Monday, June 1, 2015

कृषी पदविकाधारकांना फक्त कृषी पदवीलाच प्रवेश

थेट द्वितीय वर्षात प्रवेश बंद, राज्य शासनाचा निर्णय

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील कृषी तंत्र निकेतन शिक्षण संस्थांमधून सुधारीत तीन वर्षांचा कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी व संलग्न विद्याशाखांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश देण्याचा नियम रद्द करुन फक्त कृषी पदवीच्या प्रथम वर्षातच प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के अतिरिक्त जागा गुणानुक्रमे भरण्यात येणार आहेत.

चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत खासगी संस्थांमार्फत सुरु असलेल्या कायमस्वरुपी विना अनुदानित कृषी तंत्र विद्यालयांचा दोन वर्षाचा मराठी माध्यमातील अभ्यासक्रम 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून सुधारुन अर्ध इंग्रजी माध्यमात तीन वर्षाचा कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. हा निर्णय घेतना अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याची पात्रता बहाल करण्यात आली होती. आता शासनाने या पात्रतेवरच आक्षेप घेत जुना निर्णय फिरवला आहे.

कृषी तंत्र निकेतन या अभ्यासक्रमात विशेषीकरण (स्पेशलायझेशन) नाही. यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याशाखांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षास प्रवेश घेण्यास हे विद्यार्थी पात्र ठरत नाहीत. यामुळे याबाबतची मार्गदर्शक तत्वे व निकषांमध्ये सुधारणा करण्यात येत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

आता सुधारीत निकषानुसार कृषी तंत्र निकेतन उत्तीर्ण असलेले उमेदवार फक्त कृषी पदवीच्या (बीएस्सी. अॅग्री) पहिल्या वर्षात प्रवेशासाठी पात्र असतील. यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला किमान 60 टक्के व मागास प्रवर्गातील उमेदवाराला किमान 50 टक्के गुण आवश्यक असतील. या उमेदवारांसाठी 10 टक्के अतिरिक्त जागा असतील व त्या गुणानुक्रमे भरण्यात येतील, असा आदेश जारी करण्यात आला आहे.

---------------------------------

No comments:

Post a Comment