Friday, June 5, 2015

उन्हाळी पावसात कैक पटीने वाढ


पूर्वमोसमी पाऊस सरासरीपार; गारपिटीचे प्रमाणही वाढले 

पुणे (प्रतिनिधी) - देशात यंदा पावसाचा पूर्वमोसमी हंगाम समजल्या जाणाऱ्या १ मार्च ते ३१ मे या तीन महिन्यांच्या कालावधीत सरासरीहून ३८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात या पावसाचे प्रमाण विक्रमी प्रमाणात वाढले असून विदर्भात सरारीहून तिप्पट, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात दुप्पट तर कोकणात एका पटीने वाढ झाली आहे. यात सर्वाधिक वाटा मार्च महिन्यात राज्यात सर्वदूर झालेल्‍या गारपीटीचा आहे. गारांच्या पावसाचे वाढलेले प्रमाण व तिव्रता हे या वर्षीच्या पूर्वमोसमी हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

देशातील विविध हवामान उपविभागांतील पूर्वमोसमी पावसाचा विचार करता पंजाब, राजस्थान, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा व गुजरात या विभागांमध्ये पावसाच्या प्रमाणात सरासरीहून कित्येक पटींनी वाढ झाली आहे. तर अरुणाचल प्रदेश, नागालॅन्ड, मनिपूर, मिझोरम, त्रिपूरा, ओरिसा व आंध्र प्रदेशच्या किनारी भागात पावसाच्या प्रमाणात उल्लेखनिय घट झाली आहे. पश्चिम बंगाल, आसाम व मेघालय, अंदमान व निकोबार बेटे या भागात सरासरीएवढा पाऊस पडला आहे. हंगामातील पावसाचे प्रमाण पाहता नैऋत्य मोसमी पावसाचे प्राबल्य असलेल्या भागात सरासरीहून एक ते पाच पटींनी अधिक पाऊस तर ईशान्य मोसमी पावसाचे प्राबल्य असलेल्या भागात सरासरीहून उल्लेखनिय कमी पाऊस पडल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रातील पूर्वमोसमी पावसाचे वितरण असमान असून विदर्भात सरासरीहून सर्वाधिक ३४८ टक्के, मराठवाड्यात २७६ टक्के, मध्य महाराष्ट्रात २०० टक्के तर कोकणात १३९ टक्के पाऊस पडला आहे. पावसाच्या टक्केवारीप्रमाणेच पडलेल्या पावसाचे प्रमाणही याच क्रमाने विदर्भात सर्वाधिक १०७.४ मिलीमिटर तर कोकणात सर्वात कमी ५१.६ मिलीमिटर आहे. म्हणजेच राज्यातील पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी कमी होत गेला आहे. या एकूण पावसातील जवळपास निम्मा पाऊस एकट्या मार्च महिन्यात पडला आहे.

महिनानिहाय पावसाचे वितरण पहाता मार्च महिन्यात महाराष्ट्रातील पावसाची सरासरी अत्यल्प आहे. त्यातही हा पाऊस थोड्याफार प्रमाणात विदर्भात पडतो. यंदा मात्र विदर्भातील पावसाच्या प्रमाणात भरिव वाढ होण्याबरोबरच मध्य महाराष्ट्र्तील काही जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या बरोबरीने पाऊस पडला. उर्वरीत महाराष्ट्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली. यातील बहुतेक ठिकाणी गारांच्या स्वरुपात पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एप्रिल महिन्यात राज्यात फारसा पाऊस पडत नाही अशी सरासरी स्थिती आहे. या कालावधीत यंदा कोल्हापूर, नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यात बहुतेक ठिकाणी अत्यल्प स्वरुपाचा पाऊस पडला. पावसाचे प्रमाण एक ते दहा मिलीमिटरदरम्यान राहीले. मे महिन्यात विदर्भात व पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला.
---------------
- देशातील पूर्वमोसमी पाऊस (२०१५)
महिना --- सरासरी (मिलीमिटर) --- यंदाचा पाऊस (मिलीमिटर)--- टक्केवारी
मार्च --- ३०.९ --- ६१.१ --- १९७.७
एप्रिल --- ३८.३ --- ६६.७ --- १७४
मे --- ५४.४ --- ६२.३ --- ८७.४
---------------
- असा बरसला पूर्वमोसमी (१ मार्च ते ३१ मे २०१५)
विभाग --- सरासरी --- पडलेला पाऊस --- टक्केवारी
विदर्भ --- ३०.९ --- १०७.४ --- ३४८
मराठवाडा --- ३०.३ --- ८३.८ --- २७६
मध्य महाराष्ट्र --- ३८.७ --- ७५.५ --- २००
कोकण --- ३७ --- ५१.६ --- १३९
(सर्व आकडेवारी स्त्रोत - भारतीय हवामानशास्त्र विभाग)
----------------





No comments:

Post a Comment