Wednesday, August 26, 2015

यशोगाथा - भरत वाजेंची वेगळी वाट

शेतीला दिली प्रक्रीयेची साथ
भरत वाजेंची वेगळी वाट
-----------------
पिढ्यान पिढ्या पिक उत्पादनाच्या चक्रात व्यस्त असलेल्या शेतकरी कुटुंबासाठी शेतमाल विक्री किंवा प्रक्रियेचा वेगळा विचार करणं आणि तशी वाट धुंडाळणं ही तशी धाडसाची गोष्ट. मात्र कुटुंबाच्या पाठबळ आणि स्वतःची कल्पकता या जोरावर जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक (जि.पुणे) गावच्या भरत बाळु वाजे या युवकाने स्वतःच्या शेतीला शेतमाल प्रक्रीयेची जोड देवून विकासाची नवी वाट धरली आहे. त्याची वेगळी वाट व त्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी धडपड परिसरातील इतर तरुणांनाही शेतीतून काहीतरी वेगळं घडविण्यासाठी प्रेरक ठरत आहे.
-----------------
संतोष डुकरे
-----------------
मारुती नाना वाजे यांचे तीन मुले (बाळु, नारायण, बाबाजी), सुना,नातवंडांसह १५ जणांचे एकत्र कुटुंब. कुटुंबाची सुमारे १८ एकर पारंपरिक शेती. त्यात ऊस, घेवडा, वालवड, गवार, मिरची, दुधी भोपळा, बीट, मुग, गहू, बाजरी आदी पिकांचे उत्पादन घेतात. विहीर, नदीवरुन पाईपलान, बोअरवेल यातून पाण्याची वर्षभराची गरज भागते. भरत हा या कुटुंबातील नव्या पिढीचा प्रतिनिधी. त्याने बी कॉमनंतर पुण्यात नुकताच अकाऊंट मॅनेजरचा एक वर्षाचा अभ्यासक्रम केला आणि नोकरीचा शोध घेतला. पण ८-१० हजार रुपयांहून अधिक पगार मिळेना. इतर व्यवसायांमध्ये पगार अधिक मिळण्याची शक्यता होती, पण त्यात फ्युचर दिसत नव्हते.

कुटुंबाची शेतीची पार्श्वभूमी, सकाळ जॉब्झ पुरवणीतील व्यवसायविषयक मार्गदर्शन, डिस्कव्हरी चॅनलवरील फुड फॅक्टरी हा कार्यक्रम व जगप्रसिद्ध उद्योगपतीच्या आयुष्यावरील पुस्तकांतून त्याला उद्योजक होण्याची प्रेरणा मिळाली. मग कोणता व्यवसाय केला तर फायद्यात पडू शकतो, याचा शोध सुरु झाला. पुण्यातील खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांची पहाणी, इंटरनेटरील प्रोजेक्ट, उपलब्ध गाईडलाईन, मार्केट सर्वे हे सर्व टप्पे स्वतः पार केल्यानंतर बटाट्याच्या वेफर्सला मार्केटमध्ये मोठी मागणी असल्याचे प्रकर्षाने जाणवले. अनेक कंपन्या यात आहेत मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. अगदी स्थानिक तालुका पातळीवरही मोठी मागणी आहे, हे अभ्यासाअंती निश्चित झाल्यावर त्याने वेफर्स निर्मिती प्रकल्प उभारण्याचे नक्की केले.

व्यवसायाचा कच्चा आराखडा तयार केला. याच वेळी बरेच व्यवसायही पडताळून पाहिले. पण कमी भांडवल व कच्च्या मालाचा पुरवठा याचा ताळमेळ पाहता वेफर्स निर्मिती चांगले वाटले. बटाटा, तेल, पॅकेजिंगचे मटेरीयल सहज उपलब्ध होते. मग प्रोजेक्ट कसा तयार करायचा याची माहिती गोळा करण्यापासून सुरवात झाली. अनेक प्रकल्पांची पहाणी केली. नारायणगाव, पुणे, रांजणगावला घरगुती वेफर्स करुन विक्री करणारांच्या भेटी घेतल्या. पुर्वी हा व्यवसाय केलेल्या संभाजी गाढवे यांचे अनुभवाचे बोल त्याला मार्गदर्शक ठरले. वेफर्स निर्मितीची प्रोसेस फायनल करण्यासाठी इतर कंपन्यांच्या लोकांनाही त्याला सहकार्य केले. प्रत्येक १८ ग्रॅमच्या वेफर्सच्या पुड्यामागे किमान 5० पैसे निव्वळ नफा शिल्लक राहतो इथपर्यंत सर्व गणित जुळले आणि मग गुंतवणूकीसाठी त्याने कुटुंबासमोर प्रस्ताव ठेवला. कुटुंबियांनी भरतची कल्पना उचलून धरत प्रक्रीया केंद्र उभारणीचा श्रीगणेशा केला.

