Monday, June 1, 2015

राहूरी विद्यापीठावर आज विद्यार्थ्यांचा मोर्चा

- परभणी विद्यापीठात आज बंद ?
कृषी परिषदेच्या जाचक अटींविरुद्ध वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बंद ची हाक दिली आहे. विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेमार्फत अध्यक्ष कृष्णा होगे, सचिव सारंग काळे, संजय चिंचाणे, कृष्णा वरखड, मनोज डोंबे आदी विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.१) विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांना मागण्यांचे निवेदन दिले. कुलसचिवांनी या मागण्या कृषी परिषदेला कळविण्याचे आश्वासन दिले. मात्र या प्रश्नी निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून (ता.२) विद्यापीठ बंद चा इशारा दिला आहे.

पुणे (प्रतिनिधी) - कृषी पदवीचे पाचवे व सहावे सत्र संपूर्ण उत्तीर्ण असल्याशिवाय सातव्या सत्रास प्रवेश न देण्याच्या कुलगुरु समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या (कृषी परिषद) निर्णयाविरोधात मंगळवारी (ता.२) कृषी पदवीधर संघटनेमार्फत पश्चिम महाराष्ट्रातील विविध कृषी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

यापुर्वी कृषी पदवीच्या सातव्या सत्रास प्रवेश घेताना चौथ्या सत्रापर्यंतचे सर्व विषय उत्तीर्ण असणे बंधनकारक होते. कृषी परिषदेने हा निर्णय बदलून सहाव्या सत्रापर्यंतचे सर्व विषय उत्तीर्ण असणे बंधनकारक केले. गेल्या दोन वर्षात पाचव्या व सहाव्या सत्रात काही विषय अनुत्तिर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असल्याने त्यांच्या शिक्षणात एक वर्षाचा खंड पडण्याचा धोका उद्भवला आहे. कृषी पदवीधर संघटनेच्या माहितीनुसार सुमारे सात हजार विद्यार्थ्यांना या जाचक निर्णयाचा फटका बसत आहे. संघटनेमार्फत गेली वर्षभर कृषीमंत्री, कृषी परिषद, विद्यापीठे यांना अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही.

सातव्या सत्राची (रावे) प्रवेश प्रक्रिया कृषी व संलग्न महाविद्यालयांमध्ये नुकतीच सुरु झाली आहे. मात्र यात प्रवेशप्रक्रियेतून सहाव्या सत्रापर्यंतचे सर्व विषय उत्तीर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राहूरी येथे विद्यापीठासमोर रास्ता रोको करण्याची परवानगी विद्यार्थ्यांनी पोलीसांकडे मागितली होती. मात्र ती नाकरण्यात आल्याने विद्यार्थ्यांमार्फत विद्यापीठ गेट पासून कुलगुरु कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेच्या विद्यार्थी सेलचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयदिप ननावरे यांनी सांगितले.  

No comments:

Post a Comment