Wednesday, February 18, 2015

नितिन जाधव, काळेवाडी (दिवे), पुरंदर, पुणे - यशोगाथा

पाण्याच्या काटेकोर वापराने
जाधव कुटुंबाने साधली समृद्धी
----------
संरक्षित पाण्यासाठी हक्काचे शेततळे हाती असेल तर खडकाळ माळरानावरही नंदनवन बहरु शकते याचा वस्तुपाठ पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍याच्या दुष्काळी पट्ट्यातील काळेवाडी (दिवे) येथिल नितिन जाधव व कुटुंबींनी उभारला आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड, सर्व शेतीला 100 टक्के सुक्ष्म सिंचनाचा वापर व त्यातून अधिकाधीक उत्पन्न मिळविण्याच्या प्रयत्नातून जाधव यांनी शेतीतून समृद्धी साधली आहे.
-----------
संतोष डुकरे
-----------
पुण्याकडून सासवडला जाताना दिवे घाट ओलांडला की डावीकडे काळेवाडी हे गाव लागते. काळेवाडी-मल्हारगड रस्त्याला मराठ्यांनी बांधलेला सर्वात शेवटचा किल्ला असा लौकिक असलेल्या मल्हारगडाच्या पायथ्याशी जाधव कुटुंबियांची शेती आहे. पाच वर्षापूर्वीपर्यंत वडील विष्णू जयराम जाधव (वय 98) यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही भावंडांची पारंपरिक पद्धतीने शेती सुरु होती. विष्णूरावांचा अंजिर उत्पादनात हातखंडा असला तरी हे पिक 100 झाडांपुरते मर्यादीत होते. कोरडवाहू, खडकाळ, मुरमाड क्षेत्र व पाणी टंचाई ही मुख्य समस्या असल्याने पावसाच्या पाण्यावर येतील तशी ज्वारी, बाजरी हिच पिके घेण्यात येत. कुटुंबाची 15 एकर शेती असली तरी फार थोडे क्षेत्र विहीर बागायत होते. त्यावर अंजिर आणि पेरुची थोडी बाग उभी होती. दरम्यान कुटुंब वाढले. पाच भावांचे संसार उभे राहीले. एक गुलटेकडी मार्केट यार्डात कांदा व बटाट्याची आडत व्यवसाय, दुसरा पाटबंधारे खात्यात, तिसरा कृषी विभागात पर्यवेक्षक आणि दोन जणांनी शेतीत करिअर घडवले. भावंडांनी पन्नाशी ओलांडल्यानंतर परस्पर समंजस्याने वाटणी झाली.

नितिन जाधव यांचे वडील दिलीप हे राज्याच्या कृषी विभागात सासवड येथिल तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक पदी कार्यरत आहेत. वाटण्या झाल्यानंतर सुमारे पाच एकर जमीन त्यांच्या वाट्याला आली. विहीर होती पण हंगामी. जेमतेम फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरायचे. शेवटी पाण्याचे दुर्भिक्ष मिटविण्यासाठी त्यांनी 2010 साली 50 लाख लिटर क्षमतेचे 45 मिटर लांब, 45 मिटर रुंद व 22 फुट खोल असे शेततळे खोदले. त्यावर प्लॅस्टिक आच्छादन वापरले. विहीरीतील पाणी उपसून शेततळ्यामध्ये संरक्षित पाणीसाठी केला जातो. शेततळे झाडांपेक्षा 20 फुट उंचीवर असल्याने पाण्याचा दाब चांगला राहत असल्याने शेततळ्यातून सायफन पद्धतीने ठिबकने सर्व बागांना पाणी दिले जाते.

शेततळ्यामुळे पाण्याची शाश्‍वती आल्याने श्री. जाधव यांनी अंजिर लागवड करण्याचा निर्णय घेतला. बारामती येथिल कृषी विज्ञान केंद्रातून दिनकर वाणाची 180 रोपे आणून त्याची जून 2011 मध्ये सव्वा एकर क्षेत्रावर लागवड केली. लागवडीनंतर वर्षभरात म्हणजेच 2012 पासून अंजिराचे उत्पादन सुरु झाले. अंजिरापाठोपाठ पुणे कृषी महाविद्यालयातील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या रोपवाटिकेतून रोपे आणून त्यांनी जुलै-ऑगस्ट 2012 मध्ये त्यांनी तीन एकर क्षेत्रावर डाळींबाच्या भगवा वाणाच्या 600 झाडांची लागवड केली. शासकीय नोकरीमुळे दिलीप यांना शेतीकडे पुरेसे लक्ष देता येत नव्हते. यामुळे त्यांनी 2012 पासून शेतीची सर्व सुत्रे मुलगा नितीन याच्याकडे सोपवली.

