Wednesday, February 11, 2015

इस्त्रायल वाणिज्य दूत सकाळ भेट

पुणे (प्रतिनिधी) ः ""इस्त्रायलने आत्तापर्यंत व्यापारासाठी चिनवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले होते. आता भारतावर आणि त्यातही पुण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. भारत वेगाने विकसित होत असून दररोज मोठे बदल होत आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. यामुळे अनेक इस्त्रायली कंपन्या शेती, पाणी, आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीस इच्छूक आहेत. मुक्त व्यापार करार झाल्यास दोन्ही देशांचा मोठा फायदा होईल.'' असे मत इस्त्राईलच्या मुंबईतील वाणिज्य कार्यालयातील उच्चाधिकारी डेव्हीड अकोव यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील उद्योग व व्यवसाय संधींची माहिती घेण्यासाठी श्री. अकोव व इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील उच्चाधिकारी चेहम होशेन यांनी बुधवारी (ता.11) पुण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी सकाळ माध्यम समुहास सदिच्छा भेट देवून भारत व इस्त्रायलमधील व्यवसायिक संबंधवृद्धीबाबत विविध बाबींवर प्रकाश टाकला. इस्त्राईल व भारताताचे गेल्या 22 वर्षांपासून अतिशय उत्तम संबंध असून त्यात अनेक व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले आहे. भारत हा इस्त्रायलसाठी सर्वात महत्वाचा देश आहे, या दृष्टीने पुढील गुंतवणूक व व्यवसाय वृद्धीची पावले टाकण्यात येत असल्याची असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

श्री. अकोव म्हणाले, भारताचा बदलांचा, विकासाचा दर सर्वाधिक वेगाने वाढत असून पुढील वर्षात तो चिनलाही मागे टाकण्याचा अंदाज आहे. चीनमध्ये उद्योगांचा उत्पादन खर्च वाढला आहे. तुलनेत भारतात खर्च कमी आणि सुविधा जागतिक दर्जाच्या आहेत. मेक इन इंडिया या मोहीमेनुसार सुविधा उपलब्ध झाल्यास गुंतवणूकीच्या संधीही प्रचंड आहे. भारत व इस्त्रायलमध्ये अनेक गोष्टी समान आहेत. यामुळे एकमेकांमध्ये माहिती, ज्ञान, तंत्रज्ञान आदानप्रदान करण्यास मोठी संधी आहे. मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून त्यास गती मिळून इस्त्राईलमधील तंत्रज्ञान कमी किमतीत भारतीयांना उपलब्ध होऊ शकते. शेती, तंत्रज्ञान व आरोग्यासह विविध क्षेत्रात गुंतवणूकीसाठी इस्त्राईल इच्छूक आहे.

शेतीबरोबरच पाणी व आरोग्य क्षेत्रातही इस्त्रायलने मोठी कामगिरी केली आहे. तेथे 85 टक्के सांडपाणी प्रक्रीया करुन वापरले जातो. इस्त्रायलमार्फत भारतात विविध पिकांची 30 उच्च गुणवत्ता केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. यापैकी डाळींब, आंबा व संत्रा पिकासाठीची चार केंद्रे (राहुरी, दापोली, औरंगाबाद, नागपूर) सुरु झाली असून आणखी दोन लवकरच सुरु होणार आहेत. आरोग्य, शिक्षण, स्मार्ट शहरे, शिक्षण आदी बाबतीतही अशीच स्थिती आहे. एकमेकांच्या सहकार्याने दोन्ही देश संरक्षण, संशोधन आणि विकास या क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवू शकतात. यामुळे अधिकाधिक कंपन्या भारतात याव्यात यासाठी आम्ही इच्छूक आहोत, अशी माहिती अकोव यांनी दिली.

श्री. होशेन यांनी भारत व इस्त्राईल यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या संबंधांना उजाळा दिला. भारतीय कंपन्यांमार्फत इस्त्रायलमध्ये होत असलेली गुंतवणूक, इस्त्रायलमधील कंपन्यांची भारतातील कामगिरी यांचा आढावा त्यांनी घेतला. पुढील आठवड्यात इतिहासात प्रथमच इस्त्रायलचे संरक्षणमंत्री भारत भेटीवर येत असून या भेटीने दोन्ही देशांतील संरक्षण विषयक संशोधन व विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सकाळ, ऍग्रोवन व सकाळ टाईम्सचे संपादकीय सहकारी यावेळी उपस्थित होते.
------------------------ 

No comments:

Post a Comment