Thursday, June 26, 2014

विदर्भात उष्णतेची लाट

मॉन्सूनची प्रगती थांबलेलीच; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा कोरडा

पुणे (प्रतिनिधी) ः मॉन्सूनची महाराष्ट्रातील प्रगती थांबलेली असतानाच विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. कोकणातही पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. याच वेळी नागपूरसह काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार जावून उष्णतेची लाट आली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र आकाश अंशतः ढगाळलेले राहण्याचा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा व कोकण, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. किमान येत्या रविवारपर्यंत मॉन्सूनच्या राज्यातील वाटचालीत प्रगती होण्याचा किंवा पावसाचा जोर वाढण्याची फारशी शक्‍यता नसल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात अरमोरी येथे 40 मिलीमिटर, ब्रम्हपुरीत 30 मिलीमिटर, पवनी व लाखांदूर येथे 20 मिलीमिटर तर साकोली, गडचिरोली, धानोरा व देसाईगंज येथे प्रत्येकी 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. नागपूर येथे राज्यातील सर्वाधिक 40.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. पाठोपाठ चंद्रपूरमध्ये 39.6, ब्रम्हपुरी येथे 39.3, वर्ध्यात 39.2 तर नांदेड येथे 39 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, बंगालच्या उपसागराकडून किनारी भागात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने शनिवारी सकाळपर्यंत इशान्येकडील राज्यांसह संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज व तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशातील मॉन्सूनची वाटचाल 15 जून पासून थांबलेली असून ठिकठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, पश्‍चिम बंगाल, ओदीशा या राज्यांमध्ये पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता आहे.
--------------(समाप्त)---------------
26 june 

No comments:

Post a Comment