Wednesday, February 18, 2015

एकनाथ थोरात, खोडद - शेडनेट यशोगाथा

वैद्यकीय औषध विक्री सोडून
शेडनेट भाजीपाला उत्पादनात भरारी
------------
खगोल निरिक्षणाच्या महाकाय दुर्बिनींमुळे (जीएमआरटी) जगाच्या नकाशावर ठळक झालेल्या खोडद (जुन्नर, पुणे) गावातील एकनाथ थोरात यांच्यावर तब्बल दहा वर्षे जिवाभावाने केलेला वैद्यकीय औषध विक्री व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. मात्र या पायखुटी बसलेल्या स्थितीतही खचून न जाता स्वतःभोवतीची सुरक्षित चौकट मोडून शेतीचा... शेडनेटमधील भाजीपाला उत्पादनाचा मार्ग त्यांनी धरला. स्वतःवरील विश्‍वास आणि पत्नीचा पाठींबा सार्थ ठरवत त्यांनी भाजीपाला उत्पादनात अनुकरणीय भरारी मारली आहे.
-------------
संतोष डुकरे
-------------
एकनाथ थोरात यांची वडील देवराम थोरात हे महसूल विभागात मंडळ अधिकारी होते. त्यांच्या बदलीच्या ठिकाणांनुसार तालुक्‍यातील आळे, ओतूर व जुन्नरला एकनाथ यांचे शिक्षण झाले. डी फार्म पदविका प्राप्त केल्यानंतर त्यांनी तालुक्‍यातील सर्वात मोठ्या शहरात नारायणगाव येथे एका खासगी डॉक्‍टरच्या दवाखान्याशी संलग्न औषधालय (मेडिकल) सुरु केले. त्यासाठी एक लाख रुपये कर्ज काढले. सचोटी व मेहनतीने व्यवसाय करुनही हे कर्ज फेडायला पाच वर्षे लागली. व्यवसायाच्या दहा वर्षाच्या काळात परिसरात दवाखाने व मेडीकलची संख्या प्रचंड वाढली. व्यवसाय वृद्धीवर मर्यादा आल्या. त्यातच संबंधीत खासगी डॉक्‍टरने दवाखाना बंद केल्याने थोरातांवर मेडीकल बंद करण्याची वेळ आली. व्यवसायात पुन्हा नव्याने उभारी घ्यायची तर स्पर्धा व मर्यादाही खूप होत्या. शेवटी 2010 मध्ये एकनाथरावांनी मेडीकल व्यवसाय कायमचा बंद करुन शेती व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

शेतीत उतरायचा निर्णय घेतला, पण शेतीविषयी काहीच माहिती नव्हती. पत्नी (सौ. रुपाली) मुंबईतच लहानाची मोठी झालेली. यामुळे शेतीचा श्रीगणेशा करण्यासाठी तिचाही अनुभव शुन्य होता. शेवटी शेती करायची तर काही तरी अनुभव हवाच या आग्रहातून सौ. रुपालींचे मामा जुन्नर तालुक्‍यातील शिरोली येथिल कृषीभुषण शेतकरी अरुण मोरे यांच्याकडे शेतीची बाराखडी गिरवण्याचे नक्की केले. श्री. मोरे यांचा शेडनेटमधील पिक उत्पादनात हातखंडा आहे. सलग वर्षभर दर रविवारी एकनाथराव मामंसासऱ्यांकडे जावून फवारणी, खतांचा वापर आदी सर्व कामांचा अनुभव घेतला. कशाचीही लाज न बाळगता त्यांनी शेडनेटमधील पिक उत्पादनाचे तंत्र आत्मसाद केले. प्रत्यक्ष काम करुन घेतलेल्या अनुभवाच्या जोरावरच थोरात यांच्या यशाची मुहुर्तमेढ रोवली गेली.

