Thursday, January 15, 2015

पुण्यात १६ जानेपासून उत्पादक गटांचा संत्री महोत्सव

दहा उत्पादक गटांचा सहभाग; 40 टन विक्रीचे उद्दिष्ट

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ, कृषी समृद्धी समन्वित कृषी विकास प्रकल्प व महाऑरेंज यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ते 18 जानेवारी दरम्यान येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या मैदानात संत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमाअंतर्गत अमरावती, अकोला व वर्धा जिल्ह्यातील दहा संत्री उत्पादक गटांकडून 33 रुपये किलो फिक्‍स दराने सुमारे 40 टन संत्री विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत हा महोत्सव सुरू राहील.

अमरावती जिल्ह्यातील कृषिसमृद्धी (अचलपूर), संत गजानन महाराज (सुरळी, वरुड), श्री यशवंत बाबा (सावंगी, वरुड), श्री संत गुलाबराव महाराज (माधान, चांदुरबाजार), श्री स्वामी समर्थ महाराज (काजळी, चांदूर बाजार), श्री गजानन महाराज (करणखेड, चांदूर बाजार), चक्रधर स्वामी (वाघोली, मोर्शी), जय बालाजी (ममदापूर, मोर्शी), अकोला जिल्ह्यातील यशवंत शेतकरी (बोर्डी, अकोट), तर वर्धा जिल्ह्यातील कृषी उन्नती (चांदवानी, कारंजा) या बचत गटांमार्फत संत्री महोत्सवात थेट ग्राहकांना संत्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी समृद्धी प्रकल्पाचे कृषीविद्यावेत्ता हेमंत राजपूत यांनी ही माहिती दिली.

कृषिसमृद्धी प्रकल्प, पणन विभाग व महाऑरेंज यांच्यामार्फत विदर्भातील शेतकरी गटांचा संत्री थेट पुण्यातील ग्राहकांना विक्री करण्यासाठी चालू हंगामात विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत 100 रुपयांना तीन किलो या दराने सुमारे 70 टन संत्र्यांची थेट ग्राहकांना विक्री करण्यात आली आहे. या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून बालगंधर्व रंगमंदिराच्या मैदानात संत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फळबागेतच संत्र्यांची चांगली ग्रेडिंग करून उच्च गुणवत्तेचा माल पुण्यात थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे श्री. राजपूत यांनी सांगितले.
---- 

No comments:

Post a Comment