Monday, June 1, 2015

गरज-संशोधनात दहा वर्षांचा गॅप

पुणे (प्रतिनिधी) - राज्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना विशेषतः बियाण्याच्या बाबतीत दहा वर्षाहून जुन्या संशोधनाचा विचारही करु नये. हे कालबाह्य संशोधन रद्द करुन दहा वर्षाच्या आतील संशोधनाचाच अवलंब करावा, असे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्ये व विद्यापीठांना दिले आहेत. मात्र महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, मका यासह अनेक पिकांचे दहा वर्षाच्या आतील वाण उपलब्धच नसल्याने कृषी विभाग व महाबीज यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. याशिवाय शेतपातळीवर हवामान घटकातील बदलांच्या परिणामांची दखल विद्यापीठांमार्फत घेण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची गरज आणि विद्यापीठांचे संशोधन यातील दरी अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांकडून विद्यापीठांकडून गेल्या १० वर्षात संकरित ज्वारी, संकरित बाजरी, संकरित मका, संकरित सुर्यफुल, संकरित देशी कपाशी, सुधारित ज्वारी, नागली, हिरवळीची खत पिके, चारा पिके व भाजीपाला पिकांचा एकही नवीन वाण उपलब्ध झालेला नाही. लाखलाखोडी, जवस या पिकांचे प्रमाणित बियाणे व वाणही गेल्या १० वर्षात मिळालेले नसल्याचे महाबीजमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या सर्व पिकांच्या वाणांसाठी शेतकऱ्यांना पूर्णपणे खासगी कंपन्यांवर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र यातील अनेक पिकांचे बियाणे खासगी कंपन्यांकडूनही उपलब्ध होत नसल्याने संबंधीत पिकांचा विकासच थांबतो की काय अशी स्थिती आहे.

राज्यातील कृषी हवामानात गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून त्याचे विपरित परिणाम पिकांवर होत आहे. फुलगळ, फळगळ, झाडे वाळून जाणे, थंडीचा वा उष्णतेचा शॉक यामुळे पिकांची अजैविक ताण सहन करण्याची क्षमता कमी होत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे. राज्यात एकीकडे एवढी मोठी उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे कृषी विद्यापीठांनी कृषी हवामान आणि त्याचे पिकांवरील परिणाम या मुलभूत गोष्टीकडेच दुर्लक्ष झाल्याची बाबत संयुक्त संशोधन व विकास समितीच्या बैठकीत प्रकर्षाने पुढे आली.

या अनुषंगाने आंबा पिकावर हवामान घटकांतील बदलाचे परिणाम नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र इतर कोणत्याही पिकांच्या बाबतीत हवामान घटकांच्या परिणामांची दखल घेण्याचा निर्णय झालेला नाही. म्हणजेच हे सर्व विद्यापीठ पातळीवर बेदखल राहणार की काय अशी स्थिती आहे. नगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी किमान तापमानाचा पारा तीन अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरुन पिकांना मोठा स्ट्रोक बसला. याची आणि यासारख्या घटनांची दखल विद्यापीठांनी संशोधन पातळीवर घेतल्याचे आढळून येत नाही. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी हवामान घटकांचे पिकांवर होणारे परिणाम वर्षभर नोंदवून त्याबाबत संशोधनात्मक कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

- कोट
गेल्या काही वर्षात शेतावरील परिस्थिती बदलली आहे. नैसर्गिक आपत्तींसह किड रोगांचा प्रादुर्भावही वाढलाय. जुने पुराणे वाण या परिस्थितीला बळी पडताहेत. विद्यापीठांकडून बदलत्या हवामानातही तग धरतील, चांगले उत्पादन देतील असे वाण मिळावेत, एवढीच मागणी आहे.
- दत्ता राऊत, शिक्रापूर, ता. शिरुर, पुणे
----------(समाप्त)-------------

No comments:

Post a Comment