Tuesday, August 4, 2015

मराठवाड्यातील खरिप दुष्काळाच्या कचाट्यात

राज्यातील २६४ तालुक्यांत बिकट स्थिती, मराठवाड्यातील सर्व तालुके कोरडे

पुणे (प्रतिनिधी) - निम्मा पावसाळा उलटूनही पावसाने दगा दिल्याने राज्यातील तब्बल २६४ तालुक्यांना प्रचंड मोठा फटका बसला आहे. गुरांच्या चारा पाण्यापासून ते पिके उध्वस्त होण्यापर्यंत विविध पातळ्यांवर मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील सर्व तालुक्यात पावसाची आणि पावसाअभावी पिकांची अतिशय बिकट (क्रिटीकल) स्‍थिती असून खरिप हातचा गेल्यात जमा आहे. विदर्भ व कोकणासह राज्यात इतर ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असताना मराठवाड्यात मात्र पावसाने दडी मारलेली आहे.

नैऋत्य मोसमी पावसाच्या देशातील सर्व प्रदेशांचा विचार करता मराठवाड्यात देशात सर्वात कमी पाऊस पडला असून सरासरी पावसाच्या तुलनेतही घटही मराठवाड्यात सर्वाधिक (-५८) टक्के आहे. सरासरीच्या तुलनेत आत्तापर्यंत मराठवाड्यात फक्त ४२ टक्के, मध्य महाराष्ट्रात ७२ टक्के, कोकणात ७४ टक्के तर विदर्भात ७६ टक्के पाऊस पडला आहे. पश्चिम महाराष्ट्राती सोलापूर व कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या निम्म्याहून कमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर व जळगाव जिल्ह्यांत बिकट स्थिती आहे.

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहळ (सोलापूर), गेवराई, शिरुर कासार (बीड), चाकूर (लातूर), उस्मानाबाद (उस्मानाबाद), परभणी, पाथरी, जिंतूर, सोनपेठ (परभणी), लोणार (बुलडाणा), यवतमाळ, उमरखेड (यवतमाळ) या १५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 टक्क्यांहून कमी पाऊस पडल्याने येथिल कडक उन्हाळा अद्याप संपलेला नाही. याशिवाय २५ ते ५० टक्के पाऊस पडलेले १२६ तालुके आणि ५० ते ७५ टक्के पाऊस पडलेले १३३ तालुकेही पाण्याविना होरपळत आहेत. पडलेला पाऊस गेल्या दोन महिन्यात एकदम पडलेला असून त्यातून पेरणी होण्यापलिकडे फारसे काहीही हाती आलेले नाही. मुळात पावसाचे प्रमाण कमी आणि त्यात आणखी ५० ते ७५ टक्क्यांची घट यामुळे या तालुक्यांतील पिके हातची जावून खरिप उध्वस्त झाल्याची स्थिती आहे.

सरासरीच्या 25 ते 50 टक्के पावसाचे तालुके - वैभववाडी (सिंधुदुर्ग), नांदगाव, सुरगाणा, पेठ, येवला, चांदवड, देवळा (नाशिक), धुळे (धुळे), जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अंमळनेर, पारोळा, जामनेर, पाचोरा, भडगाव, बोधवड (जळगाव), कर्जत, जामखेड, शेगाव, पाथर्डी, नेवासा, राहूरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता (नगर), इंदापूर (पुणे), बार्शी, माढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा (सोलापूर), हातकणंगले, राधानगरी, गडहिंग्लज, चंदगड (कोल्हापूर), पैठण, सोयगाव (औरंगाबाद), जाफराबाद, जालना, अंबड, बदनापूर, घनसांगवी (जालना), बीड, पाटोदा, आष्टी, माजलगाव, आंबेजोगाई, केज, परळी, धारुर, वडावणी (बीड), लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, रेणापूर, दावनी, शिरुर अनंतमाळ, जळकोट (लातूर), तुळजापूर, परांडा, भूम, कळंब, उमरगा, लोहारा, वाशी (उस्मानाबाद), बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हादगाव, देगलूर, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव खुर्द (नांदेड), गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, मानवत (परभणी), कळमनुरी, बसमत, औंढा (हिंगोली), जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर, सिंदखेडराजा, खामगाव, शेगाव, नांदुरा (बुलडाणा), अकोट, तेल्हारा, पातूर, अकोला, बार्शीटाकळी (अकोला), मालेगाव, करंजा (वाशीम), बाभुळगाव, कळम, दारव्हा, दिग्रस, अर्णी, नेर, मोहगाव, वणी, मारेगाव, झरीजामनी, केळापूर, घाटंजी, राळेगाव (यवतमाळ), देवळी (वर्धा), चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, शिंदेवाही (चंद्रपूर), धानोरा (गडचिरोली)

- कमी दाबाच्या क्षेत्रात बदल ?
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात नैऋत्य मोसमी पाऊस चांगला पडण्यासाठी सर्वसाधारपणे तमिळनाडू किंवा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र चक्राकार वारे कमी दाबाचा पट्टा या हवामान स्थिती आणि अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर किनारी कमी दाबाचा पट्टा व चक्राकार वारे सक्रीय असणे उपयुक्त ठरते. यंदा उपसागरातील कमी दाबाशी संलग्न घडामोडींचा केंद्रबिंदू आंध्र तमिळनाडू ऐवजी बंगाल व बांग्लादेशच्या भागाकडे सरकल्याची स्थिती गेले दोन महिने होती. याच वेळी अरबी समुद्राच्या दक्षिण भागापेक्षा गुजरातलगतच्या उत्तर भागात या हवामानस्थिती अधिक सक्रीय होत्या. यामुळे राज्यातील पाऊसमानावर विपरीत परिणाम झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. हवामान विभागामार्फत अद्याप त्यास अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.
.
- विभागनिहाय पाऊस स्थिती
विभाग --- सरासरी --- पडलेला पाऊस --- सरासरीच्या तुलनेतील घट (टक्के )
कोकण --- १९१३.८ --- १४०९.५ --- २६
मध्य महाराष्ट्र --- ४११.२ --- २९४.१ --- २८
मराठवाडा --- ३५०.३ --- १४८.८ --- ५८
विदर्भ --- ५१५.७ --- ३९३.४ --- २४

- पावसाच्या प्रमाणानुसार तालुक्यांची संख्या व स्थिती
पावसाचे प्रमाण --- जून --- जुलै --- 1 जून ते आत्तापर्यंत
25 टक्क्यांहून कमी --- 2 --- 182 --- 15
25 ते 50 टक्के --- 26 --- 107 --- 126
50 ते 75 टक्के --- 59 --- 48 --- 133
75 ते 100 टक्के --- 77 --- 10 --- 62
100 टक्क्यांहून अधिक --- 189 --- 6 --- 17
--------------------------



No comments:

Post a Comment