Wednesday, January 7, 2015

रब्बी अखेरीस 41 लाख हेक्‍टरवर पेरणी

66 टक्के क्षेत्रावर पेरा; 21 लाख हेक्‍टर नापेर

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात चालू रब्बी हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. हंगामात आत्तापर्यंत सरासरी 62 लाख 43 हजार हेक्‍टरपैकी जेमतेम 41 लाख 34 हजार हेक्‍टर म्हणजेच 66 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीयोग्य पाऊस व ओलीअभावी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे पेरणीक्षेत्र 13 लाख 25 हजार हेक्‍टरने कमी झाले असून तब्बल 21 लाख हेक्‍टर क्षेत्र नापेर राहीले आहे. याशिवाय पावसाअभावी पाण्याचा ताण पडल्याने पेरणी होवूनही हातचे गेलेले पिक क्षेत्रही मोठे आहे. मात्र त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. गतवर्षी याच कालवधीदरम्यान राज्यात 54 लाख 59 हजार 500 हेक्‍टरवर पेरणी झाली होती.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव, सातारा, बुलडाणा, यवतमाळ व गडचिरोली या पाच जिल्ह्यांमध्ये रब्बी पेरण्यांनी सरासरी गाठली आहे तर पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत राज्यात सर्वात कमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील 70 टक्के रब्बी क्षेत्र नापेर आहे. कोल्हापूर, अमरावती व नागपूर या तीन विभागांमध्ये रब्बी पेरण्यांची स्थिती चांगली आहे. कोकणात ठाणे व रत्नागिरीत निम्म्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून रायगड व सिंधुदुर्गमध्ये त्यातल्या त्यात बरी स्थिती आहे. उर्वरीत विभागांमध्ये रब्बी होरपळल्याचे चित्र आहे.

तेलबियांची स्थिती बिकट
राज्यात तेलबियांचे सरासरी चार लाख 38 हजार 400 हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी फक्त 82 हजार 900 हेक्‍टरवर (19 टक्के) यंदा पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी या वेळी एक लाख 81 हजार 800 हेक्‍टरवर म्हणजेच यंदाच्या दुपटीहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली होती. तुलनेत तृणधान्य व कडधान्य पेरणीची स्थिती बरी आहे. तृणधान्याच्या सरासरी 43 लाख 73 हजार 500 हेक्‍टर क्षेत्रापैकी 27 लाख 62 हजार 500 (63 टक्के) व कडधान्याच्या सरासरी 14 लाख 31 हजार 100 हेक्‍टर क्षेत्रापैकी 12 लाख 89 हजार हेक्‍टर (90 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामुळे तृणधान्याच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका असला तरी कडधान्य उत्पादनातील सातत्य राखणे शक्‍य होवू शकते.

सर्वाधिक पेरणी नगर जिल्ह्यात
पेरणी क्षेत्रात तब्बल 30 टक्‍क्‍यांनी घट होवूनही नगर जिल्ह्याने रब्बी हंगामातील आपली आघाडी कायम राखली आहे. जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक पाच लाख 45 हजार 500 हेक्‍टरवर (69 टक्के) रब्बी पेरणी झाली आहे. सुमारे अडीच लाख रब्बी क्षेत्र नापेर आहे. नगरमध्ये 3 लाख 88 हजार हेक्‍टरवर ज्वारी, 63 हजार 200 हेक्‍टरवर गहू, नऊ हजार 400 हेक्‍टरवर मका, 81 हजार 900 हेक्‍टरवर हरभरा, दोन हजार 100 हेक्‍टरवर करडई, एक हेक्‍टरवर जवस व सहा हेक्‍टरवर सुर्यफुल पिकांची पेरणी झाली आहे. उर्वरित क्षेत्रावर इतर अन्नधान्य व तेलबिया पिकांची पेरणी आहे.

मक्‍याच्या क्षेत्रात दुपटीने वाढ
राज्यात मक्‍याचे सरासरी क्षेत्र 99 हजार 600 हेक्‍टर आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत 2 लाख 15 हजार 500 हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा आत्तापर्यंत एक लाख 97 हजार 200 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच मक्‍याच्या क्षेत्रात यंदा सरासरीहून दुपटीने वाढ तर गेल्या वर्षीहून 18 हजार हेक्‍टरने घट झाली आहे. मक्‍याचे क्षेत्र वाढल्याने राज्यात अनेक ठिकाणी पिक पद्धतीत बदल झाले आहेत.

गहू, ज्वारीत 40 टक्‍क्‍यांनी घट
ज्वारी हे राज्यातील प्रमुख रब्बी पिक आहे. या पिकाच्या सरासरी 30 लाख 90 हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी 18 लाख 43 हजार 900 हेक्‍टरवर आत्तापर्यंत पेरणी झाली आहे. फक्त ज्वारी पिकाचे तब्बल 12 लाख हेक्‍टर क्षेत्र नापेर आहे. गव्हाची सात लाख नऊ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली असून सुमारे साडेचार लाख हेक्‍टर क्षेत्र नापेर राहीले आहे. मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस व वाढलेला थंडीचा कडाका यामुळे पेरणी वाढण्याची आशा वाढली होती. मात्र प्रत्यक्षात त्याचा फार काही फायदा झाला नसल्याचे चित्र आहे.

हरभरा क्षेत्राला मोठा फटका
रब्बी कडधान्य क्षेत्र व उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेल्या हरभरा पिकालाही यंदाच्या नापेर क्षेत्राचा मोठा फटका बसणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. गेल्या वर्षी 17 लाख 37 हजार 400 हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा त्यात पाच लाख हेक्‍टरहून अधिक घट होवून 11 लाख 95 हजार हेक्‍टरवर हरभरा वाढीस लागला आहे. यामुळे हरभरा उत्पादनातही गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या घटीचा अंदाज आहे.

