Wednesday, February 4, 2015

अॅग्रोवन शेळीपालन कार्यशाळा

पुणे (प्रतिनिधी) ः शेळीपालनापासून अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी शेळी उत्पादन ते मांस विक्री पर्यंतची सर्व प्रक्रीया शेतकऱ्यांनी स्वतःच्या हाती ठेवायला हवी, असे मत क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. तेजस शेंडे यांनी व्यक्त केले.

ऍग्रोवन आयोजित दोन दिवसिय शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळेला डॉ. शेंडे यांच्या मार्गदर्शनाने प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीपासून कोकणापर्यंतच्या राज्याच्या विविध भागातून शेतकरी कार्यशाळेस उपस्थित होते. डॉ. शेंडे यांनी शेळीपालन व्यवसायाची सद्यस्थिती, संधी व यशस्वी व्यवसायिक शेळीपालन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांएवढेच पैसे दलाल काहीही कष्ट न करता सहा हजार कमवतात. शेतकऱ्यांनी स्वतः मटनाचे दुकान सुरु करण्याची गरज आहे. स्वतः कापू शकत नसाल तर त्यासाठी मनुष्यबळ सहज उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी उत्पादन ते विक्रीपर्यंतची सर्व प्रक्रीया आपल्या हाती ठेवली तर या व्यवसायातून मोठा नफा मिळू शकतो.

शेळीपालन व्यवसायात मोठ्या संधी आहेत. योग्य नियोजन केल्यास 50 ते 75 टक्के नफा या व्यवसायातून मिळतो. शेळीचा एकही भाग वाया जात नाही. मात्र चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याने अनेक प्रकल्प बंद पडले आहे. योग्य प्रकारच्या शेळ्यांची निवड, आरोग्य, गोठ्याची रचना, प्रत्येक बाबीची नोंद ठेवणे, वाहतूकीत घ्यावयाची काळजी, आहार आणि काटेकोर व्यवस्थापन हे शेळीपालनाच्या यशाचे मुख्य सुत्र आहे, असे डॉ. शेंडे यांनी सांगितले.

प्रशिक्षणाचा आज (ता.5) शेवटचा दिवस आहे. बी. व्ही. काकडे (बॅंकेच्या योजना, प्रोजेक्‍ट रिपोर्ट), डॉ. दयाराम सुर्यवंशी (शेळ्यांमधील आजार व उपचार) यांच्या मार्गदर्शनानंतर पृथ्वीराज चव्हाण (वाई, सातारा) यांच्या शेळीपालन प्रकल्पाच्या भेटीने प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

चौकट
... तर बोअरचा विचार नको
डॉ. शेंडे म्हणाले, शेळीची बोअर जात चांगली आहे. कारण तिचे दररोज 200 ग्रॅम वजन वाढते. उस्मानाबादीचे 80 ग्रॅम वजन वाढते. मात्र शेळीपालनाची सुरवात करताना बोअर ऐवजी उस्मानाबादीनेच करायला हवी. बोअरचा नर दीड हजार रुपये किलो व मादी चार हजार रुपये किलो दर आहे. हे सध्या पक्त पैदाशीसाठी वापरले जातेय. आता हजार शेतकऱ्यांकडे बोअर आहेत. ते पैदास करत आहेत. मांसासाठी शेळी विकायची वेळ येईल तेव्हा ती उस्मानाबादीच्याच दराने विकावी लागेल.

चौकट
- तुम्हीच ठरवा शेळीची किंमत
शेतकऱ्यांनी शेळी, बोकड नगावर न विकता जिवंत वजनावर विकले पाहिजेत. सध्या या खरेदी विक्रीत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते. मागणी प्रचंड असल्याने शेळी, बोकड विकला जात नाही असे होत नाही. यात्रा, जत्रा, सणांना घरोघरी बोकड कापले जातात. ही संधी ओळखून योग्य दर मिळवावा. पैदाशिसाठीच्या नरालाही चांगला दर मिळतो. सध्या पैदाशीचा नर 600 रुपये तर मटनासाठी 200 ते 300 रुपये प्रतिकिलो जिवंत वजनावर विक्री केली जाते. शेळी, बोकडाला मार्केट कुठे, कधी, कसे, कुणाला विकणार याचे नियोजन करुन व्यवसाय करावा, असे आवाहन डॉ. शेंडे यांनी यावेळी केले.
--------------- 

No comments:

Post a Comment