मुळात थोरात कुटुंबाची वडिलोपार्जीत जमीन फार काही नव्हती. वाटण्या झाल्या तेव्हा वडलांच्या वाट्याला जेमतेम अर्धा एकर जमीन आलेली. मात्र मुलांना भविष्यात आसरा असावा म्हणून त्यांनी दहा वर्षापूर्वी दोन्ही मुलांच्या नावावर खोडदमध्येच दोन दोन एकर जमीन विकत घेतली. शेवटी हिच दोन एकर जमीन एकनाथरावांच्या कामी आली. त्यात शेडनेट उभारुन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सौ. रुपाली त्यांच्यामागे खंबिरपणे उभ्या होत्या. पण भांडवलाचा प्रश्‍न मोठा होता. एक लाखाचे कर्ज फेडायला दहा वर्ष लागली आता पुन्हा मोठे कर्ज म्हणजे आयुष्याची गुलामी अशी धाकधुक होती. पण कोणताच पर्याय हाती नसल्याने शेवटी जमीन तारण ठेवून बॅंकेकडून कर्ज घेण्याचे नक्की केले.

शेडनेट उभारणीसाठी कर्जाचा प्रस्ताव तयार केला. एका प्रसिद्ध राष्ट्रीयकृत बॅंकेकडे तो सादर केला आणि त्यापुढे सहा महिने फक्त हेलपाटे सुरु राहीले. हे पाहिजे, ते पाहिजे, हे पत्र आणा, ते प्रमाणपत्र आणा असे करत बॅंक त्यांना तंगवत राहीली. कर्ज काही मंजूर होईना. शेवटी कुणीतरी सुचविल्यानंतर त्यांनी बॅंक ऑफ इंडियाकडे कर्जासाठी प्रस्ताव दाखल केला. बॅंकेने अवघ्या महिनाभरात त्यांच्या बॅंक खात्यावर कर्जावू रक्कम जमा केली. अशा प्रकारे भांडवल उभारणीतच पहिले वर्ष खर्ची पडले.

खिशात एक रुपयाही नव्हता. कृषी खात्याला 2011 साली शेडनेट उभारणीसाठी प्रस्ताव दिला. त्यांच्याकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 20 गुंठे शेडनेट मंजूर झाले. शिरवली येथिल वसंत थोरवे यांना शेडनेट उभारणीचे कंत्राट दिले. कृषी विभागाकडून 20 गुंठ्यासाठी तीन लाख 60 हजार रुपये अनुदान मिळाले. सर्व शेडनेटची जीआय पाईपमध्ये उभारणी केली. 10 गुंठ्याला तीन लाख रुपये याप्रमाणे खर्च आला.

एकनाथरावांनी 22 नोव्हेंबर 2011 ला ढोबळी मिरचीने शेडनेटमधील भाजीपाला उत्पादनाला प्रारंभ केला. सुरवातीला 10 गुठे लाल ढोबळी मिरची व 10 गुंठे पिवळी ढोबळी मिरचीची लागवड केली. या पहिल्याच पिकापासून त्यांना 16 टन उत्पादन मिळाले. पुण्याला दररोज मिरची पाठविण्यासाठी एक तीन चाकी रिक्‍शा एक हजार रुपये खोडद ते गुलटेकडी मार्केटयार्ड प्रति फेरा याप्रमाणे भाड्याने लावली. दररोज 40 च्या आसपास खोकी मिरची विक्रीसाठी पुण्याला पाठवली जायची. बहुसंख्य माल पुण्याला तर सुमारे 60 हजार रुपयांचा माल मंचर मार्केटला विकला. सरासरी 40 रुपये प्रति किलो दर मिळाला. सहा लाख 40 हजार रुपये उत्पन्न मिळाले. उत्पादनासाठी एक लाख 40 हजार रुपये खर्च झाला. सुमारे पाच लाख रुपये निव्वळ नफा हाती आला.

या पहिल्या पिकानंतर सहा महिने खतासाठी ताग, झेंडू घेतला व तो शेडनेटमधील बेडमध्ये गाडला. आणखी शेणखतही घातले. यानंतर 1 जानेवारी 2013 ला सिंजेंटाची बॉम्बे ऑरबेले या वाणाची लाल पिवळी ढोबळी मिरची लावली. त्यापासून 17 टन उत्पादन झाले. कधी 25 रुपये तर कधी सर्वाधिक 100 रुपयेही दर मिळाला. सरासरी 40 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. जुलै 2013 ला ही मिरची संपली. शेडनेटमध्ये पावसात ढोबळी मिरची टिकत नाही. या हंगामात साडेपाच लाख रुपये नफा मिळाला. हे पिक निघाल्यानंतर पुन्हा ताग पेरला व योग्य वेळी बेडमध्ये गाडला.

