Monday, June 1, 2015

शास्रज्ञांनो... शेतकऱ्यांकडे चला !

अप्पर मुख्य सचिवांची शास्रज्ञांना हाक

विशेष प्रतिनिधी
राहुरी, जि. नगर - कृषी विभागाच्या खरिप नियोजनाप्रमाणेच विद्यापीठांचे जॉईंट अॅग्रेस्को हे ही फक्त औपचारिकता बनून राहीले आहेत. संशोधन जाहिर केले जाते पण पुढे काय. त्याचा शेतकऱ्यांच्या प्रगतीत हातभार लागतोय का, असा प्रश्न उपस्थित करत यंदाच्या खरीपात प्रयोग म्हणून का होईना पण राज्यातील सर्व कृषी शास्रज्ञांनी कृषी विभागासोबत विस्तार कार्यात सहभागी होऊन संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे, असे कळकळीचे आवाहन राज्याचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधिरकुमार गोएल यांनी चारही कृषी विद्यापीठांच्या शास्रज्ञांना केले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृ-षी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचे उद्घाटन राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गोएल बोलत होते. कृषी परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू, खासदार दिलीप गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कृषी विभागाचे संचालक के. व्ही. देशमुख, डॉ. सुदाम अडसूळ, जयंत देशमुख, श्री. अंबुलगेकर, सर्व कृषी विद्यापीठांचे संशोधन, शिक्षण व विस्तार संचालक आणि सुमारे 150 हून अधिक कृषी शास्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

डॉ. गोएल म्हणाले, आत्तापर्यंत कृषी विद्यापीठांनी शिफारशी, वाण, रोपे, यंत्रे यांच्यासह सुमारे पाच हजार संशोधने प्रसिद्ध केली आहे. चारही विद्यापीठांचे काम मोठे आहे. या जॉईंट अॅग्रेस्को मध्ये 23 वाण, 247 शिफारशी व 8 यंत्रे या संशोधन शिफारशींवर चर्चा होणार आहे. शास्रज्ञांचा, विद्यापीठांचा अजेंडा नसला तरी हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कुणाचीही वाट न पाहता प्रत्येक शास्त्रज्ञांने स्थानिक कृषी विभागाच्या मदतीने येत्या खरिपात कृषी विस्ताराच्या कार्यात सहभागी व्हावे. आपापल्या कामाच्या ठिकाणापासून जवळच्या किमान 100 हेक्टर क्षेत्रापर्यंत संशोधन पोचविण्यासाठी मदत करावी. असे केले तर या खरीपात किमान दोन लाख हेक्टर क्षेत्रावर लगेच संशोधनाची अंमलबजावणी होऊ शकते. येत्या खरीपात एक हजार कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, हरितगृहे, शेडनेट, नवीन तंत्रज्ञान उभारणी, सुक्ष्म सिंचन आदीची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होणार आहे. त्यात शास्त्रोक्त पद्धतीने जास्त चांगली शेती कशी करता येईल याचे मार्गदर्शन शास्रज्ञांनी करावे.

विद्यापीठांनी आत्तापर्यंत 608 वाण तयार केले आहेत. त्यातील कोणते वाण अजूनही सरस आहेत. मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नाहीत. अशा खात्रीने उपयोगी वाणांची प्रात्यक्षिके, बिजोत्पादनासाठी कृषी विभागाने निधी राखून ठेवला आहे. बिजोत्पादनासाठी प्रति क्विंटल अडीच हजार रुपयांहून अधिक अनुदान आहे. विद्यापीठे जेवढे बिजोत्पादन करतील तेवढे अनुदान दिले जाईल. विद्यापीठांनी पिकनिहाय पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस द्याव्यात. त्याचा अवलंब वर्षभरात साडेआठ लाख हेक्टरवरील प्रात्यक्षिकांत केला जाईल. याशिवाय यंत्रसामग्री व जैविक निविष्ठांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न विद्यापीठांनी करावा असे आवाहन डॉ. गोएल यांनी केले.

