Monday, August 24, 2015

स्मार्ट व्हिलेज साठी प्रतिक्रीया


सकाळ अॅग्रोवन व डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशन यांनी इस्त्राईल गव्हर्नमेंटच्या गुंतवणूकीतून राज्यातील पाच गावे स्मार्ट व्हिलेज बनविण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शेती व शेतकरी डोळ्यासमोर ठेवून गावाचा सर्वांगिन विकास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी ही अतिशय महत्वाची बाब आहे. रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधा, मृद व जलसंधारण, पिक पद्धती ते शेतमाल प्रक्रीया यावर भर देऊन कालबद्ध सर्वांगिन विकास साधण्याचा हा प्रकल्प निश्चितच लाभदायी व दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो. गावांच्या सर्वांगिन विकासाच्या या प्रकल्पासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देतो.

- विकास देशमुख, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य
---------------------------------------------
इस्रायलने अतिशय काटेकोर पाणी व्यवस्थापनातून कृषीकेंद्रीत विकास केला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अतिशय उत्तम काम करुन विकास साधलाय. त्यांचे काम पाहण्यासाठी जगभरातून लोक इस्त्राईलला जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही ते पाहून आले आहेत. अॅग्रोवन व डिलीवरींग चेंज फाऊंडेशन च्या माध्यमातून इस्त्राईल स्वतः महाराष्ट्रातील पाच गावे कृषीकेंद्रीत स्मार्ट व्हिलेज करणार असेल तर ती अतिशय महत्वाची संधी आहे. गावाच्या व गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगिन विकासासाठी हवे ते सारे काही यात आहे. अॅग्रोवनने सरपंच महापरिषदेच्या माध्यमातून राज्याच्या कृषीकेंद्रीत ग्रामविकासाला चालना दिली आहे. त्याचा हा पुढच्या टप्प्यात राज्यातील पाच गावे जगातील सर्वांगिन, एकात्मिक ग्रामविकासाची सर्वात सुंदर मॉडेल म्हणून विकसित होतील, असा विश्वास वाटतो. परकीय गुंतवणूकीतून सर्वांगिन ग्रामविकासाचा देशातील हा पहिला प्रकल्प आहे. ही पाच गावे स्मार्ट झाल्यानंतर पुढे ही देशभर चळवळ होईल.

- पोपटराव पवार, आदर्श सरपंच व कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना
------------------
गावाचा सर्वांगिन विकास करण्यात पायाभूत सुविधांचा अभाव ही सर्वात मोठी अडचण आहे. पाणी, विज, रस्ते, शेतमाल प्रक्रीया या सुविधा असतील तर चांगला विकास करता येतो. खैरेनगरमध्ये आम्ही सर्व पातळीवर प्रयत्न केला, बॅंकांचीही चांगली साथ मिळाली मात्र पाऊस व पाणीच नसल्याने सर्वजण कर्जबाजारी झाले आहेत. अॅग्रोवन व डिलिव्हरींग चेंज फाऊंडेशनचा इस्त्राईलच्या गुंतवणूकीतून राज्यातील पाच गावे स्मार्ट व्हिलेज म्हणून विकसित करण्याचा प्रकल्प आम्हा शेतकऱ्यांना विकासाची नवी शाश्वत दिशा दाखवू शकतो, असा विश्वास वाटतो. या प्रकल्पामध्ये गावाच्या आणि गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगिन विकासासाठी आवश्यक ते सर्व काही आहे. सध्या परिस्थिती वाईट आहे, पण यातूनही शेतीची प्रगती होईल, शेतकरी सावरेल, अशी आशा वाटते.

- रघुनाथ शिंदे, कोरडवाहू फलोत्पादक शेतकरी, खैरेनगर, ता. शिरुर, जि. पुणे.
--------------------

No comments:

Post a Comment