दरम्यान, 10 गुंठ्यावर नॅचरल व्हेंटिलेशन टाईपचे हरितगृह उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संतोष वळसे पाटील यांना कॉन्ट्रॅक्‍ट दिले. एकूण सहा लाख रुपये खर्च आला. त्यास राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून तीन लाख 46 हजार रुपये अनुदान मिळाले. यानंतर 22 ऑगस्ट 2013 ला 20 गुंठे शेडनेट व 10 गुंठे पॉलीहाऊस अशा 30 गुंठे क्षेत्रावर ढोबळीची लागवड केली. नोव्हेंबर 2013 ला मिरची तोडणी सुरु झाली. एप्रिल 2014 अखेरीस सर्व माल संपला. शेडनेटमध्ये 20 गुंठे क्षेत्रावर 16 टन तर पॉलिहाऊस मध्ये 10 गुंठे क्षेत्रावर 10 टन उत्पादन मिळाले.

यानंतर ऑगस्ट 2014 अखेरीस त्यांनी 10 गुंठे पॉलिहाऊसमध्ये खास निर्यातक्षम गुणवत्तेच्या ोबळी मिरचीची लागवड केली. गेल्या चार महिन्यांपासून या क्षेत्रावरील मिरचीची तोडणी सुरु आहे. या लागवडीच्या बरोबरीने शेडनेटमध्ये लागवड न कता त्यात जमीन सुधारणेसाठी (बेवोड) झेंडूंचे पिक हिरवळीचे खत म्हणून घेतले. आता नुकतिच 28 जानेवारी 2015 ला या 20 शेडनेटमध्ये त्यांनी पुन्हा सिजेंटाच्या बॉम्बे ऑरबेले या वाणाची लाल व पिवळी ढोबळी मिरचीची लावली आहे. शेडनेट व पॉलिहाऊसबरोबरच काही क्षेत्रावर कलमी आंबे (25 झाडे), सिताफळ (30 झाडे) यासह नारळ, लिंबू, फणस आदी फळझाडेही आहेत. या सर्व पिकांना ठिबक सिंचनाने पाणी दिले जाते. पाण्यासाठी एक विहीर व बोअरवेल आहे.

- मजूर व्यवस्थापन महत्वाचे
शेडनेट व पॉलिहाऊसमधील पिक उत्पादनात मजूरांचे व्यवस्थापन अतिशय महत्वाचे आहे. यात नऊ महिने आणि त्यातही तोडणीच्या सहा महिने कालखंडात दररोज काम असते. एक दिवसही मजूरांकडून हलगर्जीपणा झाला तर मोठे आर्थिक नुकसान होते. थोरात यांच्याकडे तीन महिला व एक पुरुष असे चार मजूर बारमाही कामास आहेत. मजूरांना त्यांची दैनंदीन भाजीपाल्याच्या गरजा भागविण्यासाठी काही जागा थोरात यांनी उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे मजूरांचा खर्चही कमी राहतो. त्यांना शेत सोडून फारसे बाहेर जाण्याची गरज राहत नाही. त्यांची काळजी घेतल्यास ते घरच्या व्यक्तीसारखेच ते ही झोकून देवून काम करतात, असा अनुभव आहे. कमी पडेल तेथे एकनाथराव व सौ. रुपाली स्वतः सर्व कामे करतात. दोघांचाही दिवसातील सर्वाधिक काळ शेतातच जातो.

