Tuesday, October 21, 2014

राजकीय लढ्यात शेतकरी संघटनांना धोबीपछाड !!!

पुणे (प्रतिनिधी) ः शेतीप्रश्‍नांचा जागर करत विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या शेतकरी संघटनांच्या सर्व उमेदवारांच्या पदरी पराभव पडला आहे. संघटनांनी लढवलेल्या 55 हून अधिक जागांपैकी अवघ्या आठ जागांवर संघटनांच्या नेत्यांनी लुटूपुटीची लढत दिली. उर्वरीत सर्व ठिकाणी संघटनांच्या नेत्यांना मतदारांनी खिजगिणतीतही धरले नसल्याचे निकालांवरुन स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतकरी संघटनांचे राजकीय स्थान, ताकद व आवाक्‍याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने स्वबळावर 40 मतदारसंघांमध्ये प्रस्थापित नेतृत्वाला आव्हाण दिले होते. यापैकी एकाही ठिकाणी संघटनेला यश आले नाही. एकाही लढतीत संघटनेच्या उमेदवारांना पहिल्या पाच उमेदवारांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. स्वाभीमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेशी फारकत घेऊन भाजपशी घरोबा केला होता. मात्र मोदींची लाट आणि त्यांच्या सभांचा थाट स्वाभीमानीच्या कामी आला नाही. संघटनेच्या सर्व उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.

दुसरीकडे शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवून धोरणात्मक सुधारणांवर भर देणारे भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लातूरमधील औसा मतदारसंघातून त्यांना अवघ्या 37 हजार 414 मतांनिशी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवार कॉग्रेसचे बसवराज पाटील यांना 64 हजार 237 मते मिळाली. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने या निवडणूकीत कार्यकर्त्यांना सर्वपक्षिय रान मोकळे करुन दिल्याने त्यांच्या राजकीय लढ्याचा प्रश्‍नच उपस्थित झाला नाही.

स्वाभीमानीचे आठ उमेदवार या निवडणूकीत थोडीफार मजल मारु शकले. कोल्हापूरमध्ये पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात अमरसिंह पाटील सुमारे 28 हजार मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर, हातकणंगलेमध्ये प्रमोद कदम 21 हजार 318 मते मिळवून चौथ्या क्रमांकावर तर शिरोळमध्ये सावकार मादनाईक हे 48 हजार 511 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहीले. सातारा जिल्ह्यात फलटनमध्ये पोपटराव काकडे 24 हजार 529 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर, कोरेगावमध्ये संजय भगत हे 13 हजार 126 मते मिळवून चौथ्या क्रमांकावर तर कराड उत्तर मध्ये मनोज घोरपडे 43 हजार 903 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहीले.

ज्यांच्या विरुद्ध आत्तापर्यंत अनेकदा आंदोलने केली त्या साखरसम्राटांनाच उमेदवारी दिल्याने स्वाभीमानीच्या शेतकरी प्रश्‍नावर लढण्याच्या भुमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. कारखानदार उमेदवार, त्यात भाजप व इतर मित्र पक्षांचा शत प्रतिशत पाठींबा एवढा सगळा लावाजमा असतानाही स्वाभीमानीच्या उमेदवारांना फड जिंकता आला नाही. पंढरपुरमध्ये आयात कारखानदार उमेदवार म्हणून टिका झालेल्या स्वाभीमानीच्या प्रशांत परिचारकांना संघटनांच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 82 हजार 950 मतांचा जनाधार मिळाला. मात्र यानंतरही कॉग्रेसच्या भारत भालके यांनी त्यांचा सुमारे नऊ हजार मतांनी दणदणीत पराभव केला. परिचारकांप्रमाणेच राष्ट्रवादीतून आलेल्या संजय शिंदे यांना अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानत पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे सर्व विरोधकांची मोट बांधून जयंत पाटलांसह राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांना पराभूत करण्यासाठी केलेले स्वाभीमानीचे प्रयत्नही निरर्थक ठरले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी म्हणाले, ""उमेदवारांच्या पराभवाच्या अनुषंगाने मी सगळ्या बाजूने विचार करुन पाहीला. पण एकच बाब निदर्शनास आली. बहुतेक ठिकाणी बहुरंगी लढत असल्यामुळे पैशाचा वापर वारेमाप झाला. प्रत्येकाने कमी पडणारी 10-20 हजार मते विकत घेतली. नगरपालिकेसारखा दर निघाला. आम्ही हे केले नाही. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर चळवळी करणारी आम्ही माणसं. शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे न्याय देता येईल म्हणून काही लोकांना विधानसभेत पाठविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांना आम्ही फक्त रस्त्यावरच चळवळी करत रहावं असं वाटत असेल तर आम्हाला मान्य आहे. यापुढेही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळी सुरुच राहतील.''

