Thursday, October 16, 2014

सेंद्रीय शेती यशोगाथा - गणपत औटी, बेल्हा, ता. जुन्नर, जि. पुणे


अल्पभुधारक शेतकर्याची आदर्श सेंद्रीय शेती
------------------------
संतोष डुकरे
-------------------------
सेंद्रीय शेती ही फक्त शेती नाही तर ती शेतकऱ्याची संपन्न शाश्‍वत नैसर्गिक जिवनपद्धती आहे. संख्या कमी असली तरी राज्यात विखूरलेल्या स्वरुपात ठिकठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी जिवनपद्धती अमलात आणली आहे. गणपत सुदाम औटी (बेल्हे, ता.जुन्नर, पुणे) हे अशाच निसर्गवेड्या शेतकऱ्यांमधील एक व्यक्तिमत्व. नैसर्गिक वा सेंद्रीय शेतीचा त्यांचा ध्यास एवढा प्रखर आहे की गेली 15 वर्षे स्वतःच्या 30 गुंठे शेतीबरोबरच शेतकऱ्यांकडे वाट्याने केलेल्या पिकांचेही ते सेंद्रीय पद्धतीने दर्जेदार उत्पादन घेत आहेत.
--------------------------
रासायनिक किटकनाशके आणि खतांचा शेतीतील वापर यामध्ये जुन्नर तालुका हा देशातील अग्रणी तालुक्‍यांपैकी एक आहे. द्राक्ष, डाळींबासारख्या फळबागा, टोमॅटो, कांदा यासारखी नगदी भाजीपाला पिके यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक वापरले जातात. अनेक गावांमध्ये एकच एक पिकामुळे किड नियंत्रणाबाहेर गेल्याने काही पिकेच हद्दपार होण्यासारख्या घटनाही घडलेल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आणि हातात फक्त 30 गुंठे जमीन असतानाही अतिचा हव्यास टाळून औटी कुटुंबाने सेंद्रीयचा मार्ग अवलंबून शेती भरघोस उत्पादनाची शाश्‍वत केली आहे.

गणपतरावांची शाळा सहावीतून सुटली आणि त्यांचा शेतीतला प्रवास सुरु झाला. कुटुंबाची शेती बऱ्यापैकी पण पाण्याची पिढीजात अडचण. सर्व शेती कोरडवाहू. पावसाच्या पाण्यावर येईल ते पिक घ्यायचे अशी स्थिती. पाऊस कमी असला तरी कुटुंबाच्या गरजेपुरते चांगले पिकायचे. वडील, चुलते, सहा भावंडांचे मोठे कुटुंब. हाती येईल ते काम करता करता गणपतरावांवर शेतीचे संस्कार झाले. पुढे 1986 ला लग्न झाल्यानंतर कामासाठी त्यांनी गाव सोडले. सलग दहा वर्षे त्यांनी औरंगाबाद, सातारा, नाशिक, वापी आदी ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या, जलशुद्धीकरण प्रकल्पांवर काम केले. यानंतर 1996 साली बाहेरची कामे सोडून ते पुन्हा शेतीवर परत आले आणि शेतीत झोकून दिले.

भावाभावात झालेल्या जमिनीच्या अघोषीत वाटण्या, पाण्याची हक्काची सोय नाही, तीन सामायिक विहीरी, त्यावर 12-15 दिवसात एखाद दिवस येणारी पाण्याची बारी अशा सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे श्री. औटी यांच्या शेतीवर मर्यादा आल्या. सध्या त्यांच्या ताब्यात कुटुंबाची 30 गुंठे जमीन असून त्यावर गेल्या 15 वर्षापासून ते सेंद्रीय पद्धतीने बहुविध पिकांचे उत्पादन घेत आहेत. यात 26 वर्षे वयाची राजापूरी, केशर व हापूस आंब्याची सात झाडे, मोसंबी, संत्रा, लिंबू, नारळ आदी फळपिके, नव्याने लावलेली डाळींबाची 40 झाडे, संरक्षित पाण्यासाठी यंदा तयार केलेले छोटे शेततळे व अनेकविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

