Friday, January 23, 2015

SILC - नितिन गडकरी उद्घाटन


पुणे (प्रतिनिधी) ः शेतकऱ्यांना गहू, बाजरीतून किती पैसा मिळणार यावर मर्यादा आहेत. देशातील शेतकरी खऱ्या अर्थाने संपन्न करण्यासाठी इंधन व उर्जा निर्मितीकडे वळल्याशिवाय पर्याय नाही. ग्रामिण भागात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व कौशल्यांचे रुपांतर संपत्तीत व्हायला हवे, अशी अपेक्षा केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केले.

सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी) आयोजित "कृषी ज्ञान सोहळ्या'चे उद्घाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, एसआयएलसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा पालकर, नेटाफिम इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणधिर चौधरी व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे चे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे व्यासपीठावर उपस्थित होते. एसआयएलसीमध्ये कृषीविषयक प्रशिक्षण घेतलेले बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते. नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक तर सह्याद्री इंडस्ट्रीज हे नॉलेज पार्टनर, द - लावल हे सिल्व्हर पार्टनर होते. एसआयएलसीच्या मेंबरशिप कार्डचे पाच प्रातिनिधीक शेतकऱ्यांना यावेळी वितरण करण्यात आले.

श्री. गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांना इंधन व उर्जा निर्मितीतून चांगली संपत्ती मिळू शकते. पेट्रोलियम मंत्रालयाने बायोडिझेलच्या फक्त मोठ्या खरेदीलाच मान्यता देण्याचा प्रयत्न होता. त्यास मी आक्षेप घेतल्यानंतर पंतप्रधानांनी देशात कोणालाही कितीही बायोडिझेल बनवायला व वापरायला परवानी दिली आहे. यामुळे ट्रॅक्‍टरला 10 रुपये स्वस्त डिझेल मिळाले तरी वर्षाला 50 हजार रुपयांची बचत होईल. बचत हीच कमाई असते.

कापूसाच्या पऱ्हाट्या व भाताच्या काडापासून इंधन निर्मिती शक्‍य आहे. याशिवाय इतर पिकांपासून बायोडिझेल, इथेनॉल, बायोगॅस आदींची निर्मिती होते. याच्या वापरास अधिकाधिक चालना देण्याचा भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे. यासाठी नागपूरात गेली तीन महिने 100 टक्के इनेनॉलवर बस सुरु आहे. खोपोली येथे देशातील पहिला इथेनॉल पंप आजपासून सुरु होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना संपन्नतेची नवी दालने खुली होणार आहेत. आगामी काळात कृषी व ग्रामीण क्षेत्राकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

ग्रामिण भागाचा विकास झाला, शेतकऱ्यांची खरेदी क्षमता वाढली तरच देशाचा विकास शक्‍य आहे. शेतीची आजची सामाजिक व आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे. त्यातून मार्ग कसा काढावा हा यक्षप्रश्‍न सर्वांसमोर आहे. योग्य प्रशिक्षण, पुरेशी वीज, पाणी उपलब्ध झाले तर मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतो. चांगल्या गोष्टीचे अनुकरण केले तरी त्यातून चांगली प्रयत्न होवू शकते. मात्र माहितीचा अभाव ही मोठी समस्या आहे. ग्रामिण भागात सुप्त नेतृत्व, बुद्धीमत्ता आहे. चांगले प्रयोग होत आहेत. ते लोकांपर्यंत पोचले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. पवार यांनी सकाळ माध्यम समुहामार्फत राज्य, शेती, शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्‍न मुळातून संपवणे आवश्‍यक आहे. तोडफोड, जाळपोळ हे त्यासाठीचे मार्ग नाहीत. प्रश्‍नमुळापासूनच सुटावेत यासाठी ऍग्रोवन, सकाळ रिलिफ फंड, तनिष्का, डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन, पेमांडू या माध्यमातून सकाळ माध्यम समुहाचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यापासून जागतिक पातळीपर्यंत या कामाची दखल घेण्यात आली आहे. या कार्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे.