पंजाबमध्ये कृषी विभागाला कोणी ओळखत नाही, सर्वजण पंजाब कृषी विद्यापीठाचे गुणगाण गातात. दर वर्षी ट्रॅक्टर भरुन लाखो शेतकरी विद्यापीठात भेटीला जातात. आपल्याकडे शास्त्रज्ञ कमी असले तरी त्यांना ओळखणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारोने वाढले पाहिजे. त्यासाठी शास्रज्ञांनी शेतकऱ्यांसाठी वेळ काढला पाहिजे. शेतकऱ्यांच्या सुख दुःखात त्यांनी सहभागी झाले पाहिजे अशी अपेक्षा डॉ. गोएल यांनी यावेळी व्यक्त केली.

- शेतकरीच तुमची अडचण सोडवतील
कुलगुरु डॉ. मोरे यांनी प्रास्ताविकात विद्यापीठांच्या समस्या वाचून दाखवल्या. याबाबत डॉ. गोएल म्हणाले, असा कोणताही शासकीय विभाग नाही की ज्यांच्यासमोर अडचणी नाहीत. अडचणी आहेत आणि साधणेही आहेत. अडचणी सांगत बसले तर कुलगुरुंचा कार्यकाल संपेल, पण फरक काही पडणार नाही. उपलब्ध साधणांचा पूरेपूर वापर करुन शेतकऱ्यांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करा. हे आमचे काम नाही असे म्हणू नका. यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात आदर निर्माण होईल. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्याची मागणी आणि उर्मी शेतकऱ्यांमध्ये निर्माण होईल. आणि त्यातूनच विद्यापीठांच्या अडचणी सोडवल्या जातील. कुलगुरुंनी सभांमध्ये भाषणे करुन अडचणी सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या मागणीवरुन सुटतील.

- विद्यापीठांकडून बदलाची अपेक्षा
राम शिंदे म्हणाले, विद्यापीठांनी गेल्या चार पाच दशकात खूप मोठे काम केले आहे. मात्र आता बदलत्या हवामानामुळे आव्हाणांतही बदल झाला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यांना प्रतिकार करणारे वाण विद्यापीठांनी तयार करावे लागतील. पिकनिहाय उत्पादन, प्रक्रिया व विपणन तंत्रज्ञानात सुधारणा करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या जिवनात बदल घडवून आणायची क्षमता व जबाबदारी शास्रज्ञांची आहे. याप्रमाणेच कृषी अधिकारी हा विद्यापीठे व शास्त्रज्ञ यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याची गरज आहे. बीटी कापसाला पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील 25 जिल्ह्यातील 150 तालुक्यातील कोरडावाहू क्षेत्र शाश्वत होण्यासाठी विद्यापीठांकडून अधिकाधिक संशोधनाची अपेक्षा आहे.

- गरजेवर आधारीत संशोधन हवे
राम खर्चे म्हणाले, कृषी विद्यापीठांच्या शास्रज्ञांनी डॉ. गोएल यांच्या आवाहनानुसार येत्या खरीपात थेट शेतकऱ्यांमध्ये काम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांबरोबर काम करण्याचा त्रास वाटत असेल त्यांनी मनोवृत्ती बदलावी. राज्यात एकही शेतकरी आत्महत्या होता कामा नये. आत्तापर्यंत किती शास्रज्ञांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपले उद्दीष्ट शेतकऱ्याच्या जिवनात सर्वांगिण प्रगती घडवणे हे शास्रज्ञांनी कायम लक्षात ठेवावे. उद्योग व शेतकरी यांच्याशी विद्यापीठांचा सतत संवाद हवा. गरजेवर आधारीत संशोधन व संशोधनाचे मुल्यमापन होणे अत्यावश्यक आहे. कालबाह्य झालेले संशोधन काढून टाका व आहे हे संशोधन किती उपयोगी ठरतेय याचे मुल्यमापन करावे, अशी सुचना त्यांनी केली.

दिलीप गांधी यांचेही यावेळी भाषण झाले. दापोली कृषी विद्यापीठाच्या 11, परभणी कृषी विद्यापीठाच्या चार, अकोला कृषी विद्यापीठाची सात, राहूरी कृषी विद्यापीठाच्या पाच अशा एकूण 27 पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. डॉ. तुकाराम मोरे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. प्रकाश शिनगारे यांनी मानले.
---------------------------------

No comments:

Post a Comment