Saturday, January 17, 2015

१२ नवीन जनुकीय चाचण्यांची शिफारस - डाॅ. अनिल काकोडकर समिती बैठक

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात येत्या दोन वर्षात सहा खासगी बियाणे कंपन्यांना चार पिकांसाठी 12 चाचण्या घेण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्याची शिफारस रिव्हू कमीटी ऑन जिनॅटिक मॅनिप्युलेशन (आरसीजीएम, डॉ. काकोडकर समिती) यांनी राज्य शासनाला केली आहे. समितीच्या गेल्या बैठकीत 11 तर शनिवारी (ता.17) झालेल्या बैठकीत एका चाचणीची शिफारस करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, कृषी आयुक्त विकास देशमुख, माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख आदी सदस्य बैठकीस उपस्थित होते.

डॉ. काकोडकर समितीच्या शिफारसीनुसार राज्य शासनाने अंकुर सिड्‌स, बायर बायो सायन्स, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च, डाऊ ऍग्रो सायन्सेस, महिको, मॉन्सॅन्टो, पायोनीर व्होरसीज व सिंजेंटा बायो सायन्सेस या आठ कंपन्यांना वांगी, कापूस, मका, भात व गहू या पाच पिकांवर विविध प्रकारच्या 28 जनुकीय चाचण्या घेण्यास यापुर्वीच परवानगी दिली आहे. त्यानंतर आता महिको, पायोनीर, बैजो शितल, देवगेन सिड्‌स, सनग्रो सिड्‌स व बीएएसएफ इंडिया या कंपन्यांना आखणी 12 चाचण्यांची शिफारस करण्यात आली आहे. राज्य शासनाने या शिफारशींना हिरवा कंदील दाखवला तर राज्यातील चाचण्यांची संख्या 40 वर पोचणार आहे.

- अंकूर सिड्‌सला एक वर्षाची मुदतवाढ
अंकूर सिड्‌स प्रा. लि. नागपूर यांना वांगी पिकाच्या अजय बीटी, विजय बीटी व किर्ती बीटी या संकरित वाणांच्या कीड प्रतिकारक चाचण्या घेण्यासाठी डॉ. काकोडकर समितीच्या शिफारशीनंतर राज्य शासनाने यापुर्वीच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्या वेळी कंपनीला एक वर्षात चाचण्याच्या घेण्याच्या सुचना होता. ही मुदत आणखी वाढवून देण्याचा प्रस्ताव अंकूरमार्फत समितीसमोर सादर करण्यात आला होता. त्याला समितीने आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची शिफारस केली आहे.

- जिल्हास्तरीय समित्या स्थापन्याचे आदेश
कृषी आयुक्तालयामार्फत सहा महिन्यांपूर्वीच सर्व जिल्हाधिकार्यांना जनुकीय चाचण्यांसंदर्भात जिल्हा समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यानुसार आत्तापर्यंत नगर व परभणी जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन झाल्या असून या जिल्ह्यांमध्ये झालेल्या चाचण्या या समितीच्या देखरेखीखाली घेण्यात आल्या. याच धर्तीवर उर्वरीत जिल्ह्यांनीही समित्या स्थापन करुन त्याची माहिती कृषी आयुक्तालयास कळवावी, अशा सुचना कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिल्या आहेत.

- मॉन्सॅन्टोच्या तीन चाचण्या पूर्ण
डॉ. काकोडकर कमीटीच्या शिफारसीनुसार राज्य शासनाची ना हरकत आणि त्यावरुन केंद्राची परवानगी मिळालेल्या मॉन्सॅन्टो इंडिया लि. कंपनीच्या मका पिकाच्या तीन जनुकीय चाचण्या कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. यापैकी दोन चाचण्या (कीड प्रतिकारक, तणनाशकाचा परिणाम न होणाऱ्या) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील प्रक्षेत्रावर तर एक चाचणी (कीड प्रतिकारक व तणनाशकाचा परिणाम न होणारी एकत्रित) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राहूरी येथिल प्रक्षेत्रावर घेण्यात आली. या दोन्ही चाचण्यांतील मक्‍याची काढणी पूर्ण झाली असून या चाचण्यांचे अहवाल केंद्राला सादर करण्यात येणार आहे.

- दहा जिल्ह्यांत होणार चाचण्या
नगर व परभणीपाठोपाठ राज्यातील आणखी नऊ ते दहा जिल्ह्यांमध्ये येत्या काही महिन्यात जनुकीय पिकांच्या चाचण्या सुरु होण्याचा अंदाज आहे. कंपन्यांच्या चाचण्यांची शिफारस करतानाच चाचण्यांची ठिकाणेही निश्‍चित करण्यात आली आहेत. यानुसार येत्या काळात चंद्रपूर, औरंगाबाद, नगर, रत्नागिरी, रायगड, अकोला, परभणी, कोल्हापूर, नागपूर, नगर व पुणे या ठिकाणी संबंधीत कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर जनुकीय चाचण्या होणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये तातडीने जिल्हा समित्या स्थापन करण्याच्या सुचना कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.

* चौकट
- राज्य शासनाला शिफारस केलेल्या चाचण्या...
कंपनी --- पिक (चाचण्यांची संख्या) --- चाचण्यांचा उद्देश
महिको --- कापूस (2) --- नत्राचा पूरेपूर वापर, पाण्याचा ताण सहन करणे
--- भात (2) ---- तणनाशकाचा परिणान न होणे, नत्राचा पुरेपूर वापर
पायोनीर ओव्हरसीज कॉर्पोरेशन --- भात (2) --- तणनाशकाचा परिणान न होणे
देवगेन सिड्‌स ऍण्ड क्रॉप टेक्‍नॉलॉजी -- भात (2) --- कीड प्रतिकारक
सनग्रो सिड्‌स लि. --- हरभरा (2) --- कीड प्रतिकारक
बीएएसएफ इंडिया लि. ---- भात (1) --- आसपीडी 5 टू 17
बैजो शितल --- वांगी (1) --- कीड प्रतिकारक
-----------------------
*कोट
""कंपन्यांकडून जनुकीय चाचण्यांसाठी प्रस्ताव दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता, चाचण्यांची तयारी, सुरक्षितता आदी सर्व बाबींची खात्री करुन राज्य शासनाला शिफारस करण्यात येत आहे. चाचण्यांशी संबंधीत शास्त्रज्ञ व प्रशासकीय सदस्यांच्या क्षमतावृद्धीचेही काम सुरु आहे.''
- डॉ. अनिल काकोडकर, अध्यक्ष, आरसीजीएम, महाराष्ट्र राज्य.
----------------------- 

No comments:

Post a Comment