Tuesday, June 17, 2014

कृषी विभाग करणार 13 पिकांचे भौगोलिक मानांकन

ग्रेट मिशन कन्सल्टन्सीला कंत्राट; शेतकरी समुहांमार्फत होणार कार्यवाही

पुणे (प्रतिनिधी) ः नाशिकची द्राक्ष, महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी व कोल्हापूरच्या गुळापाठोपाठ राज्यातील आणखी 13 प्रमुख कृषी व फलोत्पादन पिकांचे भौगोलिक उपदर्शन मानांकन नोंदणी (जीआय रजिस्ट्रेशन) चालू वर्षात करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यानुसार रत्नागिरी हापूस (रत्नागिरी), लासलगाव कांदा (नाशिक), जळगाव केळी, भरीत वांगे (जळगाव), सासवड अंजीर (पुणे), वेंगुर्ल्याचे काजू (सिंधुदुर्ग), घोलवडचे चिक्कू (ठाणे), सोलापूर डाळिंब (सोलापूर), सांगली हळद, सांगली बेदणा (सांगली), जालना मोसंबी (जालना), बीड सिताफळ (बीड), केशर आंबा (लातूर) या पिकांची जीआय नोंदणी होणार आहे.

जिऑग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्‌स ऍक्‍ट 1999 अंतर्गत कृषी व फलोत्पादन पिकांची नोंदणी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. जीआय नोंदणीसाठी प्रत्येक पिकासाठी सुमारे चार लाख रुपये याप्रमाणे यासाठी खर्च अपेक्षित आहे. याची निविदा प्रक्रीया कृषी आयुक्तालयामार्फत राबविण्यात आली. त्यात तीन संस्थांनी सहभाग घेतला. शेवटी पुण्यातील ग्रेट मिशन गृप कन्सल्टन्सी या खासगी संस्थेला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.

भौगोलिक उपदर्शन मानांकनाबाबत शेतकर्यांमध्ये जागृती करणे, त्यांचा संघ स्थापन करणे, ट्रस्ट ऍक्‍टखाली संघाची नोंदणी करणे, पिकाची संशोधनात्मक स्वरुपाची माहिती गोळा करुन नोंदणीसाठी चेन्नईतील देशपातळीवरील जी.आय. नोंदणी कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही ग्रेट मिशन कन्सल्टन्सीमार्फत येत्या ऑगस्ट अखेरपर्यंत होणार असल्याची माहिती कृषी अधिकारी गोविंद हांडे यांनी दिली.

भौगोलिक मानांकनासाठी पिकनिहाय क्षेत्र, गावे व शेतकरी निश्‍चित करुन त्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या शेतकर्यांचा समुह तयार करुन समुहा याबाबतचे प्रशिक्षण देऊन समुहाची नोंदणी करण्यात येणार आहे. सल्लागार संस्था व कृषी विभागाच्या स्थानिक यंत्रणेमार्फत येत्या महिनाभरात हे काम करण्यात येणार आहे. देशात सध्या सर्वच राज्यांनी पिकांच्या भौगोलिक मानांकनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले असून आत्तापर्यंत 65 पिकांची नोंदणी झाली आहे. यामध्ये कर्नाटक आघाडीवर आहे. राज्यात आत्तापर्यंत नाशिकची द्राक्ष, महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी व कोल्हापूरच्या गुळाचे भौगोलिक मानांकन झाले आहे.

*कोट
""राज्यातील कृषी व फलोत्पादन पिकांच्या स्थानिक वैशिष्ट्यांचे स्वामित्व हक्क, उत्पादनांचे बॅंडींग व विक्रीसाठी भौगोलिक चिन्हांकन फायदेशीर ठरणार आहे. सर्वच पिकांच्या बाबतीत शेतकर्यांना हे चिन्हांकन करणे शक्‍य होणार नाही. म्हणून कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे.''
- उमाकांत दांगट, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य
-----------(समाप्त)------------ 

No comments:

Post a Comment