाहीचा अहवालही तत्काळ सादर करण्याचा आदेश अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आला आहे.

डॉ. नांदवटे यांची सेवा तत्काळ समाप्त करण्यामागचे कारण याबाबतच्या आदेशात उघडपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा कंत्राटी सेवेत घेण्यासाठी शासनाने निर्धारीत केलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. डॉ. नांगवटे यांच्या सेवा समाप्त केल्यानंतर या पदाचे कामकाज फलोत्पादन संचालक यांनी पहावे, असा आदेश कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधिरकुमार गोएल यांनी दिला आहे. सेवा समाप्तीचे कारण अद्याप अज्ञात असल्याने डॉ. नांदवटे यांच्याप्रमाणेच निवृत्तीनंतरही कंत्राटी सेवेच्या माध्यमातून कृषी खात्यात अधिकारपदावर कार्यरत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनएचएमचा चालू वर्षाचा कृती आराखडा मंजूर होवून सहा महिने उलटल्यानंतरही अभियानाच्या अंतिम मार्गदर्शक सुचना तयार नसल्याच्या कारणावरून कृषी आयुक्त कार्यालयांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच माहिती न देणे, चुकीची माहिती देणे अशा विविध कारणामुळे डॉ. नांदवटे यांच्या विरोधात अनेक तक्रारी थेट कृषी व पणनचे अपर मुख्य सचिवापर्यंत गेल्या होत्या. आयुक्तालय वा अभियान स्तरावरुन याबाबत निर्णय न झाल्याने अखेर डॉ. सुधीर कुमार गोयल यांनी डॉ. नांदवटे यांचे काम थांबविण्याचा व या पदाचा कार्यभार फलोत्पादन संचालक डॉ. सुदाम अडसूळ यांच्याकडे सोपविण्याचा आदेश राज्य फलोत्पादन अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक व कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांना दिला आहे.

- अनेक सेवानिवृत्त सेवेत
फलोत्पादन अभियानाशिवाय पणन मंडळ, फलोत्पादन संचालक, विस्तार संचालक, आत्मा, अन्न सुरक्षा अभियान आदींच्या विभाग-उपविभागांमध्ये जिल्हा, विभागिय व राज्य स्तरावरील कृषी खात्यातील अनेक सेवा निवृत्त अधिकारी कंत्राटी सेवेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. यातील बहुतेकांना सल्लागार म्हणून सेवेत घेण्यात आले आहे. बहुतेक सर्व योजनांमध्ये सल्लागारांची भरती करण्यात आली आहे. त्यातही केंद्राच्या योजनांमध्ये सल्लागार नेमण्यास केंद्राने घालून दिलेल्या नियमांचा आधार घेण्यात आल्याचे सांगितले जाते. दर 11 महिन्यांनी या अधिकाऱ्यांचे करार संपतात व पुन्हा नव्याने केले जातात.
------------- 

No comments:

Post a Comment