Wednesday, June 3, 2015

मुख्यमंत्र्यांचे बदल्यांचे अधिकार कृषीमंत्र्यांकडे

कृषी आयुक्तांच्या अधिकारातही वाढ

पुणे (प्रतिनिधी) - कृषी विभागातील महत्वाच्या सहसंचालक व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पदांच्या बदल्यांचे मुख्यमंत्र्यांना असलेले अधिकार कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. याबरोबरच उर्वरीत अ व ब वर्ग अधिकार्यांच्या बदल्यांचे पुर्वी कृषीमंत्र्यांकडे असलेले अधिकार आता कृषी आयुक्तांकडे वर्ग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर कृषी संचालकांच्या बदल्यांचे अधिकार पुर्वीप्रमाणेच मुख्यमंत्र्यांकडे कायम ठेवण्यात आले आहेत. अधिकार्यांच्या बदल्यांना विलंब होवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने जारी केलेल्या आदेशात म्‍हटले आहे.

दरम्यान, कृषी विभागाची चालू वर्षातील बदल्यांची प्रक्रीया मे अखेरीस पूर्ण झाली आहे. यामुळे यानिर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या बदल्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये ४४ अ वर्ग अधिकारी व २०८ ब वर्ग अधिकार्यांचा समावेश आहे. या सर्व बदल्या पुर्वीच्या पद्धतीने मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांमार्फत झाल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

कृषी विभागात सध्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दर्जाची २४ व अ वर्गातील आणखी सहा पदे रिक्त आहेत. ब वर्ग अधिकार्यांची सर्व पदे भरलेली आहेत. याशिवाय गट क वर्ग संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सहसंचालक स्तरावरुन केली जात आहे. गट अ व ब संवर्गातील रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना विभागामार्फत देण्यात आली.

- कोकण, मराठवाडा प्रमुख पदे रिक्त
खरिप हंगाम, दुष्काळ, टंचाई आदी सर्व दुष्‍टीने महत्वाच्या असलेल्या मराठवाड्यातील कृषी सहसंचालक पदाची दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. औरंगाबादचे कृषी सहसंचालक जे. जे. जाधव व लातूरचे कृषी सहसंचालक के. एन. देशमुख हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे एक जूनपासून ही पदे रिक्त आहेत. ही दोन्ही पदे पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयामार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आलेला आहे. मात्र अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. याशिवाय कोकण विभागाच्या (ठाणे) कृषी सहसंचालकांचे पदही गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. रत्नागिरीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. गायकवाड हे ही ३१ मे रोजी निवृत्त झाले असून ही जागाही अद्याप रिक्तच आहे.
--------------------

No comments:

Post a Comment