Monday, June 1, 2015

विद्यापीठांची बियाणे साखळी विस्कळीत

लोगो - जॉईंट अॅग्रेस्को 2015
------------------------
पुरवठा वाढविण्याची कृषी विभागाची आग्रही मागणी

राहुरी, जि. नगर (विशेष प्रतिनिधी) - राज्यात वापरल्या जाणाऱ्या 20 लाख क्विंटल पैकी फक्त 25 हजार क्विंटल बियाणे कृषी विद्यापीठे पुरवतात. गेल्या तीन वर्षात विद्यापीठांची बियाणे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अनेक पिकांचा एकही नवीन वाण गेल्या दहा वर्षात आलेला नाही. पिकवाल तेवढ्या बियाण्याला अनुदान देतो, सर्व बियाणे विकत घेतो, पण बिजोत्पादन वाढवा. यंदा किमान एक लाख क्विंटल बिजोत्पादन कराच, अशी आग्रहाची मागणी कृषी विभागामार्फत चारही कृषी विद्यापीठांकडे करण्यात आली.

जॉईंट अॅग्रेस्कोच्या पहिल्या सत्रात कृषी विभागामार्फत राज्यातील स्थिती मांडण्यात आली. खरिपासाठीची बियाणे उपलब्धता व पुरवठ्यातील अडचणी आणि याबाबत विद्यापीठांकडूनच्या अपेक्षा याविषयी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक जयंत देशमुख सादरीकरण केले. सत्राचे अध्यक्ष कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोएल यांनीही मुख्यमंत्र्यांच्या बिजोत्पादन वाढविण्याच्या सुचनांची आठवण देत विद्यापीठे तयार करतील त्या सर्व बियाण्याला अनुदान देण्याची व सर्व बियाणे विकत घेण्याची हमी दिली.

डॉ. गोएल म्हणाले, बियाणे पुरवठ्यात विद्यापीठांनी तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. बिजोत्पादनासाठी महाबीजला दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळते. यापेक्षाही अधिक अनुदान विद्यापीठांना मिळू शकते. मात्र त्यासाठी पुढील दोन वर्षे अतिरिक्त सुविधांची मागणी करु नये. केंद्राच्या नव्या नियमानुसार 10 वर्षाच्या आतील चांगल्या वाणांचे अधिकाधिक बिजोत्पादन करावे. कृषी विभाग हे सर्व बियाणे विविध योजनांतून शेतकऱ्यांना पुरविल.

श्री. देशमुख म्हणाले, खरिप पिकांच्या बाबतीत विद्यापीठांची बियाणे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. संकरीत ज्वारी, बाजरी, मका यांच्या बियाण्याची कमतरता आहे. विद्यापीठांकडून या बियाण्याच्या पुरवठ्याची अपेक्षा आहे. मात्र पुरवठा होत नसल्याने यात खासगी कंपन्यांची एकाधिकारशाही वाढली आहे. उडीद, सोयाबीन, गहू या सर्वच पिकांच्या नवीन वाणांची गरज आहे. अनेक पिकांचे दहा वर्षाच्या आतील वाण विद्यापीठांकडे उपलब्धच नाहीत. शेतकऱ्यांची भात, कापूस, सोया, हरभरा या पिकांच्या दहा वर्षाहून जुन्या वाणांनाही मागणी आहे. मात्र या वाणांमध्ये गेल्या दहा वर्षात बदल झाले असून विद्यापीठांनी या वाणांचे शुद्धीकरण करण्याची गरज आहे.

- चौकट
जनुकीय चाचण्यांचा दर्जा सुधारा
कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर जनुकीय पिकांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. मात्र त्यासाठी विद्यापीठांकडून सोई सुविधा निट राखल्या जात नाहीत, अशा कंपन्यांच्या तक्रारी आहेत. कंपन्यांकडून आपण चाचण्यांचे पैसे घेतो त्यामुळे सर्व बाबींचा दर्जा राखणे आवश्यक आहे. अन्यथा उद्या खासगी कंपन्या आपल्याविरुद्ध ओरड करतील. विद्यापीठांच्या पैदासकार बियाण्याच्या लेबलवर अनेकदा पैदासकाराची सही नसते. कट ऑफ डेट नसते. बियाण्याची मागणी केली तर अजून तयार नाही, असे सांगण्यात येते. सोयाबीनचे बियाणे 50 किलोच्या पॅकमध्ये असते. बियाण्याची पिशवी ही त्या पिकाच्या प्रति एकर क्षेत्रासाठीच्या बियाण्याच्या गरजेनुसारच तयार केल्या जाव्यात, अशी मागणी श्री. देशमुख यांनी केली.

कृषी विभागाच्या मागण्या...
- सोयाबीनच्या यंत्राने काढणी करण्यासाठी खास वाण विकसीत करावा
- कापसाचा सघन लागवडीसाठी बीटी जनुक असलेला सरळ वाण विकसित करावा
- पैदासकार व पायाभूत बियाणे पुरशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावे
- बिजोत्पादनात शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) सहभागी करुन घ्यावे
- हवामान घटकांतील बदलांना प्रतिकारण वाण विकसित करावेत
-------------------------

No comments:

Post a Comment