Wednesday, July 15, 2015

पुण्यात खरिप पिके खुरटली

- मृगाची पेरणी मोजतेय अखेरची घटका
- कृषी विभागाची दुबारसाठी तयारी सुरु

पुणे (प्रतिनिधी) - जिल्ह्यात पेरणी झालेली खरिप पिके वाढ खुंटलेल्या अवस्थेत तग धरुन आहेत. मात्र चालू आठवड्यात पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणात पिके हातची जावून दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत या दृष्टीने दुबार पेरणी हंगामाची तयारी सुरु करण्यात आली असून सोयाबीन व मका पिकाच्या बियाण्याची महाबीजला ऑडर देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार येत्या आठवडाभरात हे बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे.

गेल्या पाच वर्षात यंदा प्रथमच जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसावर मोठ्या प्रमाणात खरिप पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 84 हजार हेक्टर (36 टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत पेरण्या झाल्या नव्हत्या. यंदा बऱ्यापैकी पेरण्या उरकल्या असल्या तरी पावसाअभावी पिके हातची जाण्याचे संकट आहे. पेरणीची वेळ अद्याप उलटली नसली तरी हंगामाच्या सुरवातीलाच पेरलेली पिके पावसातील मोठ्या खंडामुळे जळू लागली आहे. भाताच्या रोपवाटीकांसह ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका या सर्वच पिकांची वाढ खुंटलेली आहे. चालू आठवड्यात पाऊस पडला नाही तर या सर्व पिकांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची धास्ती आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात भाताची रोपे लावणीच्या अवस्थेत आहेत. उर्वरीत भागात पिके चार पाने फुटव्यांच्या अवस्थेत आहेत. पावसातील खंडाचा सर्वात मोठा फटका सध्या भात पिकाला सहन करावा लागत आहे. आहेत ही रोपे हातची गेल्यास पुन्हा नवीन रोपे तयार करण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार असल्याने या शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पूर्णपणे नापेरीतच जाण्याचा धोका आहे. उर्वरीत भागात मका व सोयाबीनची लागवड होऊ शकते, अशा अंदाजाने कृषी विभागाचे नियोजन सुरु आहे. मात्र महाबीजकडे बियाण्याची मागणी नोंदविण्यापलिकडे कृषी विभागामार्फत याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही.

- कोट
भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, बारामती, पुरंदर आदी तालुक्यांतील पिकांची नुकतीच प्रत्यक्ष पहाणी केली. पिकांची वाढ खुंटली आहे. दुबार पेरणीची समस्या उद्भवलीच तर त्यासाठी महाबीजकडे यापुर्वीच बियाण्याची मागणी केली आहे. पुरेसा पुरवठा होणार आहे.
- एस. एम. काटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे
---------------------- 

No comments:

Post a Comment