- शेडनेटचे पॉलिहाऊसमध्ये रुपांतर
जून 2013 मध्ये पावसाला महिनाभर उशीर झाला. थोरातांची मिरची शेडनेटमध्ये सुरु होती. या महिन्यात पहिला बहार संपता संपता दुसरा आला. मिरचीला चांगला रंग येण्यास सुरवात झाली आणि पाऊस सुरु झाला. सलग महिनाभर पाऊस सुरु राहीला. शेडनेट या पावसात तग धरु शकली नाही. त्यामुळे पिकाला मोठा फटका बसला. त्यावेळी पाच टन माल झाडांवर शिल्लक होता. बाजारात 300 रुपये प्रति किलो दर होता. पॉलिहाऊस किंवा शेडनेटवर प्लॅस्टिक असते तर हा सर्व माल व्यवस्थित वाचला असता. त्याचे खूप चांगले पैसे झाले असते. पावसाचा फटका बसल्याने सर्व माल अवघ्या दोन तीन दिवसात नारायणगावला स्थानिक बाजारात विकावा लागला. त्याचे अवघे दोन लाख रुपये झाले. याच वेळी थोरातांनी शेडनेट काढून त्याच सांगाड्यावर स्लायडिंग पद्धतीने प्लॅस्टिक टाकायचा निर्णय घेतला. यासाठी 20 गुंठ्याला साडेपाच लाख रुपये खर्च झाला. सर्व शेडनेटचे रुपांतर पॉलिहाऊसमध्ये केले. आता ते पावसातही उत्पादन घेण्यास सक्षम आहेत.

- सहा लाखांचे कर्ज, पाच महिन्यात फेडले !
एकनाथ थोरात यांच्याबरोबरच परिसरातील काही शेतकऱ्यांनी शेडनेटमधील भाजीपाला उत्पादनास सुरुवात केली होती. दररोज सकाळी 7 वाजताच ते मळ्यात जातात. आवश्‍यकतेनुसार दिवसभर शेतात थांबतात. मात्र किमान दोन तास काटेकोर लक्ष देतात. एकीकडे काटेकोर लक्ष न दिल्याने काही शेडनेट बंद पडली असताना दुसरीकडे एकनाथरावांनी काटेकोरपणे भाजीपाला उत्पादन घेवून 20 गुंठे शेडनेटसाठी घेतलेले सहा लाख रुपयांचे बॅंक कर्ज अवघ्या पाच महिन्यात फेडले. शेडनेटपाठोपाठ 10 गुंठे पॉलिहाऊस उभारणीसाठीही त्यांनी सहा लाखांचे कर्ज घेतले. हे सर्व कर्जही त्यांनी वेळच्या आधीच फेडले आहे. पिक कर्जही वेळेच्या आधीच भरण्याकडे त्यांचा कल असतो. एकनाथराव स्वतःच्या शेतीबरोबकच पारुंडे, मंगरुळ आदी गावांतील शेतकरी गटांनाही शेडनेट व हरितगृहातील भाजीपाला उत्पादनासाठी मोफत मार्गदर्शन करतात.

- सन्मान काटेकोर शेतीचा !
एकनाथ थोरात यांनी भाजीपाला उत्पादनात केलेल्या कामगिरीचा विविध संस्थांनी गौरव केला आहे. नारायणगाव येथिल कृषी विज्ञान केंद्रामार्फत त्यांना 2013 मधील "उत्कृष्ट शेतकरी' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. बॅंक ऑफ इंडियाने नारायणगाव शाखेच्या इतिहासात सर्वाधिक जलद गतीने कर्ज फेडल्याबद्दल एकनाथ थोरात यांना 19 जुलै 2014 रोजी शिवछत्रपती पुरस्कार देवून गौरविले आहे. तर झी टिव्ही मार्फत 2014 वर्षासाठीचा राज्य पातळीवरील बागायती शेतीसाठीचा "कृषी सन्मान' त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

- कुटुंबाची साथ महत्वाची
थोरात यांचे नऊ माणसांचे कुटुंब एकत्र आहे. देवराम थोरात भाऊसाहेबांनी आपल्या दोन्ही मुलांच्या एकनाथ व नामदेव यांच्या नावावर स्वतंत्रपणे जमीन केल्याने दोघा भावांची शेती व व्यवसाय स्वतंत्र आहे. नामदेव यांचा हुंडेकरी, खता औषधांचे दुकान व शेती असा व्यवसाय आहे. एकनाथांची पत्नी रुपाली व नामदेवांची पत्नी सोनाली या दोघी जावा सख्ख्या बहिणी आहेत. रुपाली यांच्या राजुरी (ता.जुन्नर) येथे प्राध्यापिका असलेल्या भगिनी सौ. छाया मोहन नायकवडी यांचीही त्यांना अडीनडीला मोलाची मदत असते. रुपाली स्वअनुभवातून शेडनेटमधील ढोबळी मिरची उत्पादनात तरबेज झाल्या आहेत. एकनाथरावांच्या बरोबरीने संपूर्ण शेती त्या एकहाती सांभाळतात. सर्व कुटुंबियांच्या मोलाच्या मदतीमुळेच शेतीत प्रगती साधता आल्याची कृतज्ञता श्री. थोरात व्यक्त करतात.

