Wednesday, February 25, 2015

कपाशी बीटी बियाणे - विजय जावंधियांचे केंद्राला पत्र

कापूस संशोधन केंद्राच्या
बीटी सरळ वाणांचे बियाणे द्या

शेतकरी संघटनेची केंद्र शासनाकडे मागणी

पुणे (प्रतिनिधी) ः केंद्र शासनाने येत्या खरिप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत (नागपूर) संशोधित बीटी कपाशीच्या सरळ वाणांचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावे अशी मागणी, शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. त्यांनी याबाबत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागणी पत्र पाठवले आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने बीटी सरळ वाण विकसित केले आहेत. हे वाण अधिक उत्पादनक्षम असून त्यात दर वर्षी नवीन बियाणे विकत घेण्याची गरज नाही. शेतकरी या वाणापासून तयार होणारे घरचेच बियाणेही पुढच्या वर्षी पेरु शकतो. संशोधन केंद्राने 2009 मध्ये शेतकऱ्यांना हे बियाणे 100 रुपये प्रतिकिलो दराने दिले होते. मात्र यानंतर या बियाण्याला फारसे प्रोत्साहन देण्यात आले नाही.

शेतकरी कपाशीच्या बियाण्यासाठी राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे गुलाम झाल्यासारखी स्थिती आहे. देशातील कापूस उत्पादकांना बीटी शिवाय दुसरे कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही. अमेरिकेत बीटी कपाशीच्या बियाण्याचा वापर केला जात नाही आणि तेथिल कंपनी हे बियाणे भारतात विकत आहे. हे बियाणे संकरित असल्याने शेतकऱ्यांना दर वर्षी हजारो रुपये मोजून विकत घ्यावे लागते.

शासनाने कापूस संशोधन केंद्राच्या कपाशीच्या वाणांचे बियाणे येत्या खरिपासाठी उपलब्ध करुन दिल्यास शेतकऱ्यांच्या कपाशीसाठीच्या एकरी खर्चात सुमारे दोन ते तीन हजार रुपयांची मोठी बचत होईल आणि त्यामुळे एकरी जास्त रोपांची लागवड पद्धती (सघन पद्धत) अवलंबणे अधिक सोपे होईल, असे श्री. जावंधीया यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
------------- 

No comments:

Post a Comment