Monday, January 12, 2015

ठिबकवरील ज्वारीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद

शेतकऱ्यांची पिक पहाणी सुरु; जानेवारी अखेरीस पिक काढणी

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यभरातून दुरध्वनीवर झालेली चौकशी, कौतुक, माहितीचे आदानप्रदान आणि पाठोपाठ 10 हून अधिक जिल्ह्यांतून प्रयोग पाहण्यासाठी सुरु झालेला प्रगतशिल शेतकऱ्यांचा ओघ... शिरुर तालुक्‍यातील प्रगतशिल शेतकरी मधुकर (अण्णा) टेमगिरे यांनी घेतलेल्या ठिबकवरील ज्वारी उत्पादनाचा प्रयोग एक जानेवारीला ऍग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यास राज्यभरातून असा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांची पिक पहाणी अद्यापही सुरुच असून 26 जानेवारीदरम्यान या ज्वारीची काढणी होणार आहे.

ऍग्रोवनमध्ये प्रयोगाची माहीती प्रसिद्ध झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या प्रयोगास भेट दिली आहे. याशिवाय नांदेड, जालना, बीड, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, सातारा, नगर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या प्रयोगास आवर्जून भेट देवून पिक पहाणी व माहिती घेतली आहे. धुळे, नंदुरबार भागातून दुरध्वनीवर या प्रयोगाविषयी सर्वाधिक विचारणा झाली. नॅचरल शुगर कंपनीचे अध्यक्ष, कृषीरत्न भगवानराव ठोंबरे, राज्य सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष गुलाबराव शेळके, शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार यासह अनेक मान्यवरांनी प्रयोगाची पहाणी करुन कौतुक केल्याची माहीती श्री. टेमगिरे यांनी दिली.

शिरुर तालुका कृषी विभाग व किसान संघाच्या संयुक्त विद्यमाने टेमगिरे यांच्या ज्वारी प्रयोग प्रक्षेत्रावर पिक पाहणीसाठी शिवार फेरी व शेतकरी मेळावा सात जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला. तालुक्‍यातील सुमारे 400 हून अधिक शेतकरी या मेळाव्यास उपस्थित होते. उत्पादनवाढीसाठी हा प्रयोग फारच सोपा आहे. असे केल्यावर उत्पादन वाढते हे यापुर्वी माहित झाले असते तर आम्हीही ही पद्धत वापरली असती, अशा प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. अनेकांनी ज्वारीच्या काढणीवेळी उपस्थित राहणार असल्याचेही आवर्जून सांगितले आहे.

दरम्यान, ज्वारीच्या कणसात दाणे पक्व होवू लागल्यानंतर आता कणसाच्या भाराने काही ताटे वाकण्यास सुरवात झाली आहे. यामुळे भार वाढलेल्या ताटांची कापडाच्या दोरीने एकत्रित बांधणी सुरु आहे. येत्या 26 जानेवारीदरम्यान पिकाची काढणी होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती श्री. टेमगिरे यांनी दिली. ठिबकवरील ज्वारी उत्पादनाच्या या प्रयोगाविषयी अधिक माहिती किंवा पिक पाहणीसाठी संपर्क क्रमांक ः श्री. टेमगिरे 9403722447, 9850099847
-----------(समाप्त)---------- 

No comments:

Post a Comment