Thursday, July 16, 2015

राज्य धरण पाणीसाठा

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा कालखंड असलेला पावसाळ्याच्या सुरवातीचा दीड महिना उलटल्यानंतरही पावसातील खंड कायम असल्याने राज्यातील जलसाठा यंदाच्या निचांकी पातळीवर पोचला आहे. त्यातही मराठवाड्यातील पाणीसाठ्यात गेल्या काही वर्षातील सर्वाधिक घट झाली आहे. राज्यात नऊ हजार 711 दशलक्ष घनमिटर (26 टक्के) तर मराठवाड्यात फक्त 470 दशलक्ष घनमिटर (6 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यात सध्या 84 मोठ्या धरणांमध्ये पाच हजार 186 दशलक्ष घनमिटर (24 टक्के), 222 मध्यम प्रकल्पांमध्ये एक हजार 275 दशलक्ष घनमिटर (27 टक्के) तर दोन हजार 195 लघु प्रकल्पांमध्ये 996 दलघमी (21 टक्के) पाणीसाठा आहे. राज्याची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 37 हजार 463 दशलक्ष घनमिटर आहे. मराठवाड्यातील जायकवाडी (औरंगाबाद), माजलगाव, मांजरा (बीड), तेरणा, सिना कोळेगाव (उस्मानाबाद) ही पाच मोठी धरणे पूर्णतः कोरडी पडली असून पूर्णा येलदरी प्रकल्पात एक टक्का तर पूर्णा सिद्धेश्वर प्रकल्पात दोन टक्के पाणी शिल्लक आहे. नांदेडमधील मनार प्रकल्पातही जेमतेम चार टक्के पाणी आहे.

विदर्भातील आसोलामेंढा (चंद्रपूर) तर नाशिकमधील तिसगाव, पुणेगाव प्रकल्पही कोरडे पडलेले आहेत. पुणे विभागात पिंपळगाव जोगे, घोड (पुणे) व उजनी (सोलापूर) ही तीन धरणे अद्याप कोरडी आहेत. कोकणात पालघर जिल्ह्यातील सूर्या कवडास प्रकल्प (10 दलघमी) 100 टक्के भरला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरण 48 टक्के भरले आहे. पुणे विभागातील गुंजवणी धरण पूर्ण भरले आहे. राज्याच्या विजनिर्मितीच्या दृष्टीने महत्वाचे कोयना धरण 46 टक्के भरलेले आहे.

गेल्या आठ दिवसात कोकण, नागपूर व पुणे विभागातिल धरणांमध्ये पाणीसाठ्यात अल्पशी वाढ झाली आहे. मराठवाड्यासह उर्वरीत सर्व विभागातील जलसाठ्यात वेगाने घट सुरु आहे. मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठ्याने गेल्या काही वर्षातील निचांकी (6 टक्के) पातळी गाठली आहे. गेल्या वर्षी या वेळी राज्यात 19 टक्के तर त्याआधी (2013) सुमारे 40 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

- चौकट
- राज्यातील एकूण जलसाठ्यांची सद्यस्थिती
विभाग --- प्रकल्पांची संख्या --- उपयुक्त जलसाठा (दलघमी) --- उपयुक्त जलसाठा (टक्के)
कोकण --- 158 --- 845 --- 50
मराठवाडा --- 806 --- 470 -- 6
नागपूर --- 366 --- 1136 --- 28
अमरावती --- 452 --- 930 --- 32
नाशिक ---- 350 --- 973 --- 20
पुणे -- 369 --- 3103 --- 30
इतर धरणे --- 16 --- 2254 -- 37
एकूण ---- 2517 --- 9711 --- 26
--------------------------------------------- 

No comments:

Post a Comment