नितिनने शेतीची सुत्रे हाती घेतल्यानंतर जाधव कुटुंबाच्या शेतीला खऱ्या अर्थाने गती आली. शेतीची सर्व कामे, नियोजन नितिन पाहतो. अंजिराचा आगाप मिठा बहार ते धरतात. गेल्या वर्षी (2014) प्रत्येक झाडास सरासरी 20 किलो अंजिर मिळाले. त्यास सरासरी 40 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. बागेपासून एक लाख 80 हजार रुपये उत्पन्न व खर्च वजा जाता एक लाख रुपये नफा झाला. यंदा प्रतिझाड 30 ते 35 किलो अंजिर उत्पादनाचा अंदाज आहे. सध्या अंजिराची तोडणी सुरु आहे. यंदा आत्तापर्यंत 12 अंजिराच्या पेटीला 280 रुपये असा सर्वोच्च दर मिळाला आहे. तीन किलोची पेटी सरासरी 200 रुपयांना विकली जात आहे. सर्व माल विक्रीसाठी निवड करुन कागदी खोक्‍यात व्यवस्थित पॅकिंग करुन मुंबईला विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे.

लागवडीनंतर 18 महिन्यांनी नोव्हेंबर 2013 मध्ये डाळींबाचा पहिला बहार धरला. त्याची काढणी जून 2014 मध्ये झाली. सुमारे सहा टन डाळींबाची 65 व 50 रुपये किलो दराने बागेतच व्यापाऱ्याला विकला. सरासरी 40 रुपये किलोने बागेपासून सुमारे दोन लाख 40 हजार रुपये उत्पन्न मिळाले. औषधे, खते, पाणी, मजूरी आदी सर्व बाबींसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च झाला. यंदा डाळींबाच्या ताणाचे नियोजन फसल्याने त्यांनी सर्व झाडांवर रोपनिर्मितीसाठी गुठी बांधल्या असून गुठ्यांची छाटणी नुकतिच सुरु झाली आहे. यापासून ते यंदा भगवा वाणाची रोपे तयार करत आहेत. याशिवाय पेरुच्या गुलाबी वाणाच्या 110 झाडांची लागवडही त्यांनी केली आहे.

- असा सोडवलाय मजूरीचा प्रश्‍न
सर्व फळबागांच्या कामासाठी जाधव यांच्याकडे दोन गडी व एक महिला असे तीन मजूर बारमाही असतात. गड्याला 200 रुपये व महिलेला 100 रुपये मजूरी वर्षभरासाठी निश्‍चित आहे. याशिवाय झाडांच्या खणनीचे काम परिसरातील मजुरांच्या टोळ्यांना प्रति खोड 30 रुपये याप्रमाणे उपते दिले जाते. डाळींबाच्या छाटणीसाठी बेलसर येथून टोळी येते. त्यांना 30 रुपये प्रति झाड याप्रमाणे मजूरी दिली जाते. हवामानानुसार बागांची फवारणी केली जाते. अंजिराला दर दहा पंधरा दिवसांनी तांबेरा, मावा, तुडतुडे नियंत्रणासाठी फवारणी केली जाते. जुन्या स्कूटरला एचटीपी पंप बसवून कमी खर्चात फवारणीची यंत्रणा तयार केली आहे. जुनी स्कुटर, पंप, 300 फुटांच्या दोन नळ्या, नोझल, जोडणी यासाठी एकूण 15 हजार रुपये खर्च आला. प्रति तास एक लिटर पेट्रोल लागते. दोन लिटर पेट्रोलमध्ये तीन एकरवरील पिकाची फवारणी पूर्ण होते.

