Thursday, June 4, 2015

प्राध्यापक बदलण्यासाठी विद्यार्थ्यांचे आदोलन

सातारा (प्रतिनिधी) - शिरवळ येथिल क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फार्माकोलॉजी या विषयाचे प्राध्यापक बदलून मिळावेत, या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शनिवारी (ता.६) होणाऱ्या प्रात्यक्षिक परिक्षेपुर्वी संबंधीत विषयासाठी प्राध्यापक बदलून मिळावेत, अन्यथा शनिवारपासून उपोषणास बसण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

महाविद्यालयातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ॲग्रोवनला पत्र पाठवून याबाबतची भुमिका मांडली आहे. या विद्यार्थ्यांची तिसऱ्या वर्षाची लेखी परिक्षा पार पडली असून सध्या प्रात्यक्षिक परिक्षा सुरु आहेत. फार्माकोलोजी या विषयाच्या प्राध्यापिका विद्यार्थ्यांना खुन्नस धरुन नाहक त्रास देतात, परिक्षेत बघून घेते अशा धमक्या देतात, मुद्‍दाम नापास करतात, अतिशय अवघड पेपर काढतात या सर्व बाबींमुळे विद्यार्थी नापास होत असून त्यांच्यावरील मानसिक दबाव वाढण्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शनिवारी होणाऱ्या प्रात्यक्षिक परिक्षेत या प्राध्यापिका असल्यास त्या अनेक विद्यार्थ्यांना नापास करतील अशी भिती विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत मंगळवारी (ता.२) आंदोलन करुन महाविद्यालयाला मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे.

- कोट
‘‘मुलांची शिक्षिकेविषयी तक्रार आहे. त्या अनुषंगाने आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. हा काही फार मोठा इश्यू नाही. सॉर्ट आऊट होवून जाईल.’’
- डॉ. ए. एस. बन्नाळीकर, अधिष्ठाता, क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ 

No comments:

Post a Comment