Thursday, January 22, 2015

संत्रा महोत्सवात आठ लाखांची विक्री

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
----
पुणे (प्रतिनिधी) ः कृषी समृद्धी प्रकल्पामार्फत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र राज्य संत्रा उत्पादक संघाच्या (महाऑरेंज) मदतीने आयोजित केलेल्या शेतकरी ते ग्राहक थेट संत्रा विक्री महोत्सवात अवघ्या चार दिवसांत तब्बल 25 टन संत्र्यांची थेट विक्री झाली. प्रति तीन किलोस 100 रुपये या निश्‍चित दराने संत्रा विक्री झाल्याने महोत्सवात सुमारे आठ लाख 25 हजार रुपयांची उलाढाल झाली.

कृषी समृद्धी प्रकल्पामार्फत चालू हंगामात विदर्भातील संत्र्याची पुण्यातील ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात 16 ते 18 जानेवारीदरम्यान संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या तीन दिवशी अनुक्रमे दोन हजार 500, सहा हजार 500 व सात हजार 500 किलो संत्र्यांची विक्री झाली. ग्राहकांच्या आग्रहावरून महोत्सव आणखी एक दिवस वाढवून 19 जानेवारीलाही सुरू ठेवण्यात आला. या दिवशी आठ हजार किलोहून अधिक संत्रा विक्री झाली.

पुण्यातील चोखंदळ ग्राहकांशी थेट संवाद साधून संत्रा विक्री करून शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीचे प्रशिक्षण देणे हा या महोत्सवाचा महत्त्वाचा उद्देश होता. विशेष म्हणजे या महोत्सवात प्रथमच सर्व शेतमालाची किंमत समान होती. संत्र्याची योग्य किंमत निश्‍चित करून दरात घासाघीस किंवा कमी जास्त करण्यास ग्राहकांना वाव देण्यात आला नव्हता. यानंतरही पुणेकरांनी अमरावती, अकोला व वर्धा परिसरातील शेतकऱ्यांच्या संत्र्याला मोठा प्रतिसाद दिल्याने महोत्सवाचा उद्देश सफल झाल्याचे कृषी समृद्धीचे कृषी विशेषज्ञ हेमंत राजपूत यांनी सांगितले.
. . . . . . . . . . . . . . .

- चौकट -
112 टन संत्र्यांची थेट विक्री
कृषी समृद्धी प्रकल्पाअंतर्गत विदर्भातील शेतकरी गटांनी चालू संत्रा हंगामात आतापर्यंत तब्बल 112 हजार टन संत्र्यांची ग्राहकांना थेट विक्री केली आहे. विशेष म्हणजे हा सर्व संत्रा दरात चढ उतार न करता एकाच निश्‍चित दराने विकला गेला आहे. यातील सर्वाधिक 50 टन संत्रा गुलटेकडी मार्केट यार्डमधील फळे व भाजीपाला विभागाच्या प्रवेशद्वाराजवळील थेट विक्री दालनातून विकण्यात आला आहे. याशिवाय संत्रा महोत्सवाबरोबरच आयटी कंपन्या, मॉल आणि किरकोळ विक्रेत्यांनाही संत्र्याची विक्री करण्यात आली आहे.
---- 

No comments:

Post a Comment