Wednesday, October 29, 2014

निलोफर चक्रीवादळाची उद्या उत्तर गुजरातला धडक

पुणे (प्रतिनिधी) ः अरबी समुद्रातून गुजरातच्या दिशने घोंगावत येत असलेले अति तिव्र स्वरुपाचे "निलोफर' चक्रीवादळ शुक्रवारी (ता.31) रात्री उशीरा ते शनिवारी (ता.1) पहाटे दरम्यान गुजरातच्या उत्तर किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्याचा अति तिव्र पणा कमी होऊन हे चक्रीवादळ किनारा ओलांडेल. या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी 60 ते 70 किलोमिटर असेल, असे मुंबई वेधशाळेने म्हटले आहे. सौराष्ट्र व कच्छमध्ये गुरुवारीपासून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात सुमारे 300 किलोमिटर अंतर कापून निलोफर चक्रीवादळ गुजरातमधील नलियापासून 870 किलोमिटर अंतरावर पोचले. त्याचा प्रवास ताशी 15 किलोमिटर वेगाने उत्तर दिशेने सुरु असून गुरुवारी (ता.30) सकाळपर्यंत ते गुजरातपासून 500 किलोमिटर अंतरावर येवून ठेपण्याची चिन्हे आहेत. या वादळाच्या प्रभावामुळे गुरुवारी (ता.30) सौराष्ट्र व कच्छमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन सौराष्ट्र व कच्छमध्ये बहुतेक ठिकाणी तर कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, निलोफर चक्रावादळाचा महाराष्ट्रावरील प्रभाव कमी झाल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणातही बहुतेक ठिकाणी घटलेले कमाल तापमान पुर्वपदावर म्हणजेच सरासरीच्या जवळपास आले आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानातील घट कायम आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात जळगाव व नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी 14 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्र या तिनही विभागांमध्ये बहुतेक ठिकाणी किमान तापमान सरासरीहून दोन ते तीन अंशांनी कमी आहे. कोकणात कमाल व किमान दोन्ही प्रकारचे तापमान सरासरीएवढे आहे. दिवसभरात कोठेही पावसाची नोंद झाली नाही.

बुधवारी (ता.29) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः अलिबाग 33 (23), डहाणू 35 (23), पणजी 33 (23), मुंबई 34 (25), रत्नागिरी 33 (21), जळगाव 32 (14), जेऊर 31 (17), कोल्हापूर 29 (19), महाबळेश्‍वर 25 (15), मालेगाव 35 (16), नाशिक 30 (14), पुणे 31 (15), सांगली 29 (18), सातारा 29 (16), सोलापूर 32 (17), औरंगाबाद 32 (16), उस्मानाबाद 31 (15), परभणी 31 (16), अकोला 33 (17), अमरावती 30 (18), ब्रम्हपुरी 31 (18), बुलडाणा 30 (17), नागपूर 31 (16), वर्धा 31 (16), यवतमाळ 30 (16)
---------------------- 

No comments:

Post a Comment