Saturday, August 1, 2015

पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) - येत्या दोन दिवसात कोकण व विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. सोमवारी (ता.३) सकाळपर्यंत कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार, विदर्भात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यातील सर्वाधिक १५० मिलीमिटर पाऊस रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे पडला. सोमवारपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कुलाबा (मुंबई) वेधशाळेने कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी (ता.३) सकाळनंतर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रात बुधवारी (ता.५) सकाळनंतर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मंगळवारपासून (ता.४) पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, वायव्य राजस्थान व लगतच्या भागावरील कमी दाबाचे क्षेत्र मध्य पाकिस्तान व पश्चिम राजस्थानवर सक्रीय आहे. बांग्लादेशच्या भागावर असलेल्या कमी तिव्रतेच्या चक्रीवादळाची (डीप डिप्रेशन) तिव्रता कमी होवून त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात (डिप्रेशन) झाले आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा मध्य पाकिस्तानपासून राजस्थानचा उत्तर पश्चिम भाग, दिल्ली, गोरखपूर, भागलपूर ते बांग्लादेशपर्यंत सक्रीय आहे.


शनिवारी (ता.१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यात ठिकठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये - कोकण - लांजा १५०, संगमेश्वर ९०, रत्नागिरी ८३, वैभववाडी, कणकवली, राजापूर प्रत्येकी ८०, कुडाळ, चिपळून, गुहागर प्रत्येकी ६०, खेड ५०, दापोली ४०, हर्णे, देवगड, सावंतवाडी, मालवण प्रत्येकी ३०, सुधागड, पाली, पोलादपूर, म्हसाळा, पनवेल, माथेरान, वेंगुर्ला प्रत्येकी २०, ठाणे, अलिबाग, भिरा, मानगाव, पेण, महाड, श्रीवर्धन प्रत्येकी १०

मध्य महाराष्ट्र - महाबळेश्वर, गगणबावडा प्रत्येकी ६०, शाहूवाडी ५०, पन्हाळा ३०, गारगोटी, हरसूल, इगतपूरी, राधानगरी, शिराळा प्रत्येकी २०, भोर, चंदगड, कोल्हापूर, पाटण, सांगली, वडगाव मावळ, वेल्हा, वाळवा, इस्लामपूर प्रत्येकी १०

घाटमाथा - कोयना ९०, ताम्हिणी ४०, शिरगाव, डुंगरवाडी प्रत्येकी ३०, शिरोटा, अम्बोणे, दावडी, खंद प्रत्येकी २०, लोणावळा, वळवण, वाणगाव, भिवपुरी, खोपोली प्रत्येकी १०

मराठवाडा - रेणापूर २०, चाकूर १०
-----------(समाप्त) ------------ 

No comments:

Post a Comment