Thursday, October 30, 2014

निलोफर चक्रीवादळाची अति तिव्रता ओसरली

उत्तर गुजरात, कोकणात पावसाचा अंदाज कायम

पुणे (प्रतिनिधी) ः अरबी समुद्रातून उत्तर गुजरातच्या दिशेने वाटचाल सुरु असलेल्या निलोफर चक्रिवादळाची अति तिव्रता कमी होवून त्याचे रुपांतर तिव्र चक्रीवादळात झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्याची तिव्रता आणखी कमी होऊन ते सौम्य स्वरुपात (डिप्रेशन) गुजरातला धडकण्याचा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी हे वादळ गुजरातपासून सुमारे 620 किलोमिटर अंतरावर पश्‍चिम मध्य अरबी समुद्रात सक्रीय होते. वादळ उत्तर गुजरातला धडकल्यानंतर या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज कायम आहे.

निलोफर चक्रिवादळाची तिव्रता मध्यंतरी वाढल्याने गुजरातमध्ये अतिदक्षतेच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र आता हे वादळ कमी दाबाच्या क्षेत्राच्या तिव्रतेहून अधिक व वादळाच्या तिव्रतेहून कमी स्वरुपात गुजरातमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमिटर राहण्याचा अंदाज आहे. वादळाची तिव्रता ओसरल्याने किनारपट्टीवर फारशी हानी होण्याची शक्‍यता नाही. मात्र या वादळाच्या प्रभावामुळे या भागात दमदार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात कोकण वगळता उर्वरीत भागात हवामान कोरडे व स्वच्छ सुर्यप्रकाश राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या आसपास तर किमान तापमान सरासरीहून दोन ते पाच अंश सेल्सिअसने घसरलेले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढले आहे. उस्मानाबाद येथे राज्यात सर्वात कमी 13.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. भिरा येथे राज्यात सर्वात जास्त 36.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

गुरुवारी (ता.30) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 35.3 (24.9), अलिबाग 34.2 (22), रत्नागिरी 33.9 (20), पणजी 33.5 (21.3), डहाणू 34.8 (21.8), भिरा 36.5 (17.5), पुणे 31 (13.9), नगर (15.2), जळगाव 33.5 (14.1), कोल्हापूर 29.9 (17.6), महाबळेश्‍वर 25.1 (15), मालेगाव 34.4 (16.4), नाशिक 30.5 (15), सांगली 30 (16.7), सातारा 29.6 (14.5), सोलापूर 33 (16), उस्मानाबाद 31.8 (13.8), औरंगाबाद 32 (16), परभणी 32.6 (14.7), नांदेड 31.5 (15.5), अकोला 34.5 (16.9), अमरावती 31.8 (18.4), बुलडाणा 31 (17.8), ब्रम्हपुरी 33.2 (17.8), गोंदिया 31.1 (15.4), नागपूर 32.6 (16.1), वाशिम 32 (18), वर्धा 32 (16.4), यवतमाळ 31.6 (15.6)
------------------ 

No comments:

Post a Comment