Monday, June 1, 2015

राज्यात यंदा सरासरीच्या ९५ टक्के पाऊस


डाॅ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज; पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता

- कोट
‘‘मार्च, एप्रिल व मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमान व वाऱ्याचा वेग कमी राहील्याने माॅन्सून राज्यात उशीरा दाखल होईल. पुढील वाटचालही अडथळ्याची शक्यता आहे. मॉन्सून कालावधीत एल निनोचा प्रभाव राहणार असल्याने जून ते ऑगस्ट या काळात पावसात मोठे खंड पडतील.
- डाॅ. रामचंद्र साबळे

पुणे (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज जेष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या शाश्‍वत शेती अभियानाचे राज्य सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. सरासरीच्या तुलनेत कोकणात ९०.५ टक्के, पश्‍चिम महाराष्ट्रात ९९.८ टक्के, उत्तर महाराष्ट्रात ९७ टक्के, मराठवाड्यात ९० टक्के, पुर्व विदर्भात ९२ टक्के, मध्य विदर्भात ९७.५ टक्के तर पश्चिम विदर्भात ९६ टक्के पाऊस पडण्याचा डॉ. साबळे यांचा अंदाज आहे.

डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार संबंधीत ठिकाणचे गेल्या तीस वर्षाचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदवलेली यंदाची हवामानघटक स्थिती विचारात घेवून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमाल व किमान तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सुर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदी यात विचारात घेण्यात आल्या आहेत. कमी पावसापेक्षाही पावसात पडणारे मोठे खंड आणि कमी कालावधीमध्ये पडणारा अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्य ठरण्याची शक्यता आहे.

- हंगामाच्या सुरवातीलाच खंड ?
जूनच्या पहिल्या-दुसऱ्या पंधरवड्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, पुर्व विदर्भ, धुळे व यवतमाळ या भागात कमी पावसाची शक्यता अधिक असल्याने परिस्थिती जास्त गंभिर असू शकते. राज्यातील दुष्काळप्रवण भागात विशेषतः सांगली, सातारा, पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांचा पूर्व भाग, संपूर्ण धुळे व सोलापूर जिल्ह्याचा काही भाग या मुळातच पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली.

- पावसानुसार करा पिक नियोजन !
पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पिक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी. मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी न करणे फायद्याचे राहील. जमीनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करु नये. दुष्काळप्रवण तालुके, मराठवाडा, विदर्भात कमी पाण्यावर व कमी कालावधीत येणारी पिके-वाण घेणे फायद्याचे राहील. या अनुषंगाने १५ जुलैपर्यंत मुग, मटकी, उडीद, चवळी, सोयाबीन व त्यानंतरच्या पेरणीसाठी सोयाबीनचा अवलंब करावा लागेल. पावसाच्या स्थितीनुसार पिक पद्धतीत बदलण्यासाठी सोयाबीन, मका व तूर ही पिके महत्वाची राहतील. पाणी साठवणूकीच्या सर्व बाबींवर भर द्यावा. पाच किंवा सहा ओळीनंतर एक सरी अशा पद्धतीने उताराला आडवी पेरणी करावी. पाणी मुरण्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. सोयाबीनची रुंद वरंबे आणि सरी पद्धतीने लागवड करणे फायदेशीर राहील, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली.

- चौकट
- असा राहील ठिकठिकाणचा पाऊस (जून ते सप्टेंबर २०१५)
ठिकाण -- सरासरी (मिमी) -- अंदाज (मिमी) -- टक्केवारी
अकोला -- ६८३.७ -- ६५६ -- ९६
नागपूर -- ९५८ -- ९५८ -- १००
यवतमाळ -- ८८२ -- ८४० -- ९५
शिंदेवाही(चंद्रपूर) -- ११९१ -- ११०० -- ९२
परभणी -- ८१५ -- ७३५ -- ९०
दापोली -- ३३३९ -- ३०२२ -- ९०.५
निफाड -- ४३२ -- ४३२ -- १००
धुळे -- ४८१ -- ४४२ -- ९२
जळगाव -- ६३९ -- ६४० -- १००
कोल्हापूर -- ७०६ -- ७०६ -- १००
कराड -- ५७० -- ५७० -- १००
पाडेगाव -- ३६० -- ३७० -- १०२
सोलापूर -- ५४३ -- ५४३ -- १००
राहूरी -- ४०६ -- ३९४ -- ९७
पुणे -- ५६६ -- ५७७ -- १०२
-------------------------------

No comments:

Post a Comment