- औषधी वनस्पती व मसाला पिके
अवघी 30 गुंठे जमीन असल्याने उपलब्ध क्षेत्राचा इंच न्‌ इंच काटेकोर वापर श्री. औटी यांनी केला आहे. बांध, सावलीतील पिके, हळदीसारखी मसाला पिके, गवती चहा, धोतरा, तुळस यासह अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती त्यांच्या शेतात आहेत. आठवडे बाजारासाठी अळूचेही उत्पादन घेतात. घराशेजारीच वांगी, कारली आदी भाजीपाल्याही गावात विक्री केली जाते. कुटुंबाची दैनंदिन गरज या शेतीत पूर्ण भागत आहे. आंबा, संत्रा, मोसंबी यांसह सर्वच पिकांचे उत्पादन भरघोस आहे. नाशिकसह अनेक फळ महोत्सवांमध्ये त्यांच्या आंबा, नारळ आदी फळांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे.

- वाट्याच्या पिकांसाठीही सेंद्रीय पद्धती
घरची शेती कमी असल्याने श्री. औटी कुटुंबीय इतर शेतकऱ्यांकडे वाट्याने म्हणजेच भागिदारीत विविध पिकांचे उत्पादन घेतात. निम्मा वाटा, तिसरा वाटा असे पिकानुसार या भागिदारीचे स्वरुप असते. निम्म्या वाट्यात होणारा सर्व खर्च निम्मा निम्मा असतो. तर तिसऱ्या वाटा हा पिक उत्पादनासाठी सर्व श्रमचा मोबदला असतो. दुसऱ्या शेतीतही सेंद्रीय पद्धतीनेच रासायनिक पेक्षा सरस उत्पादन घेण्याची जबाबदारी गणपतराव स्वतःच्या खांद्यावर घेतात व यशस्वीपणे पार पाडतात. 2006 साली त्यांनी आर्वी पिंपळगाव येथील मधुसुदन देवकर यांच्याकडे दीड एकर कांद्यापासून पाच लाख रुपये उत्पन्न मिळवले होते. गेल्या काही वर्षापासून ते गावातील शेतकरी हरीदास भिकाजी ताजवे यांच्या चार एकर जमीनीवर वाट्याने पिके घेत आहेत.

- ऐकेक दाना लागवड, भरघोस उत्पादन
श्री. औटी यांनी 2011 मध्ये तीन फुट बाय एक फुट अंतरावर सरी पद्धतीने आणि विशेष म्हणजे हाताने एक एक दाना वेगळा करुन बाजरीची लागवड केली. अवघ्या पाऊन किलो बियाण्यापासून त्यांना एक टन बाजरीचे धान्य उत्पादन मिळाले. गेली चार वर्षे कुटुंबाला ही बाजरी व त्याचे गुरांसाठीचे सरमाड (वैरण) संपलेले नाही. गेली सहा वर्षे त्यांनी शेतात ट्रॅक्‍टर किंवा बैल आणलेले नाहीत. आवश्‍यकतेनुसार हवी ती मशागत हाताने करतात. दुष्काळ, पाणी टंचाई, गारपीट यांचा सामना औटी कुटुंबियांनाही वेळोवेळी करावा लागला. या प्रत्येक संकटात त्यांचा सेंद्रीय शेतीवरचा विश्‍वास अधिक वाढला.

- माती पहेलवान, पिक बलवान
योग्य नियोजन व काटेकोर लक्ष देऊन बनविलेली सुपिक जमीन हे श्री. औटी यांच्या शेतीचे मुख्य बलस्थान आहे. शेतात कुठेही थोडी माती उकरुन पाहिली तर मोठ्या संख्येने गांडुळे आढळतात. गांडूळ खताचे दोन बेड तयार केले असून त्यातून दर तीन महिन्याला 40 गोणी खत तयार होते. घरच्या गावठी गाईच्या शेणाची स्लरीही पिकांना दिली जाते. किड रोग नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, करंजी तेल व इतर जैविक पद्धतींचा वापर केला जातो.

