Saturday, July 18, 2015

पावसाचा जोर वाढला

पुणे (प्रतिनिधी) - बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रातही मॉन्सूनची अनुकूलता वाढल्याने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण भागात मॉन्सून आक्रमकपणे सक्रीय झाला असून उपसागरात आज (ता. १९) कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होणार आहे. कोकण व घाटमाथ्यासह राज्यात इतरत्रही पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्याने बुधवारपर्यंत (ता.22) कोकणात सर्वदूर, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.

बंगालच्या भागात समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमिटर उंचीपर्यंत सक्रीय असलेल्या चक्राकार वाऱ्यांचे रुपांतर रविवारी सकाळी कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याचा अंदाज आहे. हे क्षेत्र सक्रीय झाल्यानंतर देशातील पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा अनुपगड, चारु, आग्रा, गया, धनबाद ते बंगालच्या उपसागरापर्यंतच्या भागात समुद्रसपाटीच्या पातळीहून 3.1 किलोमिटर उंचीपर्यंत मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून तो त्याच्या दक्षिणेकडे झुकलेला आहे. मध्य भारतात जोरदार पाऊस पडण्याच्या दृष्टीने ही स्थिती अनुकूल समजली जाते.

विदर्भ व अरबी समुद्राच्या दक्षिण भागात ढगांची दाटी वाढली असून दक्षिण अरबी समुद्रात जोरदार पाऊस सुरु आहे. पश्चिम बंगाल कर्नाटकचा दक्षिण भाग, केरळात आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात मॉन्सून सक्रीय आहे. शनिवारी सकाळपर्यंत कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. मराठवाड्यात एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकणात कमाल तापमान सरासरीहून उंचावलेले तर किमान तापमान सरासरीहून किंचीत घसरलेले होते.

शनिवारी (ता.18) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये - कोकण - माथेरान 60, कानकोन, मडगाव, सांगे प्रत्येकी 50, केपे, वाल्पोई प्रत्येकी 40, दाभोलीम, कणकवली, कर्जत प्रत्येकी 30, फोंडा, सावंतवाडी, तळा प्रत्येकी 20, अंबरनाथ, दोडामार्ग, कल्याण, महाड, माणगाव, मार्मागोवा, म्हसळा, पनवेल, पेण, पोलादपूर, रोहा, शहापूर, श्रीवर्धन, सुधागड, पाली प्रत्येकी 10, मुंबई 4

मध्य महाराष्ट्र - गगणबावडा 50, महाबळेश्वर 30, इगतपुरी 20, आजरा, अक्कलकुवा, चंदगड, गारगोटी, पेठ, राधानगरी प्रत्येकी 10, पुणे 1, घाटमाथा - शिरगाव 80, दावडी 70, अम्बोणे 50, भिरा, डुंगरवाडी, कोयना, ताम्हिणी प्रत्येकी 40, लोणवळा, शिरोटा, वळवण प्रत्येकी 30, वाणगाव, भिवपुरी, खंद प्रत्येकी 20, खोपोली, ठाकूरवाडी प्रत्येकी 10

मराठवाडा - निलंगा, उमरगा प्रत्येकी 20, परभणी, सिल्लोड, सोयगाव प्रत्येकी 10
विदर्भ - समुद्रपूर, मालेगाव, वाशिम प्रत्येकी 30, महागाव 20, ब्रम्हपुरी 14, सेलू, देसाईगंज, पोंभुर्णा, आर्णी, मानोरा, पवनी, चिखली प्रत्येकी 10, वर्धा, यवतमाळ प्रत्येकी 3, अमरावती व बुलडाणा प्रत्येकी 2  

No comments:

Post a Comment