Monday, June 1, 2015

आपत्तीग्रस्त पिक क्षेत्र 117 लाखांवर

- वर्षभरात 99.12 लाख शेतकरी बाधित
- खरीपात आपत्कालिन पेरणीसाठी बियाणे कमी
- विद्यापीठांना पेलावे लागणार आपत्तीचे आव्हाण

पुणे (प्रतिनिधी) - गेल्या वर्षभरात दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील 117 लाख चार हजार हेक्टर पिक क्षेत्र व 99 लाख 12 हजार शेतकरी बाधित झाल्याची माहिती कृषी विभागामार्फत चारही विद्यापीठांपुढे सादर करण्यात आली. याच वेळी यंदाच्या खरीपात आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास उशीराची पेरणी व दुबार पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध नसल्याचीही बाब पुढे आली आहे.

कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या सल्ल्यानुसार सर्व जिल्ह्यांचे आपत्कालिन नियोजन तयार केले आहे. यासाठी हैद्राबादमधील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेच्या (क्रिडा) पुढाकाराने पंधरा दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली. यातून आपत्कालिन परिस्थितितील बियाण्याची गरज निश्चित करण्यात आली आहे. मात्र या पिकांचे बियाणे विद्यापीठे व महाबिजकडून पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने तुटवडा जाणविण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतची माहीती जॉईंट अॅग्रेस्कोमध्ये देण्यात आली.

यंदा पेरणीयोग्य पाऊस पडण्यास 15 दिवसांचा उशीर झाला तर मुग, उडीद व भुईमुग या पिकांची पेरणी करता येणार नाही. या 15 ते 30 दिवस विलंबाच्या कालावधीत बाजरी, तुर, सुर्यफुल व सोयाबीन ही चार पर्यायी पिके पेरता येतील. त्याहून अधिक उशीर झाल्यास बाजरी पेरता येणार नाही. तुर, सुर्यफुल व सोयाबीन या पिकांचीच पेरणी करावी लागेल.  या अनुषंगाने पर्यायी पिकांच्या अतिरिक्त बियाण्याची गरज भासू शकते. मात्र अशी स्थिती उद्भवल्यास कृषी विभागाकडे या पिकांच्या अवघा 35 ते 45 हजार क्विंटल उपलब्धतेचे नियोजन आहे. प्रत्यक्षात गरज 1.74 ते 2.85 लाख क्विंटल बियाण्याची आहे.

भात, बाजरी व सोयाबीन यांची दुबार पेरणी करण्याची वेळ उद्भवल्यास भाताचे उशीराचे वाण, बाजरी व सोयाबीन यांच्या सुमारे सहा लाख क्विंटल अतिरिक्त बियाण्याची गरज भासणार आहे. प्रत्यक्षात कृषी विभागाकडे फक्त 53 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यामुळे या तीनही पिक उत्पादन शेतकऱ्यांना कृषी विभागावर विसंबून न राहता स्वतःच आपत्कालिन परिस्थितीत दुबार पेरणीसाठी आवश्यक बियाण्याची तजविज करावी लागणार आहे.

- चौकट
आपत्कालिन स्थितीचे बियाणे नियोजन
पावसास उशीर --- आवश्यक बियाणे --- उपलब्ध बियाणे --- कमतरता
15 दिवस ---  1.74 --- 0.45 --- 1.29
30 दिवस --- 2.85  --- 0.45 ---  2.40
45 दिवस --- 1.74 --- 0.35 --- 1.39
दुबार पेरणी --- 5.92 --- 0.53 --- 5.39

- चौकट
हवामान बदलाचा राज्यातील शेतीवरील परिणाम
वर्ष --- बाधित क्षेत्र (लाख हेक्टर) --- बाधित शेतकरी (लाख)
2010-11 --- 12.52 --- 16.41
2011-12 --- 29.62 --- 33.48
2012-13 --- 55.44 --- 63.87
2013-14 --- 39.60 --- 99.12
2014-15 --- 117.04 --- 99.12
(दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट इ. आपत्तीने बाधीत)
-------------------------

No comments:

Post a Comment