- रुपयाला रुपयाचे अर्थशास्त्र
शेतीमध्ये गुंतवलेल्या रुपयापासून रुपया उत्पन्न मिळाले पाहिजे असे गणपतराव औटी यांच्या शेतीचे अर्थशास्त्र आहे. घरच्याच बियाण्याचा, खतांचा व इतर निविष्ठांचा वापर होत असल्याने उत्पादन खर्च कमी आहे. किड रोगांचा प्रादुर्भाव फारसा नसल्याने पिकाची गुणवत्ता व प्रतवारीही चांगली आहे. परिणामी दरही चांगले मिळत असून रुपयाला रुपया मिळत असल्याचे ते सांगतात. घरची शेती थोडी असल्याने वाट्याच्या शेतीतही सेंद्रीय पद्धतीने रुपयाला रुपया नफा मिळविण्याचा प्रयत्न असतो, असे श्री. औटी यांनी सांगितले.

- ऍग्रोवनचे "डाय हर्ट फॉलोअर'
गणपतराव औटी हे ऍग्रोवनचे नियमित वाचक असून ऍग्रोवनचे सर्व अंक त्यांच्या संग्रही आहेत. रात्री कधी जाग आली तरी ते अंक काढून वाचत बसतात. विशेषतः सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती याविषयी आलेली माहिती त्यांनी कात्रणे करुन जपून ठेवली आहे. ऍग्रोवनमधून राज्यातील अनेक तज्ज्ञांशी त्यांचा ऋनानुबंध तयार झाला असून दुरध्वनीवर एकमेकाच्या संपर्कात राहून तो अधिक वाढवल्याचे ते आवर्जुन सांगतात.

*कोट
""कुटुंब फक्त नावापुरते एकत्र आहे. वाटण्या झालेल्या नाहीत, इतर भावांनी घेतल्यानंतर उरलेली 30 गुंठे जमीन आम्ही कसतोय. सगळी गुंतागुंत आहे. पण सेंद्रीय शेतीच करायची हा यांचा ध्यास आहे. त्याचे फायदे आम्ही बघतोय. त्यामुळे शेती करायची तर सेंद्रीयच हे आता मुलांच्याही अंगवळणी पडले आहे.''
- सौ. कुंदा गणपत औटी
--------------------------
भुमातेला सुवर्णदान !

ब्रिटिशांच्या जुलमी पाशातून
क्रांतीविरांनी भुमातेला सोडविले
तिच्या भल्यासाठी नेत्यांनी
आम्हाला क्रांतीचे धडे दिले
कोणी सांगितली हरितक्रांती
कोणी सुचविली धवलक्रांती
भुमातेच्या शोषणाची
कुणाला राहीली नाही भ्रांती

अस्सल देशी वाण सोडून,
संकरितांचा प्रसार झाला
विक्रमी पिकांच्या हव्यासाने,
तिच्यावर रसायनांचा भडीमार झाला
रोग वाढले न्‌व्÷िवषाचा वापर झाला
निकस, संकरित, विषारी अन्न खाऊनी
रोगराईचा भस्मासूर मानवापुढे ठाकला

धवलक्रांतीच्या ध्यासापोटी
देशी गोमातेला गहाण ठेवले
मांसासाठी संकरित केलेल्या वळुमुळे
दुध दुभत्याने मानवी आरोग्य सडले
विक्रमी उत्पादन म्हणून
नेत्यांनी स्वसत्कार घडविले
परदेशी कंपन्यांची चंगळ उडाली
शेतकऱ्यांची मात्र कर्ज वाढली
कर्जे फेडण्यासाठी कर्जे काढली
सावकारी पाशामुळे आत्महत्यांची पाळी आली

सुवर्णयुग पाहणाऱ्या भुमातेला
विषारी रसायनाने वैराग्य आले
तरी नेत्यांचे डोळे उघडत नाही
निसर्गाशी दोन हात करुन
कुणाचेही भले होत नाही
अमृताच्या फळासाठी विष पेऊन चालत नाही
शेतकऱ्यांनो आता विचार करा
निसर्ग नियमांची कास धरा
ऋषीमुनींनी दिलेल्या ज्ञानाचा पुनश्‍च वापर करा
आपल्या भुमातेला सुवर्णयुगाचे दान करा !
- गणपत औटी
-------------------------------
संपर्क -
गणपत सुदाम औटी
मु. पो. बेल्हे (औटीमळा)
ता. जुन्नर, जि. पुणे
मोबाईल - 9404683986
--------------------------------





















No comments:

Post a Comment