- मार्गदर्शनासाठी एकटा ऍग्रोवन पुरेसा !
शेती करण्याचे नक्की केल्यावर आणि पुढे शेतीत नवे काही तरी करण्याचा विचार करुनही थोरात कुटुंबीय माहिती घेण्यासाठी अनेक ठिकाणी फिरले. अगदी जवळच्या परिसरातील शेतकरीही एकमेकांना खरी माहिती सांगत नाहीत, असा वाईट अनुभव आला. परिचितांकडून शेती करायची तर ऍग्रोवन पेपर दररोज वाचा असा सल्ला त्यांना मिळाला. तेव्हापासून थोरात कुटुंबियांचा ऍग्रोवन हा मुख्य मार्गदर्शक बनला आहे. ऍग्रोवनमधील कात्रणांची स्वतंत्र फाईल ते करतात. याशिवाय टिपणांसाठी एक स्वतंत्र वही केलेली असून त्यात दररोजच्या ऍग्रोवनमधील त्यांच्या उपयोगाची महत्वाची माहिती ते स्वहस्ताक्षरात टिपून ठेवतात. सर्व अंकही त्यांच्या संग्रही आहेत. आता आम्हाला माहितीसाठी कुणाला विचारपूस करत बसावी लागत नाही. मार्गदर्शनासाठी एकटा ऍग्रोवनच पुरेसा आहे, या शब्दात थोरात दांपत्याने आपल्या वाटचालीतील ऍग्रोवनचे महत्व व त्यावरील विश्‍वास व्यक्त केला.

- नवी दिशा, नवी आशा
ढोबळी मिरचीचे बाजारभाव कमी जास्त होतात. त्यापेक्षा फुलांना सरासरी दर चांगला मिळतो. यामुळे आता मिरचीकडून कार्नेशियन फुलांच्या उत्पादनाकडे वळण्याचा त्यांचा विचार आहे. शेडनेट, हरितगृहाखालील क्षेत्रही त्यांना आणखी वाढवायचे आहे. मेडिकल मध्ये एक लाखाचं कर्ज फेडायला पाच वर्षे लागली आणि शेतीत सहा लाखाचे कर्ज पाच महिन्यात फेडले. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन व चांगला नफा मिळत असल्याने कष्टाचे काही वाटत नाही. खरे काम नऊ महिने असते. तीन महिने आराम मिळतो. काटेकोरपणे केली तर शेती हा सर्वोत्तम व्यवसाय आहे, असे थोरात आवर्जून सांगतात.
---------
*कोट
""प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे व वेळच्या वेळीच केल्याने नुकसान कधीच झाले नाही. भरपूर पिके घेवून नको तेथे नको तेवढा जिव काढण्यापेक्षा शेतकऱ्यांनी जास्त नफा मिळेल अशाच ठिकाणी लक्ष केंद्रीत करावे, असे वाटते.''
- एकनाथ थोरात, खोडद

""शेती करताना पावलोपावली नकारात्मक अनुभव येतात. पण कठीण परिस्थितीतही सकारात्मक विचार केला तर त्याचे सकारात्मकच फळ मिळते. शेती ही नोकरी वा इतर व्यवसायांपेक्षा हजार पटीने सरस आहे. कुणाचे बंधन नाही. आम्हाला शेतीत खूप पुढे जायचंय. खूप काही चांगलं घडवायचंय.''
- सौ. रुपाली एकनाथ थोरात
----------
संपर्क ः
एकनाथ देवराम थोरात
खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे
मोबाईल - 9096869381
---------












No comments:

Post a Comment