Thursday, February 12, 2015

मधमाशांसाठी किटकनाशकांवर बंदी हवी

ऍग्रो इफेक्‍ट
----------
मधमाशांसाठी फुलोरा अवस्थेत
हवी काही किटकनाशकांवर बंदी

अभ्यास समितीची शिफारस; महिनाभरात होणार अहवाल सादर

पुणे (प्रतिनिधी) ः इमिडाक्‍लोप्रिड, थायमेक्‍झाम आणि क्‍लोथियानिडीन आदी निओनिकोटीनोईड्‌स किटकनाशकांमुळे मधमाशांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या किटकनाशकांची पिकांच्या फुलोऱ्याच्या अवस्थेत फवारणी करण्यास बंदी घालावी. तशी सुचना किटकनाशकांच्या लेबक क्‍लेममध्ये ठळकपणे नमूद करावी, अशी शिफारस राज्य शासनाने कीटकनाशकामुळे मधुमक्षिकापालनावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या अहवालात केली आहे. कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक कार्यालयामार्फत येत्या महिनाभरात हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने 16 जुलै रोजीच्या शासन आदेशान्वये मधमाशांवर किटकनाशकांच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली. समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात अनेक महिने उलटल्यानंतरही याबाबत काहीही ठोस कार्यवाही झाली नाही. यानंतर समितीने 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत वाढवून घेतली. मात्र या कालावधीतही हा अहवाल तयार करण्यात अपयश आले. ऍग्रोवनने याबाबतचा मंदगती कारभार उघडकीस आणल्यानंतर वेगाने कार्यवाही होऊन अखेर आता अहवाल तयार झाला आहे.

समितीच्या आत्तापर्यंत चार बैठका झाल्या असून किटकनाशक उत्पादक, शेतकरी, विद्यापीठे आदींकडून याबाबतची माहिती व सुचना घेण्यात आली आहे. मधमाशांवर विपरीत परिणाम होत असल्याने युरोपात निओनिकोटीनोईड्‌स किटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातही या किटकनाशकांचा वापर चार पाच पटींनी वाढल्याने मधमाशा धोक्‍यात सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र याबाबत विद्यापीठे, संशोधन संस्थांच्या पातळीवर आत्तापर्यंत काहीही अभ्यास वा संशोधन झाले नसल्याची धक्कादायक बाब समितीच्या पाहणीत उघड झाली.

महाराष्ट्रात जंगलांनजिकच्या भागात मधमाशांवरील किटकनाशकांचा परिणाम अधिक आहे. याशिवाय शिफारस केलेल्या पिकाव्यतिरिक्त इतर पिकांसाठी निओनिकोटीनोईड्‌स किटकनाशकांचा वापर, शिफारशीपेक्षा अधिक प्रमाणात वापर यामुळे मधमाशांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निरिक्षण समितीने नोंदविले आहे. यानुसार मधमाशांवर परिणाम होऊ नये म्हणून पिकांच्या फुलोऱ्याच्या अवस्थेत या किटकनाशकांची फवारणी करण्यात येवू नये, राज्यातील मध उत्पादन, मधमाशांच्या वसाहतींतील वाढ किंवा घट याबाबत शास्त्रीय अभ्यास करण्यात यावी, आदी शिफारशी अहवालात करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी व अभ्यास समितीचे सदस्य सचिव दिलीप झेंडे यांनी दिली.

*चौकट
- "मल्टिलोकेशन ट्रायल'चे हवे बंधन
किटकनाशकांचा शिफारस करण्यात आलेल्या पिकाच्या प्रक्षेत्रातील मधमाशांवरील परिणाम अभ्यासण्यासाठी संबंधीत किटकनाशक उत्पादकांना केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीमार्फत विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर मल्टिलोकेशनल ट्रायल बंधनकारक कराव्यात. चाचण्यांसाठी येणारा खर्च कंपन्यांनी द्यावा व विद्यापीठांनी तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या नियंत्रणाखाली या चाचण्या घ्याव्यात. किटकनाशकांना मान्यता देताना या चाचण्यांचे अहवाल विचारात घ्यावेत, अशी शिफारसही अभ्यास समितीमार्फत करण्यात आली आहे.

*कोट
""खेड्यांबरोबरच शहरांतील मधमाशांवरही किटकनाशकांच्या परिणामांची माहिती व सुचनांचा समावेश या अहवालात करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या सुचना व अवलोकनानंतर हा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे.''
- दिलीप झेंडे, सदस्य सचिव, अभ्यास समिती
-----------(समाप्त)---------- 

No comments:

Post a Comment