सुर्यफुलाच्या क्षेत्रात 91 टक्‍क्‍यांनी घट
रब्बी हंगामात सर्वाधिक फटका सुर्यफुल पिकाला बसला आहे. सुर्यफुलाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असल्याने नगण्य पेरणी झाली आहे. राज्यात सुर्यफुलाचे सरासरी एक लाख 65 हजार 500 हेक्‍टर क्षेत्र आहे. दुष्काळाच्या तडाख्यामुळे गेल्या वर्षी 35 हजार 400 हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र आत्तापर्यंत अवघ्या 15 हजार 600 हेक्‍टरवर (9 टक्के) पेरणी झाली आहे. एकट्या लातुर विभागात एक लाख हेक्‍टरवर म्हणजेच राज्याच्या तब्बल 60 टक्‍क्‍यांहून अधिक क्षेत्रावर सुर्यफुलाचे उत्पादन घेतले जाते. यंदा या विभागात जेमतेम चार हजार आठशे हेक्‍टरवर सुर्यफुल पेरणी झाली आहे. बहुतेक जिल्ह्यांमध्ये पेरणीचे प्रमाण नगण्यच आहे.

तीळ हद्दपार होण्याच्या मार्गावर
तेलबिया पिकांमध्ये आणि आहार व औषधी उपयोगातही महत्वाचे स्थान असलेले तीळ हे तेलबिया पिक राज्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र या रब्बी हंगामात आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील तिळाचे क्षेत्र सातत्याने घटत आहे. यंदा त्यात आणखी घट झाली असून फक्त दोन हजार हेक्‍टरवर (41 टक्के) तिळाची पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. टंचाई स्थिती विचारात घेता प्रत्यक्षात यापैकी फार कमी क्षेत्रावरील तीळ उत्पादन हाती येण्याची शक्‍यता आहे.

किड - रोगांचाही प्रादुर्भाव
अमरावती व नागपूर विभागांसह राज्यात अनेक ठिकाणी रब्बी पिकांवर अल्प ते अत्यल्प प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे. यातही प्रामुख्याने हरभरा पिकावर मर रोग व घाटे अळीचा प्रादुर्भाव आहे. याशिवाय तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व मर रोगाचा तर कापूस पिकावर पांढरी माशी व लाल्या विकृतीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे.

*चौकट
- पिकनिहाय रब्बी पेरणी (हेक्‍टरमध्ये)
पिक --- सरासरी क्षेत्र --- गेल्या वर्षीची पेरणी --- यंदाची पेरणी ..........पेरणीची टक्केवारी
ज्वारी --- 30,90,000 --- 22,18,000 --- 18,43,900 .......60
हरभरा --- 13,06,800 --- 17,37,400 --- 11,95,600 .......91
गहू --- 11,78,600 --- 9,90,800 --- 7,09,100 ...............60
करडई --- 2,11,300 --- 1,05,500 --- 39,700 ................19
मका --- 99,600 --- 2,15,500 --- 1,97,200 .................198
सुर्यफुल --- 1,65,500 --- 35,400 --- 15,600 .................9
जवस --- 49,900 --- 30,800 --- 17,700 ......................36
तीळ --- 3,300 --- 2,000 --- 1,300 .............................41
----------------------------
*चौकट
- जिल्हानिहाय पेरणी व कंसात पेरणीची सरासरीच्या तुलनेत टक्केवारी
ठाणे 4,900 (50), रायगड 7,300 (73), रत्नागिरी 9,700 (78), सिंधुदुर्ग 2,700 (52), नाशिक 80,100 (60), धुळे 48,900 (80), नंदुरबार 46,300 (67), जळगाव 1,55,200 (102), नगर 5,45,500 (69), पुणे 1,76,000 (30), सोलापूर 4,98,700 (60), सातारा 2,24,100 (103), सांगली 2,26,400 (90), कोल्हापूर 31,900 (79), औरंगाबाद 1,18,100 (44), जालना 1,56,800 (72), बीड 2,35,300 (62), लातूर 1,33,000 (71), उस्मानाबाद 2,97,900 (66), नांदेड 65,200 (51), परभणी 97,300 (31), हिंगोली 74,100 (59), बुलडाणा 1,96,300 (129), अकोला 64,800 (56), वाशिम 71,100 (80), अमरावती 1,31,700 (89), यवतमाळ 94,400 (108), वर्धा 48,500 (89), नागपूर 1,35,100 (93), भंडारा 35,800 (89), गोंदिया 25,400 (95), चंद्रपूर 68,300 (56), गडचिरोली 30,000 (117)
---------------------------------
*चौकट
- विभागनिहाय पेरणी (हेक्‍टरमध्ये)
विभाग --- सरासरी क्षेत्र --- रब्बी 2013-14 --- रब्बी 2014-15 ---- टक्केवारी
कोकण --- 34400 --- 18300 --- 22300 --- 65
नाशिक --- 415000 --- 379800 --- 330500 --- 80
पुणे --- 2201400 --- 1514000 --- 1220200 --- 55
कोल्हापूर --- 509300 --- 422300 --- 482400 --- 95
औरंगाबाद --- 863300 --- 636900 --- 510200 --- 59
लातुर --- 1214100 --- 1246600 --- 667400 --- 55
अमरावती --- 592500 --- 773000 --- 558300 --- 94
नागपूर --- 413100 --- 468600 --- 343100 --- 83
------------------------------------- 

No comments:

Post a Comment