Monday, October 13, 2014

शेतकरी नेत्यांचे भवितव्य पणाला

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वर्षानुवर्ष लढणाऱ्या विविध शेतकरी संघटनांचे सुमारे 55 हून अधिक उमेदवार यंदा विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. प्रस्थापित, सत्ताधारी व विरोधी उमेदवारांच्या धुराळ्यात रंगणाऱ्या बहुरंगी लढतींमध्ये राज्यातील शेतकरी राजा या सक्रीय शेतकरी नेत्यांवर कितपत विश्‍वास दाखवतो, या प्रश्‍नाचे उत्तर उद्या (ता.15) मतपेटीत बंद होणार आहे.

रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना या निवडणूकीत कुणाच्याही वळचणीला न जाता स्वबळावर लढत आहे. संघटनेचे सर्वाधिक 40 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यातील बहुसंख्य उमेदवारांनी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरुन संघर्ष केलेला आहे. संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, पांडुरंग रायते, राहुल म्हस्के, मराठवाड्यात कालिदास आपेट यांच्यासह संघटनेच्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील अनेक नेते कार्यकर्ते दंड थोपटून आहेत. विशेषतः रघुनाथदादा पाटील यांच्या वाळवा तालुक्‍यातून (सांगली) प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते विलास रकटे हे रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे.

राजू शेट्टींच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणूकीत शिवसेनेशी महायुती केल्यानंतर आता विधानसभा निवडणूकीसाठी महायुतीतून काडीमोड घेत भाजपच्या महाआघाडीशी घरोबा केला आहे. संघटना 13 जागांवर निवडणूक लढवत असून यातील बहुतांश ठिकाणी भाजपा व मित्रपक्षांनी संघटनेला पाठींबा दिलेला आहे. प्रशांत परिचारक, संजय शिंदे, प्रमोद कदम, जालंदर पाटील, विजय सिताफळे, अभिजीत पाटील आदी उमेदवार स्वाभीमानीमार्फत लढत आहेत.

शरज जोशी प्रणित शेतकरी संघटननेने या निवडणूकीत नेत्यांना "जो जे वांछिल तो ते लाहो' अशी मोकळीक दिल्याने संघटना निवडणूकीत थेट सक्रीय नाही. मात्र अनेक कार्यकर्ते ठिकाणी भाजपाच्या पाठीशी उभे आहेत. याशिवाय भाजपामधून विधानसभेवर उमेदवारी मिळालेले शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. राज्यात भाजपाचे सरकार आले तर कृषीमंत्री पदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात आहे.

नांदेडमध्ये किसान बिरादरी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ पाटील इजळीकर यांनी शेतकरी व शेतमजूरांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्‍न हाती घेऊन विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. भोकर मतदारसंघातून ते लढत आहेत. याशिवाय इतरही लहानमोठ्या शेतकरी संघटना संस्थांचे उमेदवार रिंगणात आहेत. यंदा बहुरंगी लढतींमुळे मोठी मतविभागणी होण्याचा अंदाज आहे. ही शेतकरी संघटनांच्या नेत्यांना मोठी संधी मानली जात आहे. अनेक ठिकाणी हे नेते किती मते खेचतात हे ही निर्णयक ठरेल. गेल्या आठ दिवसात सभा, बैठका, पदयात्रांच्या माध्यमातून या नेत्यांनी आपापले मतदारसंघ पिंजून काढले आहेत. आता शेतकरी मतदारांचा उद्याचा निर्णायक कौल या उमेदवारांचे भवितव्य निश्‍चित करणार आहे.
------------------- 

No comments:

Post a Comment