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, ""चारही प्रमुख पक्षांच्या तुल्यबळ पैसा खर्च करणाऱ्या उमेदवारांच्या झंजावातात शेतीचे प्रश्‍न, शेतकरी, तत्वज्ञान सगळे बाजूला फेकले गेले. शेतकऱ्यांचा माल स्वस्त घ्यायचाय अशा मानसिकतेच्या लोकांना शेतकऱ्यांनीच कल दिलाय. शेतकरी अजून शेतकरी म्हणून मतदान करत नाही. शेतकऱ्यांचे हे अज्ञान अडचणीचे ठरते. राजकीय अभिनिवेश, गावातील इर्षा, स्थानिक स्पर्धा याभोवतीच लोक गुरफटतात. सोनिया काय नी मोदी काय या बदलाने आपल्या जिवनात काही पडत नाही. हे लोकांच्या लवकरच लक्षात येईल. शेतकरी लवकरच शेतकरी म्हणून मतदान करतील. एक ना एक दिवस लोकांना शेतकरी संघटनेच्या मुद्‌द्‌यांवर यावच लागेल. शेतीच्या मुद्‌द्‌यांना बगल देवून कुणालाही काहीही करता येणार नाही. शेतकरी संघटनेचा लढा असाच किंबहुना अधिक जोमाने सुरु राहील.''
---------
*चौकट
- स्वाभिमानीचा घरोबा चुकला !
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने यंदा शिवसेनेशी असलेली महायुती तोडून मोदी लाटेत हात धुवून घेण्याच्या इराद्याने भाजपशी घरोबा केला. मात्र प्रत्यक्षात याचा त्यांना काहीही फायदा झाला नाही. उलट कशीबशी तटपुंजी झुंज दिलेल्या आठ पैकी चार ठिकाणी त्यांना शिवसेनेच्या उमेदवारांकडून माती चाखावी लागली. तर उर्वरीत तीन ठिकाणी राष्ट्रवादी व एका ठिकाणी कॉग्रेसकडून भुईसपाट होताना शिवसेनेची मतविभागणीही निर्यायक ठरली. भाजपशी घरोब्याऐवजी शिवसेनेशी जवळीक कायम ठेवली असती तर कदाचित चार, सहा जागा स्वाभीमानीच्या पदरी पडल्या असत्या, असे चित्र आहे.

*कोट
""शेतकरी अजून शेतकरी म्हणून मतदान करत नाही, ही मोठी समस्या आहे. मोदी आले म्हणून बदल होत नाही, हे शेतकऱ्यांना लवकरच कळेल. तो दिवस दुर नाही.''
- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

""शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे न्याय मिळवून विधानसभा निवडणूक लढलो. पण लोकांना आम्ही फक्त रस्त्यावरच चळवळी करत रहावं असं वाटत असेल, तर आम्हाला मान्य आहे.''
- राजू शेट्टी, प्रमुख, स्वाभीमानी शेतकरी संघटना 

No comments:

Post a Comment