Sunday, June 1, 2014

पूर्वतयारी खरिपाची ः भाग 3 - खरिपासाठी 40 लाख टन खतसाठा मंजूर

पुणे (प्रतिनिधी) ः केंद्र शासनाकडून राज्याला यंदा खरिपासाठी दीड लाख टन युरियाच्या राखिव साठ्यासह तब्बल 40 लाख 50 हजार टन खत साठा मंजूर झाला आहे. यामध्ये 16 लाख 50 हजार टन युरिया, 10 लाख टन संयुक्त खते, सहा लाख टन एसएसपी, पाच लाख टन डीएपी, अडीच लाख टन एमओपी व एक लाख टन इतर खतांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या खरिपातील खत वापरापेक्षा यंदा सुमारे 10 लाख टन खते जास्त उपलब्ध होणार आहेत. तालुकानिहाय नियोजनानुसार खत पुरवठा सुरळित सुरु असल्याने राज्यात कोठेही टंचाई जाणवणार नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

राज्यात गेल्या खरिपात 32 लाख 27 हजार टन रासायनिक खतांचा वापर झाला होता. त्यात सुमारे 12 लाख टनांची वाढ करत कृषी विभागाने चालू वर्षाच्या खरिपासाठी 44 लाख टन खतांची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र केंद्राने गेल्या वर्षीचा वापर व संभाव्य वाढ विचारात घेऊन 39 लाख टन खत साठा मंजूर केला. यात युरियाचा 15 लाख टन साठा आहे. मात्र प्रत्यक्षात गेल्या वर्षी सुमारे 16 लाख टन युरियाचा वापर झाल्याने संभाव्य तुटीमुळे समस्या निर्माण होण्याचा धोका लक्षात घेवून कृषी विभागामार्फत युरियाच्या वाढीव साठ्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. यानुसार केंद्राने दीड लाख टन युरियाचा संरक्षित राखिव साठा मंजूर केल्याची माहीती निविष्ठा व गुणनियंत्रण विभागामार्फत देण्यात आली.

- अतिरिक्त खतांची केंद्राकडे मागणी
राज्यातील शेतकर्यांची मागणी व वाढीव गरज लक्षात घेवून कृषी विभागाने केंद्राकडे आणखी अडीच लाख टन संयुक्त खते व 50 हजार टन युरियाची अतिरिक्त मागणी केली आहे.
ज्वारी, भात, मका, ऊस आदी पिकांना युरीयाची आवश्‍यकता असून बी.टी. कापसाचे क्षेत्र वाढत असल्याने युरियाची गरजही वाढली आहे. त्यात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून फलोत्पादन पिकांनाही संयुक्त खतांची मोठी मागणी आहे. यामुळे 10 लाख टनाऐवजी राज्यांच्या मागणीएवढा म्हणजेच 12 लाख 50 हजार टन संयुक्त खतांचा साठा उपलब्ध करावा, यासाठी राज्यामार्फत केंद्राकडे पाठपुरावा सुरु आहे.

- मंजूर व प्राप्त खतांमध्ये तफावत
गेल्या पाच वर्षांचा विचार करता मागणीएवढा खत साठा राज्याला कधीही उपलब्ध झालेला नाही. मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणत खत साठा उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात त्याहूनही काही लाख टन खते कमी मिळत असल्याचा प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. 2010-11 वर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांसाठी 77 लाखाची मागणी असताना एकूण 68 लाख 85 हजार टन खते मंजूर झाली व प्रत्यक्षात 70 लाख 25 हजार टन खत मिळाले. मात्र यानंतर गेली तीन वर्षे मंजूर खते व मिळणारी खते यांच्या प्रमाणात मोठा फरक पडला आहे. मंजूरीच्या तुलनेत 2011-12 मध्ये सुमारे 12 लाख टन, 2012-13 मध्ये सुमारे 25 लाख टन तर 2013-14 मध्ये सुमारे सहा लाख टन खते कमी मिळाली आहेत. या कालावधीत राज्यात पडलेला दुष्काळ आणि खतांच्या वाढलेल्या किमती यामुळे प्रत्यक्ष वापर कमी झाल्याने पुरवठा कमी झाला. यंदा मंजूरीच्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात हप्त्याहप्त्याने खतांचा पुरवठा होणार असल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

*चौकट
- जिल्हानिहाय मंजूर खत साठा (टन)
नगर 505900, अकोला 60600, अमरावती 97400, औरंगाबाद 235100, भंडारा 48300, बीड 204600, बुलडाणा 156600, चंद्रपूर 73800, धुळे 101900, गडचिरोली 29900, गोंदिया 34000, हिंगोली 98000, जळगाव 235900, जालना 158000, कोल्हापूर 172400, लातूर 93600, नागपूर 94900, नांदेड 206200, नंदुरबार 74600, नाशिक 204700, उस्मानाबाद 72800, परभणी 116700, पुणे 239800, रायगड 31000, रत्नागिरी 23300, सांगली 152200, सातारा 132100, सिंधुदुर्ग 31700, सोलापूर 241200, ठाणे 24100, वर्धा 55900, वाशिम 36500, यवतमाळ 156300

*चौकट
- खतांची मागणी व उपलब्धता (लाख टनात)
ग्रेड --- गेल्या खरीपातील वापर --- यंदाची मागणी --- केंद्राकडून मंजूर
युरिया --- 15.96 --- 17 --- 16.50
डीएपी --- 3.43 --- 5 --- 5
एमओपी --- 1.86 --- 2.50 --- 2
एनपीके संयुक्त खते --- 7.69 --- 12.50 --- 10
एसएसपी --- 3.13 --- 6 --- 6
इतर --- 0.20 --- 1 --- 1
एकूण --- 32.27 --- 44 --- 40.50
-------(समाप्त)---------- 

No comments:

Post a Comment