Monday, June 1, 2015

हवामान बदलाची नुकसान पातळी ठरवा

लोगो - जॉईंट अॅग्रेस्को 2015
------------------------
फलोत्पान विभागाचे विद्यापीठांना आवाहन

-कोट
फळपिक विम्याचे निकष ठरवणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी कुलगुरुंनी वेळ काढून आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पिकांचे जिल्हानिहाय निकष ठरवावेत. येत्या आंबिया बहारापासून तत्काळ त्याचा अवलंब करता येईल.
- डॉ. सुधीरकुमार गोएल, अप्पर मुख्य सचिव, कृषी व फलोत्पादन विभाग

राहुरी, जि. नगर (विशेष प्रतिनिधी) - राज्याच्या विविध भागात फळपिकांवर कोणत्या हवामान घटकाचा कोणत्या पातळीवर कोणता वाईट परिणाम होतो, याची काहीच माहिती उपलब्ध नाही. यामुळे फळपिक विमा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत. विद्यापीठाच्या शास्रज्ञांनी आत्तापर्यंत हॉर्टीकल्चरमध्ये जेवढे काही ज्ञान कमावले आहे, ते सर्व पणाला लावून फळपिक विम्यासाठीचे पिकनिहाय निकष (ट्रिगर) ठरवण्यासाठी फलोत्पादन विभागाला मदत करावी, असे आवाहन फलोत्पादन विभागामार्फत करण्यात आले.

राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. सुदाम अडसूळ यांनी राज्यातील फलोत्पादनाची स्थिती व अडचणी याविषयीची माहिती येथे राज्यभरातील शास्रज्ञांसमोर सादर केली. विविध हवामान घटकांची विविध पिकांसाठी विविध जिल्ह्यांमध्ये नुकसानीची पातळी काय आहे, त्यामुळे किती नुकसान होते याबाबतची काहीही माहीती फलोत्पादन विभागाकडे नसल्याची कबुली देत विद्यापीठांनी ही माहीती पुरवावी अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात गेली तीन वर्षे फळपिक विमा योजना राबवली जात आहे. त्यासाठीचे निकष विद्यापीठाचे शास्रज्ञ, उत्पादक संघांचे प्रतिनिधी, विमा कंपन्या या सर्वांच्या संमतीनेच निश्चित केलेले आहेत. मात्र हे निकष चुकीचे असल्याचे आणि नुकसान होऊनही भरपाई मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. खुद्द कृषीमंत्र्यांच्याच जिल्ह्यात केळी पिकाबाबत शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले आहे.

शासनाने कंपन्यांना विमा हप्त्यासाठी 12 टक्क्यांची कमाल मर्यादा घालून दिली होती. मात्र गेली तीन वर्षे सातत्याने मिळालेल्या विमा हप्त्यापेक्षा अधिक भरपाई कंपन्यांना अदा करावी लागली आहे. यामुळे कंपन्यांनी आता विमा हप्त्याचे दर 36 ते 72 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. अशा स्थितीत हवामान घटकामुळे होणाऱ्या नुकसानीची पातळी व त्यानुसार विम्याचे निकष ठरवणे अत्यावश्यक आहे. फलोत्पादन विभागाकडे याबाबत कोणताही माहिती उपलब्ध नसल्याने विद्यापीठांनी याबाबत मार्गदर्शन करावे, असे डॉ. अडसूळ यांनी यावेळी सांगितले.

- चौकट
आधी शास्रज्ञांना माहिती द्या : डॉ. व्यंकटेश्वरलू
हवामान घटकांमुळे पिकांचे होणारे नुकसान, त्याचे निकष आणि पिक विमा पद्धती याविषयी आमच्या शास्रज्ञांमध्ये जागृती (अवेअरनेस) नाही. शास्रज्ञ त्यांच्या विषयात एक्सपर्ट असले तरी हा विषय नवीन आहे. फलोत्पादन विभागाने प्रथम या विषयीची सविस्तर माहीती द्यावी. त्यानुसार त्यावर काम करता येईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू यांनी यावेळी केले. यावर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकरी, अधिकारी, शास्रज्ञ या सर्वांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा घेवू, असे डॉ. अडसूळ यांनी सांगितले.

- चौकट
फळपिक हवामान विमा योजना
वर्ष -- संरक्षित क्षेत्र (हेक्टर) --- सहभागी शेतकरी --- लाभधारक --- लाभ (लाख रुपये)
2011-12 --- 48,349 --- 45,188 --- 10,562 --- 4500
2012-13 --- 83,551 --- 86,218 --- 34,315 --- 9718
2013-14 --- 51,441 --- 50,373 --- 25,240 --- 9346
2014-15 --- 71,942 --- 64,703 --- 4,219 --- 1163
-------------------------

No comments:

Post a Comment