Friday, June 5, 2015

विना अनुदानित शिक्षकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह


प्राध्यापक भरतीत सवलत नाकारली; वयोमर्यादेचा नियम ठरला अडकाठी

पुणे (प्रतिनिधी) - कृषी विद्यापीठांच्या सहयोगी प्राध्‍यापक व सहायक प्राध्यापक भरतीत राज्यातील कामस्वरुपी विना अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांची नक्की पात्रता काय, अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे शासकीय व अर्धशासकीय सेवेतील शिक्षकांसाठी या भरतीत वयोमर्यादा शिथिल करण्यात आली असताना कायमस्वरुपी विना अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांना हीच सवलत नाकारण्यात आली आहे. या मुद्यावर अनेक शिक्षकांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रीयेवर हरकत घेतली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात सध्या सहायक प्राध्यापकांच्या ६८ व सहयोगी प्राध्यापकांच्या ३२ पदांची भरती प्रक्रीया सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी निवड समितीकडे अर्ज पाठवले असून छाणनी समितीमार्फत छाणनी करण्यात आली आहे. या छाणनीत राज्यातील कायमस्वरुपी विना अनुदानित महाविद्यालयातील अनेक शिक्षकांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. अर्ज बाद झालेले बहुतेक शिक्षकांना वयोमर्यादेचा नियम लावण्यात आला आहे. याच वेळी शासकीय व अर्धशासकीय संस्थांमधील शिक्षकांना ही सवलत देण्यात आली आहे. हीच सवलत विना अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांनाही द्यावी, अशी मागणी आहे.

भारती विद्यापीठाच्या कडेगाव सांगली येथिल उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक सुहास माने यांनी या प्रकरणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेवर हरकत घेतली आहे. याबाबत पत्र त्यांनी विद्यापीठाच्या निवड समितीच्या सचिवांना पाठविले आहे. विना अनुदानित महाविद्यालयांची मान्यता, कामकाज, प्रवेश, सहायक प्राध्यापक मुलाखती, नेमणूका, पेपर तपासणी इ सर्व बाबी विद्यापीठे व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या मान्यतेने त्यांच्याच नियंत्रणात पार पडतात. अशा स्थितीत या महाविद्यालांतील सहायक प्राध्यापकांची सेवा कृषी विद्यापीठांतील पदभरतीसाठी अपात्र कशी ठरते, असा सवाल श्री. माने यांनी उपस्थित केला आहे.

- चौकट
- भरतीला स्थगिती ?
विना अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांच्या मागणीबाबत महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे चौकशी केली असता राहूरी विद्यापीठातील या भरतीला कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी तात्पुरती स्थगिती दिली असून भरतीतील प्रशासकीय बाबींची पडताळणी करण्याचे आदेश कृषी परिषदेला देण्यात आले अाहेत. लवकरच याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

- अनुभव ग्राह्य, सवलत नाही
‘‘खासगी महाविद्यालयांमधील शिक्षकांचा अनुभव ग्राह्य धरलेला आहे. मात्र हे शिक्षक शासकीय किंवा अर्धशासकीय सेवेत मोडत नसल्याने त्यांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आलेली नाही. अपात्र उमेदवारांना छाणनी समितीमार्फत माहिती दिली जाईल.’’
- सुनिल वानखेडे, कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी
-----------(समाप्त)------------

No comments:

Post a Comment