Tuesday, January 13, 2015

कृषीच्या प्रयोगशाळांना यंदा 3.75 कोटी रुपये

75 टक्के निधी खरेदीसाठी; कंत्राटी सेवा, बांधकामांवर भर

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी निविष्ठांचे गुणवत्ता नियंत्रण व उर्वरित अंश तपासणीसाठी राज्यात कार्यरत असलेल्या 14 शासकीय प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यंदा तीन कोटी 75 लाख रुपये उपलब्ध करण्यास राज्य शासनाने नुकतिच मंजुरी दिली आहे. पुढील दोन वर्षात या प्रयोगशाळांना आणखी साडेसात कोटी रुपये अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ, गौन बांधकाम, अंकुरण कक्षाचे नुतनीकरण, इस्टा व एनएबीएल नोंदणी, उपकरणांची क्षमतावृद्धी, उपकरणे व रसायन खरेदी, देखभाल आदी बाबींसाठी हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये दोन कीडनाशक उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळांसाठी 75 लाख रुपये, चार किटकनाशक चाचणी प्रयोगशाळांसाठी एक कोटी रुपये, पाच खत नियंत्रण प्रयोगशाळांसाठी एक कोटी रुपये व तीन बीज परिक्षण प्रयोगशाळांसाठी तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

प्रयोगशाळांची तपासणी क्षमता वाढविणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी, गौण बांधकामे, नवीन तंत्रज्ञानाची अद्ययावत उपकरणे प्रयोगशाळांना उपलब्ध करणे, उपयोगात असलेल्या उपकरणांची देखभाल व दुरुस्ती, प्रयोगशाळेतील अधिकार्यांना उपकरणे हाताळणी आणि विश्‍लेषकांचे विश्‍लेषणाबाबतचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.

- 75 टक्के निधी खरेदीसाठी
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्रयोगशाळांसाठी उपलब्ध होणाऱ्या या निधीतून सर्वाधीक म्हणजेच सुमारे 70 टक्के निधी हा नवीन उपकरणे वा सुट्या भागांच्या खरेदीसाठी खर्च करण्याचे कृषी आयुक्तालयाचे नियोजन आहे. मिळणाऱ्या 3.75 कोटी रुपयांपैकी एक कोटी 13 लाख रुपयांची नवीन उपकरणे आयुक्तालयामार्फत खरेदी करण्यात येणार आहेत. याशिवाय एक कोटी 69 लाख रुपये सुट्या भागांच्या खरेदीसाठी वापरण्यात येणार आहेत. म्हणजेच उपलब्ध रकमेच्या 75 टक्के रक्कम (2.82 कोटी रुपये) उपकरणांच्या खरेदीसाठी खर्च करण्यात येणार आहे. ही खरेदी आयुक्तालय स्तरावरुन निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांमार्फत होणार आहे.

- कंत्राटी सेवेसाठी 17 लाख
कृषी विभागाच्या प्रयोगशाळांना तज्ज्ञ तांत्रिक मनुष्यबळाचा तुटवडा नेहमी भासतो. यावर आता कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे. मात्र यंदा म्हणजेच 2014-15 या वर्षासाठी वर्षाचे शेवटचे अडीच महिने बाकी असताना किडनाशक उर्वरित अंश तपासणीच्या दोन प्रयोगशाळांसाठी अडीच लाख रुपये आणि बीज परिक्षणाच्या तीन प्रयोगशाळांसाठी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचारी सेवेत घेवून पुढील तीन महिन्यात ही रक्कम खर्च करण्याचे उद्दीष्ट आहे.
------------(समाप्त)------------- 

No comments:

Post a Comment