इंटरनेटवरील संकेतस्थळावरुन वेफर्स निर्मितीसाठी लागणाऱ्या मशीनरीची ऑनलाईन खरेदी केली. प्रक्रीया युनिटचा आत्मा असलेली मुख्य मशिन पाच लाख रुपयांना पडली. या पॅकिंग मशिनला हवा भरण्यासाठीचा कॉम्प्रेसर, वेफर्स जास्त काळ टिकून रहावी व तिची तव दिर्घकाळ रहावी यासाठी पुड्यात भरण्यासाठीचा नायट्रोजन, प्लॅस्टिक पॅकेजींग मटेरीयलची खरेदी केली. बटाट्याची साल काढण्यासाठीचे पोटॅटो पिलर, वेफर्सच्या चकत्या कापण्यासाठीचे कटर, वेफर्स सुकविण्यासाठीचा ड्रायर ही यंत्रे पुण्यातून खरेदी केली. एका इंजिनिअरींग फर्म कडून बटाटे धुण्यासाठीचे वॉशिंग युनिट व वर्किंग टेबल घेतले आणि शेतातच पत्र्याचे शेड करुन त्यात दरमहा दीड टन वेफर्स निर्मिती क्षमतेचे प्रक्रीया युनिट उभे केले. यासाठी सुमारे 20 लाख रुपये खर्च आला आहे.

ही सर्व सज्जता झाल्यानंतर यंदा 1 जूनपासून वेफर्स निर्मिती सुरु झाली आहे. बटाट्यासह सर्व कच्चा माल तो मंचर व नारायणगाव परिसरातून खरेदी करतो. बटाटा कमी असेल त्या वेळी याच ठिकाणी तो फरसाण निर्मितीही करतो. पहिल्या दोन महिन्यात दोन टन बटाट्याची वेफर्स तयार करुन त्याची तालुक्यातील किरकोळ दुकानांच्या साखळीमार्फत हातोहात विक्रीही झाली आहे. एक किलो बटाट्यापासून किमान 250 ग्रॅम वेफर्स तयार होतात. प्रत्येकी 18 ग्रॅमचे एक पॅकेट तयार केले जाते. त्याची कमाल विक्री किंमत पाच रुपये आहे. या एका पॅकेटमागे किमान 50 पैसे नफा हे आर्थिक गणित पहिल्या टप्प्यातच यशस्वी ठरले आहे.

वेफर्स निर्मितीसाठी मनुष्यबळ जास्त लागते, असा भरतचा अनुभव आहे. बटाटा निवडणे, धुणे, कापणे, सुकवणे, फ्राय करणे, पॅकिंग या सर्व कामांसाठी त्या त्या गोष्टीतील निष्नात कामगार लागतात. या कामाचा अनुभव असलेल्या लोकांकडून माहिती घेऊन भरतने यासाठी स्थानिक कामगार गोळा केले आहेत. कुटुंबातील सात जण, उत्तर प्रदेशातील दोन भैये (वेफर्स तळण्यासाठी), बटाटा धुण्यासाठी स्थानिक तीन व्यक्ती एवढे कामगार आहेत. प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून गुणवत्तेशी तडजोड न करण्याचा वाजे कुटुंबियांचा प्रयत्न आहे. एरवी पिक उत्पादनात मग्न असलेले कुटुंब आता शेतमाल प्रक्रियेत रंगले आहे.

