Saturday, January 3, 2015

गोवारीकर मॉन्सून मॉडेलचा जनक कालवश

पुणे (प्रतिनिधी) ः देशातील नैऋत्य मोसमी पावसाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठीचे गोवारीकर मॉन्सून मॉडेल आणि खतांच्या विश्‍वकोषाचे जनक जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर (वय 81) यांचे शुक्रवारी (ता.2) सकाळी साडे अकरा वाजता येथील दिनानाथ मंगेशकर रुग्नालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता वैकुंठ स्मशानभूमीतील विद्यूत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. गोवारीकर यांच्या मागे पत्नी, तीन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

अग्नीबाणाच्या घन इंधनाच्या निर्मितीपासून ते पावसाच्या अंदाजापर्यंत अनेक क्षेत्रात डॉ. गोवारीकर यांनी महत्वपूर्ण संशोधन केले. अवकाश आणि हवामान क्षेत्रात ते जागतिक पातळीवर अग्रस्थानी होते. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव, सलग चार वेळा पंतप्रधानांचे विज्ञानिक सल्लागार, भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु आदी महत्वपूर्ण पदांवर काम केले. याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील अनेक समित्यांचे प्रमुख म्हणूनही त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली. भारत सरकारमार्फत त्यांना पद्मश्री व पद्मभूषण सन्मानांनी गौरविण्यात आले होते.

डॉ. वसंत रणछोड गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी चरख्याच्या माध्यमातून ऑटोमोटिव्ह वायंडिंगचा शोध लावला. याची दखल महात्मा गांधींचे सचिव महादेवभाई देसाई यांनी घेतली होती. कोल्हापूरातील राजाराम महाविद्यालयातून पदवी आणि गणितातून एमएस्सी केले. ब्रिटनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पूर्ण केली. प्रॉपेलन्ट ऍण्ड रॉकेट टेक्‍नॉलॉजी, हीट अँड मास ट्रान्स्फर या विषयांती त्यांनी डी.एस्सी (ऑनरिस कॉजा) पदवी संपादन केली. डॉ. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे त्यांनी भारतात परत येऊन अंतराळ संशोधनात स्वतःला झोकून दिले. या क्षेत्रात भारताला जगातीत पातळीवर मानाचे स्थान मिळवून देण्यात डॉ. होमी भाभा, डॉ. साराभाई यांच्या बरोबरीने डॉ. गोवारीकर यांचा मोलाचा वाटा होता.

- शेतीशी नाळ जुळलेला शास्त्रज्ञ
डॉ. गोवारीकर यांची शेतीशी जुळलेली नाळ अखेरपर्यंत कायम होती. अगदी रुग्नालयात दाखल होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी देशात पडलेला दुष्काळ आणि शेतीला बसणारा फटका यावर काय उपाययोजना करता येतील आणि दुष्काळमुक्त शेती कशी करता येईल याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहीले. या पत्रात त्यांनी दुष्काळमुक्त शेतीसाठीचे व्हिजन व प्लॅन सांगितला आहे.

- गोवारीकर मॉन्सून मॉडेल
पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार असताना डॉ. गोवारीकर यांनी नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठीचे अचूक मॉडेल विकसित करणाऱ्या संशोधकांचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध "पॉवर रिग्रेशन' मॉडेल विकसित करण्यात आले. हेच मॉडेल गोवारीकर मॉडेल म्हणूनही ओळखले जाते. भारतीय हवामान विभागाने 1988 पासून 2002 पर्यंत देशातील मॉन्सून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी या मॉडेलचा वापर केला. पावसाच्या अंदाजासंदर्भातील संशोधनासाठी हे गोवारीकर मॉडेल उपयुक्त ठरत आहे.

- खत, किडनाशकांचे विश्‍वकोष
रसायनशास्त्रात पीएच.डी संपादन केलेल्या डॉ. गोवारीकर यांनी खते व किटकनाशकांचे विश्‍वकोष तयार करण्याची संकल्पना मांडली. यानुसार व्ही. एन. कृष्णमुर्ती यांच्या सहकार्याने त्यांनी लिहीलेले "फर्टिलायझर एनसायक्‍लोपिडिया' आणि "पेस्टिसाइड सायक्‍लोपिडीया' हे ग्रंथ जगभर गाजले आहेत.

*प्रतिक्रीया
""अजोड बुद्धीने व अपार कष्टाने अवकाशास गवसणी घालणाऱ्या पण त्याचबरोबर मातीशी नातं जपणाऱ्या गुणी शास्त्रज्ञास भारत मुकला आहे. त्यांनी अंतराळ संशोधनाची शेती क्षेत्राशी सांगड घालण्याची मोठी कामगिरी केली. हवामान अंदाज, पीकवाढ, जमीन सुपीकता, खते-सुक्ष्मद्रव्ये संशोधन अशा नानाविध बाबतीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय शेतकरी वर्गात गोवारीकरांबाबत आदरभाव चिरंतर राहील. गोवारीकरांनी लिहिलेला खतांचा विश्‍वकोश तर जगातील असंख्य विद्यार्थी, शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्यासाठी ज्ञानाचे मोठे भांडार आहे. डॉ. गोवारीकरांच्या आत्मास चिरशांती लाभो ही ईश्‍वरचरणी प्रार्थना.''
- शरद पवार, माजी कृषीमंत्री, भारत सरकार.

""भारतीय अंतराळ संस्थेची (इस्त्रो) खरी उभारणी डॉ. गोवारीकर यांनी केली. त्यांनी घातलेल्या पायावरच आज इस्त्रोला मंगळभरारी शक्‍य झाली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन या तिन्ही क्षेत्रात त्यांनी देशाचे नेतृत्व केले. विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे विज्ञानात दोन टक्‍क्‍यांपर्यंत गुंतवणूक शक्‍य होऊ शकली.''
- डॉ. रघुनाथ माशेलकर, जेष्ठ वैज्ञानिक

""अंतराळ विज्ञानापासून विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये डॉ. गोवारीकरांचे काम अतुलनीय होते. समाजातील विविध गरजा लक्षात घेवून त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. यामुळे त्यांनी विज्ञानाला वेगळे स्थान निर्माण करुन दिले.''
- डॉ. अनिल काकोडकर, जेष्ठ अणुउर्जा शास्त्रज्ञ

""डॉ. वसंत गोवारीकर यांचे विज्ञान संशोधन व शिक्षण क्षेत्राला मोठे योगदान लाभले. चार माजी पंतप्रधानांचे ते वैज्ञानिक सल्लागार होते. यामुळे देशाचे विज्ञान व संशोधन ठरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या निधनाने विज्ञान संशोधन क्षेत्र आणि देशाची मोठी हानी झाली.''
- डॉ. वासुदेव गाडे (कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
-------------------- 

No comments:

Post a Comment