- रसायने टाळण्यावर भर
जाधव यांचा शेतीसाठी शक्‍य तेवढ्या प्रमाणात रासायनिक खते व औषधे टाळण्यावर भर आहे. अंजिराला ते रासायनिक खते वापरत नाहीत. प्रत्येक झाडाला 100 किलो शेणखत त्यात प्रत्येकी पाच किलो स्फुरद विघटक जिवाणू, ट्रायकोडर्मा व अझॅटोबॅक्‍टर मिसळून देतात. अंजिराची फळधारणा झाल्यानंतर नायट्रोबेन्झिन किटकनाशकासोबत फवारतात. तांबेरा रोगापासून बचाव करण्यासाठी अंजिराची विशेष काळजी घ्यावे लागते. अन्यथा बागेचे 50 टक्के बागेचे नुकसान होते. अंजिराची पाने गळाली तर हाती काहीच राहत नाही. त्यासाठी क्‍लोरोथॅनोनिल, कार्बाडेन्झिम, मोनोक्रोटोफॉस यांच्या दहा दिवसांच्या अंतराने फवारण्या केल्या जातात. याशिवाय लाल कोळी नियंत्रणासाठी डायक्‍लोफॉल फवारणी केली जाते.

- अनुदानाचा आधार
शासकीय योजनांची माहिती असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांचा लाभ श्री. जाधव यांनी घेतला आहे. शेततळ्याच्या खोदाईसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून त्यांना 90 हजार रुपये अनुदान मिळाले आहे. या तळ्याच्या प्लॅस्टिक आच्छादनासाठी प्रस्ताव सादर केलेला असून त्याचे अनुदान प्रतिक्षेत आहे. डाळींब व अंजिर या दोन्ही पिकांसाठी त्यांना रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान मिळाले आहे. फळबागांच्या ठिबक सिंचनासाठीही 50 टक्के अनुदान मिळाले आहे. कृषी सेवा केंद्रासाठी कृषी पदविधरांसाठीच्या योजनेच्या लाभासाठी नाबार्डकडे सुमारे पाच लाख रुपये अनुदानाचा प्रस्ताव प्रतिक्षेत आहे.

- आजोबांचे मोलाचे मार्गदर्शन
नितिन यांचे आजोबा श्री. विष्णू जाधव यांचे अंजिर उत्पादनासाठी मोलाचे मार्गदर्शन असते. आज वयाच्या 98 व्या वर्षीही ते नातवंडाना शेतीबाबत उत्साहाने मार्गदर्शन करत असतात. कुटुंबाच्या पारंपरिक खडकाळ जमीनीची बांधबंदिस्ती, मशागत आदी सर्व कामे 25 वर्षापूर्वी बैलांनी करुन जमीन लागवडी योग्य केली. यामुळे पुढल्या पिढीचे काम अधिक सोपे झाले आहे. अंजिर उत्पादनात त्यांचा हातखंडा आहे. गेली 30 वर्षापासून अंजिराचे तर तब्बल 80 वर्षापासून ते सिताफळाचे उत्पादन घेत आहेत. मध्यंतरी 1970-72 दरम्यान त्यांनी द्राक्ष उत्पादनही घेतले. मात्र बागायती क्षेत्र कमी असल्याने त्यावर मर्यादा राहील्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व भाऊ चांगली शेती करत आहेत. शेतीला पुरक सामाहिक व्यवसाय म्हणून पाचही भावंडांनी पुणे सासवड रस्त्यावर गावातच हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे.

- शेती आणि कृषी सेवा केंद्र
नितिनने फलटन येथिल श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातून उद्यानविद्या पदवी व त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून 2012 मध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदविका संपादन केली आहे. यानंतर ऍग्री क्‍लिनिक ऍण्ड ऍग्री बिझनेस प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करुन त्याने जून 2013 मध्ये बॅंक ऑफ इंडियाचे 15 लाख रुपये कर्ज घेवून सासवडला हरेकृष्ण कृषी सेवा केंद्र सुरु केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करुन मार्गदर्शन व सल्ला देत असल्याने शेतकऱ्यांचा त्यास चांगला प्रतिसाद आहे. सासवड परिसरातील 25 गावातील सुमारे दोन हजार शेतकरी अल्पावधीतच त्याच्याशी जोडले गेले आहेत. यात डाळींब, अंजिर, सिताफळ, पेरु उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांची सर्व संगणकीकृत माहिती त्याच्याकडे उपलब्ध आहे.
------------  

No comments:

Post a Comment