Thursday, January 29, 2015

राज्यात हवामानाचे
ऋतू संक्रमण सुरु

हिवाळ्याची अखेर, उन्हाळ्याची चाहूल

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील हिवाळा अखेरच्या टप्प्यात पोचला असून उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे. किमान व कमाल तापमानासह विविध हवामान घटकांची ऋतू बदलाची संक्रमण अवस्था नुकतिच सुरु झाली आहे. यामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी थंडीने काढता पाय घेतला आहे. उन्हाची ताप वाढण्यास सुरवात झाली आहे. चालू आठवड्यापासून उत्तरोत्तर तापमानात हळूहळू वाढ होत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

भौगोलिक दृष्ट्या राज्यात पावसाळा (जुन ते सप्टेंबर), हिवाळा (ऑक्‍टोबर ते जानेवारी) व उन्हाळा (फेब्रुवारी ते मे) हे तिन प्रमुख ऋतू मानले जातात. उत्तर गोलार्धात 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो. यानंतर सुर्याचे उत्तरायन सुरु होते. जानेवारीअखेरपर्यंत याच्या परिनामात आणखी वाढ होवून सुर्याची किरणे लंबरुप पडू लागतात व उष्णतेत वाढ होऊ लागते. यानुसार सध्या किरणे लंबरुप पडू लागली असून तापमानात हळूहळू वाढ होत आहे. ही ऋतूच्या संक्रमनाची अवस्था असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका (हवामान अंदाज) डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) केंद्रस्थानी ठेवून भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशात प्री मॉन्सून (मार्च ते मे), मॉन्सून (जून ते सप्टेंबर), पोस्ट मॉन्सून (ऑक्‍टोबर ते डिसेंबर) आणि विंटर म्हणजेच हिवाळा (जानेवारी व फेब्रुवारी) हे चार प्रमुख ऋतू निश्‍चित केले आहेत. यानुसार फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत देशात हिवाळा सुरु राहणार आहे. मात्र राज्याचा विचार करता या कालावधीत कोणत्याही जिल्ह्यात किमान तापमान 10 अंशाच्या खाली जाण्याची शक्‍यता नाही. उलट ते सरासरीएवढे किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्‍यता आहे. क्विचित प्रसंगी किमान तापमानात थोडीफार घट होऊ शकते. मात्र सर्वसाधारणपणे यापुढील काळात कमाल व किमान तापमानाचा आलेख चढता राहील, अशी माहिती डॉ. खोले यांनी दिली.

दरम्यान, जळगाव येथे गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात सर्वात कमी 12 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. किमान तापमान कोकणात 13 ते 21 अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात 12 ते 18, मराठवाड्यात 13 ते 15 तर विदर्भात 12 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान होते. राज्यात बहुतेक ठिकाणी थंडी गायब झाल्यासारखी स्थिती आहे. बहुतेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गुरुवारी (ता.29) सकाळी साडेआठपर्यंतच्या चोविस तासात नोंदविण्यात आलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः कुलाबा 19.6, सांताक्रुझ 15.8, अलिबाग 17.8, रत्नागिरी 17.9, पणजी 20.4, डहाणू 15.9, भिरा 13, पुणे 13.3, जळगाव 12, कोल्हापूर 17.5, महाबळेश्‍वर 14.6, मालेगाव 15, नाशिक 12.6, सांगली 15.6, सातारा 14, सोलापूर 15.1, औरंगाबाद 14.4, परभणी 14.9, नांदेड 13.5, अकोला 15.4, अमरावती 17.8, बुलडाणा 14, ब्रम्हपुरी 16.1, चंद्रपूर 12.1, नागपूर 13.7, वाशिम 18, वर्धा 15, यवतमाळ 13.4
-------------------------------
- फेब्रुवारीची सुरवात ढगाळ
""राज्यात शनिवारनंतर काही कालावधीसाठी ढगाळ हवामानात वाढ होण्याची चिन्हे आहेत. मात्र कमाल व किमान तापमानात फारशी घट होण्याची शक्‍यता नाही. येत्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी कमाल, किमान तापमान एक दोन अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे.''
- डॉ. मेधा खोले, उपमहासंचालक (हवामान अंदाज), भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे.
-----------(समाप्त)---------

No comments:

Post a Comment