Friday, July 17, 2015

डी.डी. किसानच्या नावाने बोगस भरती प्रक्रीया सुरु


प्रशिक्षणासाठी पैशांची मागणी, नाशिकमधील प्रकरण उघडकीस

पुणे (प्रतिनिधी) - केंद्र सरकारमार्फत नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या डी.डी. किसान या दुरचित्रवाणी वाहिनीच्या नावाने अज्ञात व्यक्तींकडून बोगस भरती प्रक्रीया राबविण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या व्यक्तींनी भारतीय दुरसंचार केंद्राच्या नावाने उमेदवारांना नियुक्ती पत्र पाठवून आपली पत्रकार पदी निवड झाली असून प्रशिक्षणासाठी 15 हजार रुपये बॅंक खात्यात भरुन नोकरी नक्की करण्याचे आवाहन केले आहे. यातून राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे.

महिनाभरापुर्वी एका मराठी वृत्तपत्रात (सकाळ, अॅग्रोवन नव्हे) छोटी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात किसान वाहिनीत शेती पत्रकार म्हणून काम करण्यास इच्छूक असलेल्यांकडून पत्ता व संपर्क क्रमांक मागविण्यात आले. ही माहिती दिलेल्या व्यक्तींना संबंधीतांनी दुरध्वनीवर संपर्क साधून पाच प्रश्नांची मुलाखत घेतली आणि त्यानंतर दहा पंधरा दिवसात संबंधीतांना निवडपत्र पाठविण्यात आले. या सर्वांकडून प्रशिक्षणासाठी अनामत रक्कम म्हणून 15 हजार 500 रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

दूर संचार मंत्रालयाच्या प्रसारण विभागामार्फत भारत सरकारच्या रोजगार नियमावलीनुसार आपली डी.डी.किसान पत्रकार या पदावर आपली नियुक्ती करण्यात आली आहे. आपले मासिक वेतन 25,500 रुपये (वार्षिक 3.15 लाख) निश्चित करण्यात आले आहे. सर्व नियमांचे पालन करुन आपण आपली नोकरी निश्चित करण्यासाठी 15 हजार 500 रुपये बॅंक खात्यात भरावेत. सर्व माहितीची खातरजमा केल्यानंतर मुंबईत एक महिन्याचे प्रशिक्षण व पत्रकारिता पदविका प्रदान करण्यात येईल. त्याआधारे किसान वाहिनीत पत्रकार म्हणून रुजू करुन घेतली जाईल, असे अमिष उमेदवारांना दाखविण्यात आले आहे.

उमेदवारांनी कसलाही विचार न करता पैसे बॅंकेत जमा करावेत यासाठी प्रशिक्षणार्थी कालावधीत 18 हजार रुपये वेतन, रेल्वेने जाण्या येण्याचा खर्च, निवास, भोजन आदी खर्च किसान मार्फत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महिलांना त्यांच्या सोईच्या जिल्ह्यात तर पुरुषांना राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. शासन प्रत्येक उमेदवारावर 65 हजार रुपये खर्च करणार आहे. तुम्हाला फक्त 15 हजार 500 रुपये द्यायचेत व ते ही प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला परत केले जातील अशी लालूच दाखविण्यात आली आहे.

- चौकट
- भामट्याची पसंती कृषी भरतीला
गेल्या काही वर्षात भामट्यांमार्फत कृषी पदवीधर व पदविकाधारक उमेदवारांना रोजगाराचे अमिष दाखवून फसवणूक करण्यासाठी सातत्याने लक्ष करण्यात आले आहे. सेंद्रीय शेती प्रमाणिकरण संस्था, खादी ग्रामोद्योग भरती, केंद्रीय कृषी विभागात भरती, भारतीय कृषी संशोधन संस्थेत भरती अशा विविध बोगस जाहिराती देवून संबंधीत संस्थांच्या माहितीची, चिन्हांची नकल करुन उमेदवारांना थेट निवड झाल्याचे कळवायचे आणि त्यांना प्रशिक्षणासाठी 15 ते 50 हजार रुपये अनामत रक्कम भरायला सांगायचे. पैसे गोळा करुन पोबारा करायचा असा हा फंडा आहे. भामट्यांची ही टोळी दिल्लीतून हे सर्व रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे.

- कोट
जाहिरातीनुसार फक्त पत्ता पाठवला तर नियुक्ती पत्र आले. एवढ्या सहज नोकरी कशी मिळेल, ते ही फक्त फोनवर जुजबी मुलाखतीने. साडेपंधरा हजार रुपये भरण्याचा आग्रह पाहून हे प्रकरण बोगस असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पैसे भरले नाहीत.
- प्रतिक देशमुख, सिन्नर, नाशिक
----------------------------------------------

No comments:

Post a Comment