Thursday, February 5, 2015

आदर्श गाव योजनेला यंदा फलप्राप्ती

20 गावे पूर्णत्वाच्या मार्गावर; एप्रिलमध्ये नवीन गावनिवड

पुणे (प्रतिनिधी) ः आदर्श गाव योजनेतून आदर्शत्वाच्या मार्गावर असलेल्या 66 गावांपैकी 20 गावांमध्ये यंदा कृती आराखड्यानुसार नियोजित काम पूर्ण होणार असून येत्या पावसाळ्यात या गावांमध्ये योजनेची फलनिष्पत्ती पहावयास मिळणार आहे. उर्वरीत गावांसाठी आणखी पाच कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. योजनेतील नवीन गावांची निवड प्रक्रीया येत्या एप्रिलमध्ये सुरु करण्यात येणार आहे.

आदर्श गाव योजनेत 2011-12 पासून तीन वर्षात टप्प्याटप्प्याने 66 गावांची निवड करण्यात आली. यासाठी प्रथम 202 गावांचे प्रस्ताव दाखल झाले. यातील 100 गावांचे प्रस्ताव अपात्र ठरले. उर्वरीत 102 गावांची पहाणी करुन 66 गावांची निवड करण्यात आली. यातील 57 गावांनी प्रकल्प अहवाल सादर केले असून त्यामध्ये विविध टप्प्यात कामे सुरु आहेत. या गावांना आत्तापर्यंत 19 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. प्रकल्प क्षेत्रानुसार हेक्‍टरी 12 हजार रुपयांच्या निकषांनुसार कामे करण्यात येत आहेत. यातील 16 गावांममधील कामे प्रकल्प आराखड्यानुसार यंदा पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली.

आदर्श गाव योजनेला चालू वर्षासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यापैकी एक कोटी सात लाख रुपये जुलैमध्ये तर तीन कोटी 12 लाख रुपये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्राप्त झाले. धामणवाडी (कोल्हापूर), आपसिंगी (सांगली), बल्लारवाडी, पानवडी (पुणे), भोयरे खुर्द, टाकळी ढोकेश्‍वर, निवडुंगेवाडी, पिंपरी गवळी, पिंपरी निर्मळ, रणखांब (नगर), हाटकर मंगेवाडी (सोलापूर), किनगाव (औरंगाबाद), पिंपळदरी, पाथ्रटगोळे, चौंडी, निंबा (यवतमाळ), खोर (बुलडाणा), दवणगाव, कुंभारी (लातूर), शेळगाव गौरी (नांदेड), चिकणी, उखरडा (चंद्रपूर), गोधणी, दिग्रस बु. (नागपूर) या 24 गावांना जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयामार्फत या निधीचे वितरण करण्यात आले आहे. हा निधी ताबडतोप खर्च करुन पुढील मागणी कळविण्याच्या सुचना सर्व गावांना देण्यात आल्या आहेत.

*चौकट
- उपचार नकाशा बंधनकारक
पाणलोट व इतर कामांमध्ये गैरप्रकार होण्याची शक्‍यता विचारात घेवून पारदर्शकता राखण्याच्या उद्देशनाने आदर्श गाव योजनेतील सर्व गावांमध्ये पुर्वी झालेली कामे व आता करावयाची कामे यांचा उपचार नकाशा (ट्रीटमेंट मॅप) मोठ्या फलकावर प्रसिद्‌ध करण्याचे बंधन सर्व संस्थांवर घालण्यात आले आहे. याशिवाय कामांमध्ये होणारी प्रगती आणि खर्चाची माहितीही गावांमध्ये फलकावर लावणे बंधनकारक आहे. काही गावांमध्ये कृषी विभाग व इतर संस्थांनी केलेली कामे योजनेत दाखविण्याचा प्रकार नजरेस आल्याने हे पाऊल उचलण्यात आले असून गावकऱ्यांना कामावर बारिक लक्ष ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

*चौकट
- योजनेच्या खर्चाची बिले थकली !!!
राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयांना कार्यालयीन खर्चात कपात करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. यानुसार आदर्श गाव योजनेला कार्यालयीन खर्चासाठी मिळणाऱ्या निधीतही 40 टक्‍क्‍यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. यामुळे योजनेमार्फत प्रसिद्ध करण्यात येणारे आदर्शगाव मासिक, वाहनांचे डिझेल आदी खर्चाची चार महिन्यापासूनची बिले थकली आहेत. ही स्थिती आणखी काही काळ कायम राहीली तर योजनेचे मासिक बंद पडण्याचा व गावांमधील कामांच्या गुणवत्ता पाहणीवर परिणाम होण्याचा धोका असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

*कोट
""आदर्श गाव योजनेतील 20 गावांतील कामे यंदा 80 टक्‍क्‍यांहून अधिक पूर्ण होतील. काही गावाचे 100 टक्के काम पूर्ण होतील. येत्या पावसाळ्यात या गावांच्या यशोगाथा प्रकर्षाने समोर येतील.''
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना
------------- 

No comments:

Post a Comment