डॉ. पालकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. श्रीराम शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. अमोल बिरारी यांनी आभार मानले.
----------------
*चौकट
...अंबानींनी चाखली सिताफळे
ग्रामिण भागातील बुद्धीमत्ता स्पष्ट करताना गडकरींना विदर्भातील पाटील नावाच्या शेतकऱ्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, पाटील सेंद्रीय पद्धतीने सिताफळाचे उत्पादन घेतात. त्यांनी काही सिताफळे मला आणून दिली. मुकेश अंबानी माझ्या भेटीसाठी नागपूरला आले. रात्री जेवण, गप्पा झाल्यावर त्यांना काही सिताफळे पॅक करुन दिली. ते घेवून गेले. आठ दिवसांनी मी गडबडीत असताना त्यांचे सात-आठ मिस्ड कॉल आले. पीए ने चौकशी केल्यावर समजलं की निता अंबानी व मुलांना सिताफळे एवढी आवडली की आणखी सिताफळे पाहिजेत म्हणून मागे लागले. शेतकऱ्याशी संपर्क साधून दिल्यावर त्यांनी आठवड्याला दोन-दोन पेट्या पाठवा, म्हणाल ती किंमत देवू म्हणून सांगितलं. गडकरींच्या या किस्स्याला उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
-----------------
*चौकट
- कृषी विद्यापीठांचे अनुदान बंद करा
आपल्या कृषी विद्यापीठांमार्फत व शिक्षण संस्थामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पुरेसे ज्ञान पोचत नाही. यामुळे पुर्वी मी कृषी विद्यापीठाचे अनुदान बंद करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विद्यापीठांनी 25 टक्के क्षेत्रावर बिजोत्पादन घ्यावे व त्यातून आपला खर्च भागवावा. विद्यापीठांच्या बोर्ड ऑफ स्टडी, अकॅडमीक कॉन्सिलमध्ये शेतकऱ्यांच्या यशोगाथा येत नाहीत, शेतकऱ्यांच्या यशोगाथांकडे विद्यापीठे दुर्लक्ष करतात, या शब्दात गडकरी यांनी विद्यापीठांच्या कार्याबाबत नाराजी व्यक्त केली.
---------------------
चौकट
- यशासाठी सरकारी मदत नको, इनोव्हेशन करा
ज्याला यश मिळावायचेय त्यांनी कोणत्याही सरकारची मदत न घेता समाजाच्या मदतीने काम केले पाहिजे. सरकारच्या मदतीने व्यवसाय यशस्वी होवूच शकत नाही. शेतकऱ्यांनी गरजेनुसार स्वतःच इनोव्हेशन (नवसंशोधन) करण्यावर भर दिला पाहिजे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमधील इनोव्हेशन फाऊंडेशनने देशातील 25 हजार नवसंशोधने एकत्रित केली असून यामुळे व्यवसायिक संधीची नवी दालणे खुली झाली आहेत, असे श्री. गडकरी यांनी सांगितले.
-------------------
*चौकट
- केसांपासून "अमिनो ऍसिड' उद्योग
नाविन्यपुर्ण कल्पना व संशोधनातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्‍य आहे हे स्पष्ट करताना गडकरी यांनी नागपूरमध्ये नव्याने विकसित केलेल्या एका अभिनव उद्योगाची माहिती दिली. ते म्हणाले, वर्ध्यात महात्मा गांधी संस्थेत कापलेल्या केसांपासून अमिनो ऍसिड तयार करण्याचा प्रयोग पाहिला. अमिनो ऍसिडचे शेतीत अनेक उपयोग आहे. बाजारातून आम्ही 540 रुपये लिटरने विकत घेत होतो. नागपूरात करुन पाहिले तर यश आले. फक्त 60 रुपये लिटरने विक्री सुरु झाली. आता दिल्लीतल्या एक उद्योजकाने हे ऍसिड 540 रुपये लिटरने विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यांना पुरवठा करणार आहोत. यातून आत्तापर्यंत 200 मुलांना रोजगार भेटला आहे. नवीन रोजगार निर्मिती सुरु झाली आहे.
---------------
*चौकट
- प्रवास पऱ्हाटीपासून इंधन निर्मितीचा
विदर्भात कापसाचे पिक मोठे आहे. मात्र कापूस काढल्यावर शेतकरी पऱ्हाट्या जाळतात. त्यात 4700 कॅलरी व्हॅल्यू असते. यापासून वेगळं काही करता येईल का हा विचार मनात घोळत होता. पंजाबला कार्यक्रमास गेलो असताना तिथे पऱ्हाट्या उपटण्याचे यंत्र पाहिले. ते विकत आणून दुप्पट क्षमतेचे बनवले. यानंतर गुजरातमध्ये राजकोटला एका कंपनीचे पऱ्हाट्या कापून त्यांचा बारिक भुरका करुन ट्रॉलीत टाकायचे यंत्र पाहिले. ती 10 यंत्रे आणली. आता त्यांनी नवीन मशीन आणलं. ते पऱ्हाटीचा भुरकाही करतं आणि जमीन नांगरतंही. बंगलोरला हा भुरका कंपॅक्‍ट करण्याचे यंत्र पाहिले. ते ही आणले. यानंतर पुण्यात गोंधळेकर आणि मंडळींकडून या भुरक्‍यापासून कांडीकोळसा तयार करण्याचे यंत्र उपलब्ध झाले. गॅसला पर्यायी इंधन तयार झाले. नागपूरात सावजी मटन खानावळीपासून अनेक ठिकाणी हा कांडीकोळसा वारला जातो. विदर्भात सर्वत्र पऱ्हाट्यांवर प्रक्रीया करण्याचे नियोजन असून त्यातून एक लाख मुलांना काम मिळेल आणि शेतकऱ्यांनाही चांगली आर्थिक प्राप्ती होईल, असे गडकरी यांनी सांगितले.
--------------
*चौकट
- 350 ची सिमेंट गोणी 120 ला
मध्य प्रदेशमधील सर्व रस्ते सिमेंट कॉक्रीटचे करण्याची घोषणा केल्यानंतर सिमेंट कंपन्यांनी संगनमत करुन गोणीची किंमत 300 वरुन 350 रुपये केली. मग मी 30 टक्‍क्‍यांहून कमी उत्पादन असलेल्या कंपन्यांना बोलवले. त्यांचे सर्व सिमेंट उत्पादन खर्चावर 25 टक्के नफा देवून विकत घेण्याची तयारी दाखवल्यानंतर फक्त 120 रुपयांना एक गोणी सिमेंट उपलब्ध झाले. मित्तलांकडून लोखंडाचा किस मोफत मिळाला आणि मध्य प्रदेश सरकारकडून वाळूही मोफत उपलब्ध झाली. यामुळे सिमेंट रस्त्यांचा खर्च अतिशय कमी झाला असून यातील गैरप्रकारही थांबणार असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.
--------------- 

No comments:

Post a Comment