Friday, February 13, 2015

खानदेश गारपीट नुकसान पंचनामे सुरु, एकनाथ खडसे

पुणे (प्रतिनिधी) ः जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांतील गारपीटग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता.12) दुपारी दिले आहेत. येत्या आठ दिवसात पंचनामे पूर्ण करुन 15 दिवसात शासनाच्या सुधारीत निकषांनुसार मदत वाटप सुरु करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषी, महसूल व मदत आणि पुर्नवसन मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. खडसे म्हणाले, पंचनामे झाल्यानंतर मदत वाटपासाठी आता शासन आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही. शासनाने नुकताच गारपीटग्रस्तांना मदत वाटपाच्या निकषांचा सुधित आदेश जारी केला आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात येणार आहे. राज्य शासनाने दुष्काळग्रस्त व गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे प्रथम दोन हजार 200 कोटींची मागणी केली होती. नाशिकसह काही ठिकाणी पुन्हा गारपीट झाल्याने व दुष्काळी गावांच्या संख्येत आणखी वाढ झाल्याने ही मागणी वाढली. त्यानुसार केंद्राकडे चार हजार कोटींची मागणी करण्यात आली.

दरम्यान, राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. यानंतर राज्य शासनाने नुकताच आणखी दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राचा निधी मिळविण्याची प्रक्रीया सुरु आहे. याबाबतच्या प्रस्तावातील तृटी कृषी सचिव आणि मदत व पुर्नवसन विभागाच्या सचिवांनी दिल्लीत जावून नुकत्याच दुरुस्त केल्या आहेत. बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर हा विषय घालणार आहोत. यानंतर 18 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यासह दिल्लीला जावून याबाबत पाठपुरावा करणार आहोत. केंद्राकडून लवकरच निधी उपलब्ध होईल, असे श्री. खडसे यांनी सांगितले.
------------- 

No comments:

Post a Comment