Thursday, April 21, 2016

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा


रात्रीचा उष्माही कायम

पुणे (प्रतिनिधी) - विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. विदर्भात कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ झालेली असून शुक्रवारी (ता.२२) काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बहुतेक ठिकाणी कमाल व किमान तापमानात सरासरीहून उल्लेखनिय वाढ झाल्याने मराठवाड्‍यातही उन्हाचा कडाका जोरदार राहण्याची चिन्हे आहेत.

विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानाचा पारा वाढलेला असतानाच किमान तापमानातही सरासरीहून पाच अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रात्रही उष्ण झाली आहे. संपूर्ण मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी उष्ण रात्र अनुभवास येत आहे. मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमान सरासरीहून पाच अंश सेल्सिअसने उंचावले आहे. विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीहून उल्लेखनिय वाढ झालेली आहे. यामुळे दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री पुन्हा उष्णनेने लाही लाही अशी होरपळवणारी स्थिती अनुभवास येत आहे.

दरम्यान, इशान्येकडील आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस सुरु आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात गुवाहाटीला १३० मिलीमिटर तर चेरापुंजीला ५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे या भागात कमाल तापमानात सरासरीहून पाच अंशांनी घट झाली आहे. विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंतच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. हिंदी महासागरात विश्ववृत्तीया भाग व लगतच्या अरबी समुद्राच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.

गुरुवारी (ता.२१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - अलिबाग ३१ (२५), भिरा ३९ (२२), डहाणू ३४ (२५), पणजी ३४ (२७), हर्णे ३२ (२५), कुलाबा ३१ (२६), सांताक्रुझ ३३ (२५), रत्नागिरी ३२ (२६), जळगाव ४३ (२७), जेऊर ४२ (२६), महाबळेश्वर ३३ (२२), मालेगाव ४४ (२७), नाशिक ४० (२३), पुणे ४० (२३), सांगली ४१ (२४), सातारा ४० (२५), सोलापूर ४४ (३०), नांदेड ४५ (३१), उस्मानाबाद ४२ (२६), परभणी ४५ (३१), अकोला ४५ (३०), अमरावती ४३ (२८), ब्रम्हपुरी ४४ (२९), बुलडाणा ४२ (२९), चंद्रपूर ४४ (३०), नागपूर ४४ (२८), वर्धा ४५ (२९), यवतमाळ ४३ (२७)
------------------ 

No comments:

Post a Comment