- परिसरातील कोंडी फोडली
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार हे राज्यातील बटाटा उत्पादनाचे सर्वात मोठे केंद्र आहे. या ठिकाणी अनेक बड्या कंपन्या शेतकऱ्यांसोबत लागवडपूर्व करार करुन वेफर्स साठीच्या बटाट्याचे उत्पादन घेत आहे. बटाट्यावर आधारीत प्रक्रिया उद्योग सातत्याने चालू शकेल का, तोटा झाला तर काय... या आणि अशा अनेक शंकांनी इथले बटाटा उत्पादक अद्याप प्रक्रीयेत उतरलेले नाहीत. करार शेती करुन मोठ्या कंपन्यांना बटाटा पुरवठ्यापर्यंतच ते थांबलेले आहेत. भरतने स्वतःचे बटाटा उत्पादन नसतानाही परिसरातील ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने यंदा पहिल्या वर्षी स्थानिक व्यापाऱ्यांकडून बटाटा खरेदी केला असून येत्या वर्षापासून थेट शेतकऱ्यांशी करार करुन बटाटा खरेदीचे नियोजन आहे. याशिवाय स्वतःच्या गावातही शेतकरी गटामार्फत बटाट्याची करार शेती विकसित करण्याचा विचार आहे. याशिवाय तेलासाठी सुर्यफुलाच्या करार शेतीचाही अवलंब करणार आहे. यातून परिसरातील शेतकऱ्यांनाही या प्रक्रीयेत समावून घेण्याचा त्याचा विचार आहे.

- उत्पादन विक्रीची साखळी
गावोगाव खेड्यापाड्यात किराना मालाची, खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. या दुकानांना विविध प्रकारच्या वस्तुंचा पुरवठा करणारी स्वतंत्र साखळी कार्यरत असते. पुणे जिल्ह्यातील एकेका तालुक्यात अशा अनेक साखळ्या कार्यरत आहेत. भरत वाजेंनी पहिल्या टप्प्यात स्वतःच्या जुन्नर तालुक्यातील दुकानांच्या साखळीवर लक्ष केंद्रीत केले असून संबंधीत पुरवठादारांमार्फत वेफर्सचे वितरण सुरु केले आहे. उत्पादित होणारा सर्व मालाची विक्री त्याच महिन्यात पूर्ण होत असल्याचा त्याचा अनुभव आहे. दर वर्षी दहा टनाने वेफर्स उत्पादन वाढवायचे आणि त्यानुसार विक्री व्यवस्थाही इतर तालुके व जिल्ह्यांत विस्तारीत करायची असे त्याचे नियोजन आहे.

- स्वतःची कंपनी, स्वतःचा ब्रॅन्ड
अनेक जण करतात तसे सुट्ट्या स्वरुपाच्या वेफर्स तयार करुन विकण्याचा किंवा बड्या कंपनीला वेफर्स सप्लाय करण्याचा पर्याय भरतकडे होता. पण त्याने हे दोन्ही पर्याय आणि सुरक्षित धंद्याच्या दृष्टीने तसे करण्याचे अनेकांनी दिलेले सल्ले झुगारून कंपनी कायद्याअंतर्गत श्री राजमाता फुड्स अॅन्ड वेफर्स प्रा. लि या नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली. त्यासाठी फुड सेफ्टी स्टॅन्डर्ड अॅक्ट इन इंडिया यांचे लायसनही घेतले. आणि श्री हा स्वतःचा ब्रॅन्ड तयार केला. गुणवत्ता सर्वोत्तम देणार असू तर दुसऱ्याच्या नावाखाली आपला माल का विकायचा, आपल्यात व्यवसाय वृद्धीची क्षमता असताना स्वतःहून पायखुटी का घालून घ्यायची, हे त्याचे डेव्हलपमेंटचे साधे लॉजिक आहे.

- इच्छा असेल तर मार्ग दिसेल
शेती व संलग्न व्यवसाय किंवा शेतमाल प्रक्रीया विषयक कोणत्याही प्रकारचे शिक्षण, अनुभव किंवा प्रशिक्षण नसतानाही भरतने स्वतःचा प्रक्रीया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. कागदपत्र जमविण्यासाठी, गाईडलाईनसाठी बऱ्याच अडचणी आल्या. वेफर्स निर्मितीची स्टॅडर्ड पद्धतीपासून सर्व बाबी त्यांने स्वतः माहिती गोळा करुन, खातरजमा करुन व प्रयोग करुन अतिशय कमी वेळात व नगण्य खर्चात पूर्ण केल्या. या सर्व प्रवासात त्याने कुणाचीही विकतची सल्ला सेवा घेतली नाही. इंटरनेट, ओळखीच्या व्यक्ती, अनुभवी व्यक्ती यांच्याकडून माहिती मिळवली व त्यानुसार या लघुउद्योग प्रकल्पाची यशस्वी उभारणी केली. इच्छा असेल तर मार्ग दिसेल यानुसार भरतची शेतमाल प्रक्रीयेच्या वेगळ्या वाटेने वाटचाल सुरु असून त्याच्या धडपडीतून परिसरातील तरुणांनाही प्रेरणा मिळत आहे.
--------------------
भरत वाजे - 7775965025, 7387825756 

No comments:

Post a Comment