Thursday, July 9, 2015

हवामान बातमी

पुणे (प्रतिनिधी) - उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वाऱ्यांमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) उपसागराकडील शाखा सक्रीय झाली असून त्यापासून छत्तीसगड, मध्य प्रदेश, बंगाल, नागालॅन्ड, मनीपूर, मिझारोम व त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तुलनेत मॉन्सूनची अरबी समुद्रावरील शाखा शांत असून येत्या दोन दिवसात या बाजूने मॉन्सून सक्रीय होण्याची शक्यता नाही.

हवामान खात्याने येत्या सोमवारपर्यंत (ता.13) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीहून अधिक वाढ झाली. संपूर्ण विदर्भात कमाल तापमान सरासरीहून उंचावले आहे. नागपूर, ब्रम्हपुरी व वर्धा येथे सर्वाधिक 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये सर्वात कमी 24 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

दिवसभरात कोकण व विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. विदर्भात गोंदपिंप्री येथे 20 मिलीमिटर तर सालेकसा व गोंदिया येथे प्रत्येकी 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मॉन्सून सक्रीय झाला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील गंगानगरपासून हरियानातील हिस्सार, उत्तर प्रदेशातील आग्रा, मिर्झापूर, बिहार, झारखंड ते उपसागरापर्यंत सक्रीय आहे. राजस्थानमधील चक्राकार वारे मॉन्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्यात विलीन झाले आहेत. उपसागर आणि झारखंडनजिक सक्रीय असलेले कमी दाबाचे क्षेत्र बिहारकडे सरकले असून बिहार, झारखंड व बंगालच्या भागात सक्रीय आहे. या क्षेत्राशी संलग्न असलेले चक्राकार वारेही कायम होते. हे कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वारे शनिवारपर्यंत ओसरण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग व मध्य प्रदेशच्या उत्तर भागात समुद्रसपाटीपासून दोन किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत.

No comments:

Post a Comment