Wednesday, June 3, 2015

पशुसंवर्धन विभागातील ४०५ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पशुधन विकास मंडळाच्या प्रमुखपदी डॉ. गायकवाड

पुणे (प्रतिनिधी) - राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील गट अ संवर्गातील पशुधन विकास अधिकारी ३८९, नक्षलग्रस्त भागातील १६ पशुधन विकास अधिकारी अशा एकूण ४०५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या अाहेत. याशिवाय मुंबईचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. दौलत हरी गायकवाड यांची महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या (अकोला) अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पदी तर नाशिकचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. सुरेश सावंत यांची पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त पदी पदोन्नती करण्यात आली आहे. या दोन्ही पदोन्नती ११ महिन्यांसाठी किंवा निवडीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत देण्यात आल्या आहेत.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी बदलीच्या पदावर हजर न होता लोकप्रतिनिधींमार्फत बदली रद्द करण्यासाठी किंवा अन्यत्र बदली मिळण्यासाठी शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. बदलीचा आदेश मिळाल्याबरोबर अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे. त्यांचे पुढील वेतन व भत्ते रुजु होणाऱ्या पदावरच काढण्यात येतील, अशी तंबी शासनामार्फत देण्यात आली आहे.

बदली झालेले नक्षलग्रस्त भागातील पशुधन विकास अधिकारी - डॉ. दामोदर कोकरे, डॉ. एस. पी. गायकवाड, डॉ. रामकृष्ण देवकुळे, डॉ. गजानन मोकादम, डॉ. शरदकुमार बचे, डॉ. अजय भिंगे, डॉ. ए. ए. दगडे, डॉ. चाऊस हुसेन सईद, डॉ. एस. एन. गोस्वामी, डॉ. एकनाथ उसेंडी, डॉ. दामयी सय्यद सुलेमान गुलाम रब्बानी, डॉ. एम. के. हेडाऊ, डॉ. रविंद्रकुमार हातझाडे, डॉ.दामोदर वानखेडे, महादेव सोनकुसळे 

No comments:

Post a Comment